• Mon. May 29th, 2023

ते गाव माझे असे

ByBlog

Dec 26, 2020
    धावपळीच्या त्या शहरातून शोधत
    निश्चिंत शांततेचा एक क्षण
    होण्यास मुक्त जरा त्या अटळ बंधनातून
    गावाकडे वळले माझे मन
    जिथे पावित्र्य,औदार्य अन शांतता वसे
    ते गाव माझे असे
      घर माझेच माझ्यावर रुसते थोडे
      सुन्न करायचेच होते तर का गेलास पुढे
      अल्लड प्रश्न असे काही
      तर आठवणींचा भडिमार दुसरीकडे
      तेवढ्यातच अंगणात आम्हा भावंडांचा कल्लोळ मला दिसे
      ते गाव माझे असे
        रात्री मग आजीच्या बटव्यातून निघतात गोष्टी अनेक
        जादूगर चेटकीण, कधी म्हातारी अन भोपळा तर कधी टोपीवाला एक
        त्या गोष्टी पुन्हा ऐकतांना दिसते मग आजोबांची काठी आणि आठवतो त्यांचा रुबाब
        अनुभवांची शिदोरी अख्ख्या गावाला पुरे त्यांची अन स्वभाव चोख हजरीजबाब
        डोळे माझेच भरून येई जेव्हा भेटीने माझ्या
        आजी तिचे आनंदाश्रू पुसे
        ते गाव माझे असे
          शोधाया मग त्या जुन्या रानवाटा
          अनवानी पाय आणि बाभळीचा काटा
          पक्ष्यांच किलबिलणं,फुलपाखरांच फुलणं, पारंब्यावर झुलणं,
          निसर्गाशीच बोलणं,
          नदीच्या शेवाळावर स्वत:ला तोलणं,
          अन वाट फुटेल तिकडे चालणं
          त्या वाटेवर मातीत दिसतात
          माझ्या पावलांचे ठसे
          ते गाव माझे असे
            जुन्या मित्रांसोबतच्या मैफिली भरवतो आम्ही मग शेतात
            ती डबे पार्टी..आंब्याच झणझणीत लोणचं,कुठं हिरव्या मिरच्याचा ठेचा तर बाजरीच्या भाकरी कुणाच्या हातात
            होऊनी संतुष्ट कित्येक दिवस त्या आस लागलेल्या जेवणांनी
            निसर्गाच्या छपराखाली अन मित्रांच्याच सभोवताली परिसर व्यापतो मग घट्ट मैत्रीच्या उफाळलेल्या भावनांनी
            परततांना पण चिंचा बोराने,प्रेम आणि आपुलकीच्या मोहराने भरतो आम्ही खिसे
            ते गाव माझे असे
              गावाच्या एकीकडे,
              नदीच्या थोडं पलीकडे
              जेव्हा बघतो मी माझी शाळा
              आठवतात जीव लावणारे मास्तर, ओसंडून वाहणारा त्यांचा जिव्हाळा
              तिथल्या चिमुकल्यांमध्ये मी शोधतो स्वत:ला,
              बघतो स्वत:ला,
              पडतो त्या मैदानावर पुन्हा पुन्हा
              वाजताच घंटी शाळेची येते भान,
              कळते तो काळ आता झाला रे जुना
              मागच्या बाकावर धुमाकूळ घालणारे ते तिघे वाटे जणु आमचेच आरसे
              ते गाव माझे असे
                अशाच कित्येक आठवणी करून ताज्या, कॅमेऱ्यात डोळ्यांच्या प्रत्येक क्षण करून कैद
                परतूनीया जाण्याची वेळ आता झाली कळताच जरा वाटतो मनाला खेद
                पण वचन पुन्हा येण्याचे घेऊनच
                सोडतात मला ती हक्काची ‘आपली माणसे’
                ते गाव माझे असे
                  डॉ. अमर अगमे
                  Mob No.8975874296

                Leave a Reply

                Your email address will not be published. Required fields are marked *