• Sun. May 28th, 2023

डॉ. पंजाबराव देशमुख : जीवन संघर्ष व चळवळी

ByBlog

Dec 27, 2020

विदर्भामध्ये जन्मलले डॉ. पंजाबराव देशमुख प्रतिकूल परिस्थितीमधून आपल्या आयुष्याची वाटचाल करीत अन्यायाविरुद्ध लढणारे धुरंदर म्हणून जगाला परिचित झाले. त्यांच्या जीवनसंघर्षामधून अनेक चळवळी जन्माला आल्यात, आपल्या उदात्त विचारधारेच्या माध्यमातून माणूस घडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. डॉ. पंजाबरावाचे कार्य हे बहुश्रूत असल्यामूळे सर्वसामान्य माणसाला देखील भाऊसाहेब अपरिचित नव्हते. तत्कालिन युवापिढीवर त्यांच्या कर्त्तृत्वाचा फार मोठा प्रभाव होता प्रा. मधुकर केचे सुद्धा याला अपवाद नव्हते म्हणूनच ते म्हणतात “ त्यांना दुरून पुष्कळदा पाहिले पुरेसे दिसले नाहीत मग सतत आठवडाभर सहा जिल्हे फिरून त्यांच्या संस्था पाहिल्या तेव्हा ते थोडेसे दिसले, नंतर त्यांचा सहवास लाभला पुन्हा काहिसे दिसले, आणि एक दिवस त्यांच्या निर्वाणीची बातमी एैकली, तेव्हा जाणवले की, आपले बरेचसे पाहणे राहूनच गेले. त्यांना अधिकाधिक पाहिलेल्या लोकांना भेटलो त्यांचे, त्यांच्याबद्दलचे जे मिळेल ते वाचून काढले तरीही खूप पाहणे उरले’’1 डॉ. पंजाबराव देशमुखांच्या कार्याचा आवाका फार मोठा होता. वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांचे भरीव कार्य भाऊसाहेबांबद्दल बरेच काही सांगून जाते. भाऊसाहेबांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एैट, त्यांच्या कार्याचा आवाका, तसेच त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांची काम करण्याची पद्धती, लोकांशी वागण्याची तर्हा याशिवायही इतर अनेक गोष्टींचा अंतर्भाव असल्याचे जाणवते.
डॉ. पंजाबरावांचे जीवन विशाल घटनांनी व्यापले आहे. त्यांच्या चरित्राला अद्भूततेचे कंगोरे लाभले आहे, या विशाल जीवनाचा परामर्श घेतांना डॉ. वि. भि. कोलते म्हणतात “भाऊसाहेबांचे जीवन इतके विशाल आहे, इतके विविध आहे, इतके आघात-प्रघातांनी भरलेले आहे की त्यातील एकेकाचे वर्णन करायचे म्हटले तर तो मोठा ऐतिहासिक ग्रंथ होऊ शकेल.’’2 अशा शब्दांमधून भाऊसाहेबांचा गौरव त्यांनी केला.
शिक्षणाच्या निमित्ताने पुणे येथे आल्यानंतर लंडनला जाण्याचे बीजही याच दरम्यान त्यांच्या मनामध्ये संचारल्याचे दिसून येते. ‘पापळ’ या गावामध्ये इयत्ता तिसरी पर्यंतच शाळा होती. चौथा वर्ग उघडेल या आशेवर त्यांचे एक वर्ष वाया गेले. मुळात शिक्षणाची आवड असलेले डॉ. पंजाबराव पुढील शिक्षणासाठी चांदूर, कारंजा, अमरावती करत शालान्त परीक्षेमध्ये विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. सरकारने या हुशार मूलाला चौदा रुपये महिन्याची शिष्यवृत्ती देवू करून मध्य प्रदेशातल्या एखाद्या महाविद्यालयामध्ये नाव दाखल करण्याची सूचना केली. डॉ. पंजाबरावांनी मध्यप्रदेशातील कुठलेही महाविद्यालय न निवडता पुढील शिक्षणासाठी पुणे हे शहर निवडले. पुण्याला मात्र त्यांना शिष्यवृत्ती मिळणार नव्हती तरीही त्यांनी त्याची पर्वा केली नाही. विचारवंताचे पीठ म्हणून मान्यता पावलेल्या पुण्यामध्ये टिळक-आगरकरांच्या फर्गुसन महाविद्यालयामध्ये त्यांनी नाव दाखल केले. या पुण्यातील वास्तव्यातूनच लंडनला जाण्याचा बेत त्यांनी आखला. वडिलांनी कर्ज काढून पुढील शिक्षणासाठी मुलाला लंडनला पाठविण्याचे धाडस त्या काळी केले. शेवटी पंजाबरावांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले अनेक आर्थिक अडचणींना तोंड देत ते लंडनला पोहचले.
