• Tue. Jun 6th, 2023

दापोरी येथुन “विकेल ते पिकेल” योजनेचा शुभारंभ .

ByBlog

Dec 15, 2020
    शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना माल विकण्यासाठी शेतकऱ्यांना मदत

मोर्शी तालुका प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने नवीन योजना आणली आहे. “विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान मोर्शी तालुक्यात राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था अधिक बळकट होणार असून शेतकऱ्यांनी कोणत्या पिकांची लागवड, बियाणे ,शेतमालाची प्रतवारी, विक्री व्यवस्थापनआदींची माहिती कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर शेतमालाला चांगला भाव मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेचा भाग म्हणून मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांसाठी शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी उपलब्ध करून दिला जात आहे. हा एक छोटासा प्रयोग असून, मोर्शी तालुक्यातील दापोरी येथून या प्रयोगाला सुरुवात करण्यात आली आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातून मोर्शी तालुक्यातील दापोरी येथे विकेल ते पिकेल या संकल्पनेच्या माध्यमातून भाजीपाला व फळे विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उप विभागीय कृषी अधिकारी राहुल सातपुते, तालुका कृषी अधिकारी कल्पना राठोड, मंडळ कृषी अधिकारी पी. एन.मस्के, कृषी पर्यवेक्षक एम एस फुले, कृषी सहाय्यक दिनेश चौधरी, कृषी सहाय्यक बी एच बोण्डे, कृषी सहाय्यक अवंतिका कोल्हे, बळीराजा संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष रुपेश वाळके, दिनेश बडोरे, समीर विघे, पांडुरंगजी अंधारे, श्रीकांत विघे, आचल कोल्हेकर, यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.
‘विकेल ते पिकेल’ या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील. एकंदरीतच यामागे शेतकऱ्यांची सर्वांगिण प्रगती व्हावी हे ध्येय आहे. हा एक प्रयोग असून या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार, ताजा भाजीपाला वाजवी दरामध्ये उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना या स्टॉलवरुन ताजा भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. —– राहुल सातपुते उपविभागीय कृषी अधिकारी.
शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचललेली असून बाजारपेठेचा कल ओळखून मूल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ हे अभियान उपयुक्त ठरेल. त्यातून शेतकरी चिंतामुक्त होईल

    – रुपेश वाळके


अध्यक्ष बळीराजा संत्रा उत्पादक संस्था.
शेतकऱ्यांनी संघटित होऊन गट शेतीच्या माध्यमातून ज्या मालाला बाजारपेठ आहे तो पिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. कृषी प्रधान देशात शेतकरी अभिमानाने उभा राहिला पाहिजे. त्यासाठी शेतातून थेट ग्राहकांच्या घरापर्यंत अशा प्रकारची साखळी निर्माण करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे .शेतकरी संघटित होणे गरजेचे असून शेती उद्योगक्षम होऊन अन्नदाता सुखी झाला पाहिजे.

    – कु. कल्पना राठोड तालुका कृषी अधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *