• Sat. Sep 23rd, 2023

नव्या विषाणूवरही भारतीय लस प्रभावी

ByBlog

Dec 30, 2020

नवी दिल्ली : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा आणि शक्तीशाली विषाणू (न्यू स्ट्रेन) आढळल्यामुळे जगभरात चिंतेची लाट पसरली आहे. परंतु, भारतात तयार करण्यात आलेली कोरोनावरील लस नव्या विषाणूवरही प्रभावी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
इंग्लडसोबतच दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूविरोधातही भारतातील लस काम करेल. नव्या विषाणूविरोधात तयार करण्यात आलेली लस काम करणार नाही, याचा एकही पुरावा नाही, असे भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रोफेसर के. विजय राघवन यांनी सांगितले. मागच्या ६ महिन्यांत आता देशात १७ हजारांपेक्षा कमी नवे कोरोनचे रुग्ण सापडत आहेत. दरदिवशी मृत्यू होणार्‍यांची संख्याही ३00 पेक्षा कमी झाली आहे. यातील ५0 टक्के मृत्यू झालेले रुग्ण ६0 किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे आहेत. तर ७0 टक्के मृत्यू पुरुषांचा झाल्याची माहिती आरोग्य सचिवांनी दिली. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि गुजरातमधील झायडस कॅडीला या तीन आघाडीच्या कंपन्या कोरोनावरील लस तयार करत आहेत. आणीबाणीच्या काळात लसीचा परवाना मिळण्यासाठीही काही कंपन्यांनी अर्ज केला असून या अर्जांची छानणी आणि पडताळणी सुरू आहे. केंद्र सरकारसह सर्व राज्य सरकारांनी लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. लसीची शीतगृहात साठवणूक, पुरवठा, गोदामे, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आणि लस वाहतुकीची सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!