दोन नव्या संघांना आयपीएलमध्ये मंजुरी

अहमदाबाद:आयपीएलमध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. २0२२ च्या सत्रात आयपीएलचे एकूण दहा संघ असतील. गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय प्रथम श्रेणीच्या सर्व खेळाडूंना (महिला आणि पुरुष ) कोरोना महामारीमुळे सामने न होऊ शकल्यामुळे योग्य तो मोबदला देण्यावरही एकमत झाले आहे. २0२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही या सभेमध्ये निर्णय झाला.
२0२१मध्ये आयपीएलचे संघ वाढवणे अतिशय घाईचे ठरेल. निविदा प्रक्रिया, खेळाडूंचा लिलाव, आदी प्रक्रिया इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणे कठीण जाईल. त्यामुळेच २0२२पासून १0 संघांचे आयपीएल असेल. त्यामुळे स्पर्धेमधील सामन्यांची संख्या वाढणार आहे. नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. आयपीएल २0२१ नंतर नव्या दोन संघाबाबत लिलाव प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
जागतिक दर्जाच्या स्पर्धाकरिता करसवलतीसाठी आयसीसीने दिलेल्या मुदतीला आता फक्त आठवडा उरला आहे. याबाबत बीसीसीआय सचिव जय शाह आणि खजिनदार केंद्र सरकारशी चर्चा करणार आहेत.
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-२0 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारताला टिकवायचे असेल, तर पूर्ण करसवलतीची खात्री द्यावी लागेल, अन्यथा ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित होईल. देशातील सध्याच्या कायद्यानुसार क्रीडा स्पर्धाना करसवलत मिळत नाही. यावरच बीसीसीआय सचिव आणि खजिनदार केंद्र सरकारशी चर्चा करतील.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!