अमरावती : कृषि विभागातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतावरील प्रत्यक्ष भेटी व निरीक्षणाचे अनुषंगाने तुर पिक सद्या शेंगा भरण्याचे अवस्थेत असुन त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांची अंडी व पहीली अळी अवस्था दिसुन येत आहे. तसेच हरभरा हे पिक सद्यस्थितीत वाढीच्या अवस्थेत असुन साधारण: आठ ते दहा दिवसानंतर फुलोरा अवस्थेत येईल. या दरम्यान घाटे अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता राहील. अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.
शेतकरी बंधुना यावर्षी तुर पिकापासुन चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसापासुन हवामान हे अंशत: ढगाळ वातावरण व रात्रीच्या वेळी तापमानात घट झालेली आहे. असे वातावरण तुर पिकावरील शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग व शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढुन नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच हरभऱ्यावरही घाटे अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याकरीता शेतकरी बंधुनी एकात्मिक किड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास अळ्यांमुळे होणारे नुकसान टाळता येवु शकते.
याकरीता तुर व हरभरा पिकाच्या उंचीपेक्षा थोडे अधिक उंचीवर पक्षी थांबे उभारावेत, याकरीता एक उभी काठी जमिनीमध्ये रोवुन त्यावर एक आडवी काठी बांधावी जेणेकरुन पक्षांना त्या काठीवर बसता येईल, असे पक्षी थांबे विनाखर्चाने तयार करता येतात व पक्षी पिकामध्ये फिरुन अळया वेचुन त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात.
त्याचप्रमाणे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळया व हरभऱ्यावरील घाटे अळीसाठी कामगंध सापळे हेक्टरी दहा लावावे. या सापळयामध्ये सतत तीन दिवस आठ ते दहा नर पंतग आढळल्यास किटकनाशक फवारणीचा निर्णय घ्यावा. याकरीता पहील्या फवारणीमध्ये निंबोळी अर्क 5 टक्के, दशपर्णी अर्क यासारख्या घरगुती किटकनाशकांचा वापर करावा. किडींची आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास शिफारशीप्रमाणे तुर पिकाकरीता क्लोरेंनट्रॅनीलिपोल 18.5 टक्के एस.सी. 3 मि.ली. किंवा इंडॉक्झीकार्य 15.8 टक्के ईसी. 6.6 मि.ली. किंवा लॅब्डा सायहॅलोमेधीन 5 टक्के प्रवाही 10 मि.ली किंवा फल्युबेंडामाईड 20 टक्के डब्ल्युजी 5 ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 4.4 ग्रॅम किंवा क्लोरेन नीलिपोल 9.30+ लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन 4.60 झेडसी 4 मिली प्रती 10 टूर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच हरभ-यावरील घाटे अळीसाठी क्विनॉलफॉस 25 टक्के ईसी. 20 मिली. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के एसजी 3 ग्रॅम किंवा ईथिऑन 50 टक्के ईसी. 25 मिली किंवा फल्युबेंडामाईड 20 टक्के डब्ल्युपी 5 मिली. किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के एस.सी. 2.5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी व आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.
किटकनाशकांची फवारणी करतांना शिफारशीत मात्रेतच फवारणी करावी अन्यथा फुलगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच किटकनाशकांचा वापर सतत करु नये. किटकनाशकांची आलटुन पालटुन फवारणी करावी व फवारणी करतांना सुरक्षा किटचा वापर करुनच फवारणी करावी तसेच मोठया प्रमाणात प्रादुर्भाव आढळुन आल्यास कृषि विभागातील क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय चवाळे अमरावती यांनी केले आहे.
तुरीवरील शेंगा पोकरणाऱ्या व हरभऱ्यावरील घाटे अळीचे व्यवस्थापन
Contents hide