अमरावती : जिल्ह्यातील शहरांमध्ये हरित क्षेत्रांचा विकास व संवर्धन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
‘माझी वसुंधरा अभियाना’बाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. नगर प्रशासन विभागाचे जिल्हा प्रशासन अधिकारी राजेंद्र फातले, कर व प्रशासकीय अधिकारी अमित वानखडे, सागर ठाकरे यांच्यासह अनेक मुख्याधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारलेले “माझी वसुंधरा” हे अभियान राज्यातील 667 शहरांत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींनी त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. नगरांमध्ये हरित आच्छादन वाढविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी वृक्षारोपण मोहिमा राबवून विविध भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड करावी व अधिकाधिक नागरिकांचा सहभाग मिळवावा. अमृत वने, सामाजिक उद्याने विकसित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
श्री. नवाल पुढे म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापनासाठी संकलन, विलगीकरण, जुन्या साठलेल्या कच-यावर शास्त्रोक्त प्रक्रिया यासाठी सक्षम यंत्रणा ठेवावी. घरामधील ओला कचरा कंपोस्टिंग आदी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावेत. रस्त्याच्या दुतर्फा हरितीकरण करावे. नागरी परिसरात नॉन मोटराईझ वाहतूक सेवा चालविण्यास प्रोत्साहन द्यावे. जलसंवर्धनासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, नाले, तळे यांची स्वच्छता करावी.
सौर उर्जेवर, एलइडीवर चालणारे दिवे, हरित इमारती (ग्रामीण), इलेक्ट्रिकल वाहने आदींसाठी प्रोत्साहनपर उपक्रम राबवावेत. निसर्ग संवर्धनासाठी अधिकाधिक नागरिकांचा सहभाग मिळवावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
निसर्गसंपन्न नगरांसाठी ‘माझी वसुंधरा अभियान’ जिल्ह्यातील शहरांमध्ये हरित क्षेत्राचा विकास करा – जिल्हाधिकारी शैलेश नवाल
Contents hide