अमरावती : इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत 2021-22 या वर्षासाठी पहिली व दुस-या इयत्तेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छूक पालकांनी त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.
याबाबतचे अर्ज धारणीच्या प्रकल्प कार्यालयात 29 डिसेंबरपासून उपलब्ध असतील. विद्यार्थ्याच्या पालकाने अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्राची प्रत सादर करणे बंधनकारक आहे. कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न कमाल एक लक्ष रूपये असावे व तसे तहसीलदारांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. बालकाचे वय सप्टेंबर 2021 पर्यंत सहा वर्षे पूर्ण हवे. विधवा, घटस्फोटित, निराधार, परितक्त्या व दारिद्य्ररेषेखालील पालकांच्या पाल्यांना प्राधान्य मिळेल. शासकीय- निमशासकीय नोकरदारांच्या पाल्यांना लाभ मिळणार नाही.
अर्जासह पालकाचे संमतीपत्र, विद्यार्थ्याचे दोन पासपोर्ट फोटो, जन्मतारखेचा दाखला, वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2021 अशी आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्याचा शाळेत प्रवेश निश्चित झाल्यावर शाळा बदलता येणार नाही. तसे हमीपत्र तत्पूर्वी पालकांनी देणे आवश्यक आहे.
धारणी प्रकल्प क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या पालकांनी आपल्या पाल्यांना नामांकित निवासी इंग्रजी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी अर्ज करून या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमती सेठी यांनी केले आहे.
निवासी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी अर्ज करावा -प्रकल्प अधिकारी मिताली सेठी
Contents hide