कोल्हापूर : राज्यात सर्वच मध्यवर्ती व जिल्हा कारागृहातील गैरप्रकार रोखण्यासाठी किंबहुना दैनंदिन हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे, असे अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) सुनील रामानंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी ९६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
कळंबा कारागृहात मोबाईल, गांजासद.ृश अमली पदार्थाचा साठा पुरविण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेची दखल घेत रामानंद कोल्हापुरात दाखल झाले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कळंबा कारागृहातील घटना गंभीर आहे. गृहमंत्रालयाने त्याची दखल घेत चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार असून जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल.
कळंबा कारागृहात दोन वर्षांत अनेक गंभीर घटना घडल्या आहेत. मात्र दोषींवर जुजबी कारवाई केली जात असल्याचे निदर्शनास आणून देताच रामानंद म्हणाले, या सर्व प्रकारांची उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकार्यामार्फत विभागीय चौकशी सुरू आहे. संभाव्य कारवाईबाबत आताच भाष्य करणे योग्य नाही. दोन आठवड्यानंतर चौकशी अहवाल हाती येताच कारवाईची तीवता दिसून येईल.
जेल मॅन्युअलप्रमाणे कारागृहात घडलेल्या घटनांच्या चौकशीचे पोलिसांना अधिकार आहेत. त्यानुसार मोबाईल, गांजा प्रकरणाचीही पोलिस अधिकार्यांमार्फत चौकशी होईल. त्यासाठी कारागृहात विशेष कक्ष उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगून रामानंद म्हणाले, राज्यातील सर्वच मध्यवर्ती कारागृहासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे गैरप्रकार टळतील. शिवाय अत्याधुनिक पद्धतीची सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. त्यासाठी ९६ कोटींचा निधीही मंजूर झाला आहे.
ड्रोनची राज्यातील कारागृहांवर करडी नजर
Contents hide