• Sun. May 28th, 2023

बंजारा भाषेतील एक अतुलनीय दिवाळी अंक “स्वच्छंदी भरारी”…!!

ByBlog

Dec 28, 2020

संपादक मा.श्री.एकनाथ गोफणे सर यांनी वर्षभर अथक प्रयत्न करून आपल्या देशातील वैविध्यपूर्ण आणि चिकाटीने लढणाऱ्या अशा बंजारा समाजाच्या निपुनतेला,जिद्दीला आणि त्यांच्यात असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने काही वर्षांपासून स्वतंत्ररित्या बंजारा भाषिक “स्वच्छंदी भरारी” या दिवाळी अंकाची निर्मिती करण्यासाठी झटत असतात.या वर्षीच्या दिवाळी अंकाची लिंक माझ्यापर्यंत येताच मी हा अंक किमान दहावेळा तरी वाचून काढलेला असेल.अंकाच्या मुखपृष्ठावरूनच या वर्षीच्या या दिवाळी अंकाची गुणवत्ता लक्षात येते.कापूस वेचणाऱ्या बाईची वेशभूषा आणि तिच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा पाहून आपण बंजारा समाजातील संस्कृतीच्या अक्षरशः प्रेमात पडल्या शिवाय राहू शकत नाही.या अंकाची सजावट व टाईपसेटींगचे काम मा.जयंत गोफणे,तर छायाचित्रण गोरख गोफणे व पद्मश्री गोफणे यांनी केली असून प्रकाशन नियोजनाचे काम सौ.दुर्गाताई गोफणे यांनी केलेली आहे.या अतुलनीय अंकाच्या मुखपृष्ठाला सौ.राठोडबाई लाभल्या हे म्हणजे या दिवाळी अंकाला लाभलेला जणू वरदानच…..
कोणतेही शुभ कार्य करताना आपल्याला चांगल्या व्यक्तींच्या सहकार्याची आवश्यकता असतेच…त्याच्याशिवाय आपल्या हातून शुभकार्य घडूच शकणार नाही.अशाच प्रकारे या शुभकार्याप्रसंगी या दिवाळी अंकाची निर्मिती करण्यासाठी योग्य व्यक्तींच्या सहकार्याची आवश्यकता होती,आणि ती पूर्ण केली…मा.योगेश्वर राठोड,रामकृष्ण राठोड,दिनेश राठोड,अशोक राठोड,ध्रुवास राठोड,नितीन खंडाळे, दिनकर राठोड व राजू चव्हाण यांनी….या अंकाविषयी बोलणे म्हणजे आपल्या मनातल्या झोपून असणाऱ्या साहित्यिकाला खडबडून जागे करून आपल्या समाजाविषयीच्या आपल्या धारणा,व कळवळा आपणही आपल्या लेखणीतून जगासमोर आणावी अशी भावना मनात जागृत करून घेणेच होय… असा हा प्रेरक आणि सखोल चिंतन करायला भाग पाडणारा दिवाळी अंक आहे.
पर्यावरणाच्या वाढत्या प्रदूषणाची आणि वाचकांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून मा.गोफणे सरांनी या अंकाला ई स्वरूपात बनवले.खरंच गोफणे सरांच्या या दृष्टिकोनाचा मनापासून स्वागत करायला मला मनापासून आवडेल.https://online.fliphtml5.com/kplqi/prlk/ ही लिंक मा.गोफणे सरांनी सर्वत्र मीडियाच्या माध्यमातून आणि सहकार्याच्या माध्यमातून सार्वजनिक करून सगळ्यांना वाचनातून नवी उर्मी प्रदान केली.
या अंकाच्या सुरुवातीलाच प्रा.नेमीचंद चव्हाण यांच्या “हांजारीर खबर” या एका बहिणीच्या आपल्या भावाविषयीच्या उत्कट प्रेमाचे भाव व त्यांच्यातील संवादाचे चित्रण आपल्या डोळ्यासमोर उभे करून देण्याची ताकद या लघुसंवादात लाभलेली आहे.”चालो रे भिया,तांडेर हात वेजावा ।
भुके तरसेन, कोळभर बाटी खरावा” या एकाच कडव्यात समाजाला जोरदार चपराक मारून त्यांना खडबडून जागृत करण्याची शैली कवी.राहुल पालतीया यांनी “चालो रे भिया” या कवितेतून जोपासली आहे.मा.एकनाथ गोफणे यांनी या समाजविषयीची आत्मीयता आणि कळवळा व्यक्त करताना “तूच आंग धक” अशी जणू काही विनंतीच आपल्या “स्वच्छंदी भरारी” या कवितेतून केली आहे.त्याचबरोबर “म भगत बणुचू, तू पुढारी बणजो” या कवितेतून त्यांनी समाजाला लागलेली किड वाचकांच्या लक्षात आणून देण्याचे यथावकाश प्रयत्न केले.कविमित्र पिंटू पवार यांनी “सायेबेन हारदं” या कवितेतून “सायेबेनाई नेक विचार से वेन पेरो ।
