• Mon. Jun 5th, 2023

भारताचा ऑस्ट्रेलियावर 11 धावांनी विजय

ByBlog

Dec 6, 2020

टी-20 मालिकेत 1-0 ने आघाडी
कॅनबेरा,( ऐक्य समूह) : युजवेंद्र चहल, टी. नटराजन व इतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या मार्याच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या टी-20 सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला. 162 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आश्वासक सुरुवात केल्यानंतर मधल्या षटकांमध्ये हाराकिरी केली. रवींद्र जडेजाऐवजी बदली खेळाडू म्हणून आलेल्या चहलच्या फिरकीच्या जाळ्यात कांगारू अडकले. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. कर्णधार फिंच व डार्सी शॉर्ट यांनी भारतीय गोलंदाजांची पॉवरप्लेच्या षटकांमध्ये धुलाई करत अर्धशतकी भागीदारी केली. चहलने कर्णधार फिंचला 35 धावावर माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. यानंतर चहलनेच स्टिव्ह स्मिथला स्वस्तात माघारी धाडले.
यानंतर फॉर्मात असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला माघारी धाडत टी. नटराजनने कांगारूंच्या अडचणीमध्ये भर टाकली. मॅक्सवेल नटराजनचा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधला पहिला बळी ठरला. यानंतर फटकेबाजी करणार्या डार्सी शॉर्टलाही नटराजनने माघारी धाडले. त्याने 34 धावा केल्या. त्या पोठोपाठ लगेच चहलने मॅथ्यू वेडलाही आपल्या जाळ्यात अडकवत कांगारूंना पाचवा धक्का दिला. त्यामुळे मोक्याच्या षटकांमध्ये धावा जमवण्याऐवजी कांगारूंचा संघ बॅकफूटवर गेला. टीम इंडियाकडून चहल व नटराजन यांनी प्रत्येकी 3-3 तर दीपक चहरने 1 बळी घेतला.
वन-डे मालिका गमावल्यानंतर भारतीय फलंदाजांचे ऑस्ट्रेलिया दौर्यात निराशाजनक कामगिरीचे सत्र सुरूच राहिले आहे. पहिल्या टी-20 सामन्यात सलामीवीर लोकेश राहुलची अर्धशतकी खेळी व रवींद्र जडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने 161 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवत त्यांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. महत्त्वाच्या क्षणी जडेजाने 23 चेंडूत 5 चौकार व 1 षटकारासह नाबाद 44 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. शिखर धवन मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटही फारशी चमक दाखवू शकला नाही. फिरकीपटू स्वेप्सनच्या गोलंदाजीवर विराट 9 धावा काढून माघारी परतला. एकीकडे लोकेश राहुल एक बाजू लावून धरत फटकेबाजी करत होता; परंतु दुसर्या बाजूने ठराविक अंतराने भारतीय फलंदाज बाद होत होते. संजू सॅमसन व मनीष पांडेही फार काळ तग धरू शकले नाहीत. अर्धशतक झळकावल्यानंतर लोकेश राहुल हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 40 चेंडूत 5 चौकार व 1 षटकारासह 51 धावा केल्या. यानंतर मैदानावर आलेला हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी फटकेबाजी करत भारताची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला; परंतु हार्दिक हेन्रिकेजच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतर उर्वरित भारतीय फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला 161 धावांचा टप्पा गाठून दिला. ऑस्ट्रेलियाकडून हेन्रिकेजने 3 तर स्वेप्सन-झॅम्पा व स्टार्क यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *