दिल्लीत बसून शेती करता येत नाही – शरद पवार

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांवरुन दिल्लीत शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही मोदी सरकारवर वारंवार टीका केली आहे. पवार यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांची मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही, असा टोला शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा आज ३४ वा दिवस आहे. उद्या पुन्हा एकदा सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक होणार आहे. याआधी आज शरद पवार यांनी राजधानी दिल्लीत शेतकर्‍यांची भेट घेतली. उद्याच्या बैठकीत कोणताही तोडगा सरकारने काढला नाही. तर सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावून, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊ, अशी हमी शरद पवार यांनी दिल्याचे आंदोलक शेतकर्‍यांनी सांगितले. महाराष्ट्रातीलही काही शेतकरी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले आहेत. त्यापैकी काही शेतकरी आज पवारांना दिल्लीत भेटले. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये आजवर झालेल्या बैठकीतून काहीच तोडगा निघू शकलेला नाही. पंजाब आणि हरियाणाच्या शेतकर्‍यांनी आंदोलन आता आणखी तीव्र केले आहे. दरम्यान, सरकारने शेतकर्‍यांना पुन्हा एकदा चर्चेचे निमंत्रण दिले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!