केरी लार मत चरो,से समाजेवास हुबरो ।।” अशी विनवणी आपल्या कवितेतून केली. तसेच त्यांच्या “बंजारा वेजावो एक” या कवितेमध्येही त्याची समाजविषयीची तळमळ त्यांनी व्यक्त केली.”आज जे बी छा अन जत बी छा
बापू तारेज कारणेती छा” या काव्यओळीतून कविमित्र रामकृष्ण राठोड यांनी नाईक साहेबांच्या ऋणाला व्यक्त केले,मा.भास्कर राठोड यांच्या भासुच्या कविता ह्या तर महाराष्ट्र प्रांतात विख्यात आहेच…त्यांनी आपल्या लेखनशैलीची कसब या अंकात सुद्धा दाखवताना व्यसन,तांडेर नसाब या आपल्या अतुलनीय साहित्यातून “स्वच्छंदी भरारी” या अंकाला मानाचे स्थान प्राप्त करण्यास सहकार्य केले.रतनकुमार राठोड यांनी “वसंता तार नायकी,धमक मरगी, बणगेचा गुलाम,आंगेर जनम कुं दिटो?” या अतिशय उत्कृष्ट व सामाजिक जाणिवा लक्षात आणून देणाऱ्या कवितेची भर घातली.तर मा.पंजाबराव चव्हाण यांनी बापू भिमणिपुत्र लिखित “लावण पिवशी”,राहुल सिंधू पालतीया लिखित “घुगरी घालेरो”,जयराम पवार लिखित “लोहगड” व नामदेव पवार लिखित “लदनी” या दारू विकणाऱ्या होतकरू मुलांच्या यशस्वी भरारीची गाथा असणाऱ्या पुस्तकाचे यशस्वी समीक्षण केलेले या दिवाळी अंकातून आपल्या लक्षात येईल.
बापू भीमणीपूत्र हे बंजारा समाजाला लाभलेले खरे सोन्याहूनही पिवळे असणारे जणू रत्नच….त्यांनी या दिवाळी अंकात आपल्या “याचिका” या कवितेतून “न्यायदेवता…काढ तार आकीपरेर ऊ काळभुर पट्टी ।
नारी जातेप बलात्कार करेवाळे ओ नराधमेवूर,
सुंकाण जागा काटन फेकेर द सेन छुट्टी ।।” अशी कळवळीची विनंती त्यांनी न्यायदेवतांना केलेली आहे.”गोर समाजेर हिरा गमागो” या आपल्या कवीतेतून मा.सुरेश राठोड यांनी सुद्धा नाईक साहेबांची आठवण करून दिली,तसेच संतोष राठोड यांची “हाम तो चोरच रेगे”,लखणकुमार राठोड यांची “प्रेमज्योती” कैलास पवार यांनी लिहलेली “ए शाळावाळो छोरा”,रामकृष्ण राठोड लिखित “आरती सेवाभाया”,राजाराम जाधव यांची “कैफियत”,वसंत जाधव लिखित “पोरीया तारा” या सगळ्या कविता पुन्हा पुन्हा वाचत राहाव्यात अशाच आहेत.
बंजारा समाजात हास्यविनोदी कलाकारांची कमरता कवी निरंजन मुडे सर यांनी आपल्या “आटो” व “चायनीज” या विनोदी कथेतून पूर्ण केली.गोर रावूल पालतीया यांनी “नागपंचमी” हा लेख लिहून समाजाच्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला.अशा प्रकारे वैविध्यतेने नटलेल्या या अतुलनीय अशा दिवाळी अंकाचे स्वरूप आहे.जणू हा अंक म्हणजे समाजाला अर्पिलेली साहित्य सेवाच आहे.लेख,कादंबरी समीक्षण,उत्कृष्ट कविता यांची भरमार म्हणजेच बंजारा भाषिक “स्वच्छंदी भरारी” हा दिवाळी अंक…कृपयाhttps://online.fliphtml5.com/kplqi/prlk/ या लिंकवर क्लिक करून एकदा या अंकाला वाचून बघा व आपला अभिप्राय ekgofne2015@gmail.com या मेलवर कळवा जेणेकरून आम्हाला आणखी नवनविन उपक्रम राबविता येतील आणि समाज जागृत करण्यासाठी आमचे योगदान कामी पडतील अशी विनंती आमचे गुरुतुल्य मा.श्री.एकनाथ गोफणे सर करीत आहेत.

    शब्दसखा-
    अजय रमेश चव्हाण
    तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *