• Tue. Sep 26th, 2023

नवीनकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्ष होण्याची गरजचाचण्यांचेप्रमाण वाढवावे – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश

ByBlog

Dec 23, 2020

अमरावती : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. कोरोनाचा हा नवअवतार अत्यंत धोकादायक असून, मास्कच्या वापराची व इतर दक्षतेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. प्रशासनानेही याबाबत कठोर होत चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
अख्ख्या जगात भय अन मृत्यूचे तांडव करणाऱ्या कोरोनाला नववर्षांत अलविदा करून आपण सारेच एकदाचे भयमुक्त होऊ, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण व्हायला लागली होती. त्यामुळे कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य व पोलीस यंत्रणेने सुद्धा सुटकेचा श्वास घेतला होता.
मात्र, परत आता “नवअवतारात”जगातील काही देशात कोरोना विषाणू झपाट्याने पसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.हा कोरोना विषाणू मूळ कोरोना विषाणूपेक्षाही ७० टक्के अधिक घातक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे हे जीवघेणे संकट तूर्त परदेशात असले तरी, वुहानप्रमाणे ते आपल्या उंबरठ्यावर उभे आहे. त्यामुळे आता पूर्वी पेक्षाही अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे.
कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी मेहनत घेतली आहे. आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. अधिक मेहनत घ्यावी लागेल. आरोग्य यंत्रणेने ऑक्सीजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवणे आवश्यक आहे, असे निर्देश त्यांनी दिले.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सहव्याधी (कोमॉरबिड) असलेल्या लोकांची माहिती आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा सहव्याधी रुग्णांशी संपर्क करावा, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची आरोग्यविषयक काळजी घेतानाच त्यांना सतर्क करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले. नागरिकांनीही मास्कचा वापर,सोशल डिस्टनसिंग,अनावश्यक गर्दी टाळणं, आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!