डॉ. पंजाबराव देशमुख यांची आय.सी. एस. उत्तीर्ण होण्याची प्रबळ ईच्छा होती. आय.सी. एस. झाल्यानंतर आपण सरकारी नौकरी करायची नाही असाही जवळ-जवळ त्यांचा निर्णय पक्का झाला होता. याच दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा सहवासही त्यांना लाभला होता. त्यांनीही आय.सी. एस. उत्तीर्ण केल्यानंतर सरकारी नौकरी नाकारली. परंतु नियतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांना आय. सी. एस. होवू दिले नाही म्हणजे प्रशासकीय सेवेतील या सर्वोच्च परीक्षेमध्ये त्यांना अपयश स्वीकारावे लागले. या दरम्यान आर्थिक विवंचनेने त्यांना ग्रासले होते. परिणामी त्यांना भारतात परत यावे लागले. त्यावेळी ‘श्रीमंत बोके यांनी’ पुन्हा उसनवार पैसे देवून त्यांना लंडनला रवाना केले. आता मात्र आय. सी. एस. चा नाद सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. कारण वाढत्या वयामुळे ते त्या परीक्षेसाठी अपात्र ठरत होते. पण शिक्षण आत्मसात करण्याची त्यांची जीद्द मात्र वाखाणण्यासारखी होती. आय.सी. एस. साठी एम. ए. करण्याच्या या काळातच त्यांनी बॅरीस्टरच्या अभ्यासक्रमासाठी लागणारी प्रवेश परीक्षा खाजगी रित्या अभ्यास करून उत्तीर्ण केली. प्रा. किथ यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी एम. ए. ऐवजी आनर्स ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच दरम्यान ‘संस्कृत रिसर्चवृत्ती’ संस्कृतच्या सर्वोत्तम विद्यार्थ्यास मिळत असे, त्यासाठी कठीण अशी चाचणी होती ती कठीण परीक्षा पास करून ‘व्हॅन्स डनलॉप स्कॉलरशीप’ त्यांनी मिळविली. सालिना पंधराशे रुपये म्हणजे शंभर पौंड असे तीचे स्वरूप होते. दरम्यान त्यांचे संशोधन चालूच होते. ‘वैदिक वाङ्मयात वैदिक धर्माचा उद्गम, विकास व त्यांचा पारंपरिक संबंध’ हा मूळ प्रबंधाचा विषय होता त्यासाठी त्यांना डी.फिल. ही सन्मान्य पदवी मिळाली. दरम्यान बॅरीस्टरच्या परीक्षेमध्येही ते उत्तम दर्जाने पास झाले. शेवटी ‘एम.ए. आनर्स, डी.फिल, बार अॅीट लॉ’ अशा पदव्या संपादन करून ते मायदेशी परतले यामध्ये त्यांच्या अभ्यासाचा आवाका आणि जिद्द यांचे विलोभनीय दर्शन घडते.
इंग्लडमधून मायदेशी परतल्यानंतर ते अमरावतीमधेच वास्तव्यास राहिले. डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. या सावकारी पाशातून मुक्त होण्यासाठी त्यांनी अमरावती येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला या व्यवसायामध्ये त्यांचा जम बसला. चांगली मिळकत यायला सुरूवात झाली पाहता-पाहता ते कर्जमुक्त झाले आणि अमरावती शहरामध्ये एक घरही त्यांनी केले. दरम्यान अमरावती शहरामध्ये नामवंत वकील म्हणून त्यांची ख्याती झाली होती. त्यावेळी शहरामध्ये सुरू असलेल्या मराठा हायस्कूल या शाळेमध्ये अध्यापक म्हणूनही ते कार्य करीत होते अगदी नि:शुल्क सेवा ते येथे देत होते. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्याला खर्या अर्थाने सुरूवात येथूनच झालेली आहे. पुढे मराठा हायस्कूलचे अध्यक्षपद त्यांचेकडेच आले, त्यांनी श्रद्धानंद वसतिगृहाची स्थापना करून गोर-गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. याच दरम्यान शिवाजी शिक्षण संस्थेचीही मुहुर्तमेढ रोवली. कर्जमुक्त झाल्यानंतर वकिलीचा व्यवसाय त्यांनी सोडून दिला, स्वत:ला पुर्णपणे सामाजिक कार्यामध्ये झोकून घेतले. ‘शेती आणि शिक्षण’ हा त्यांचा आवडीचा विषय होता. या क्षेत्रातील विकासासाठी त्यांनी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले. याच शहरात त्यांचे अनेक सोहळे पार पडले. अमरावती शहर हे त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण केंद्र ठरले. वेगवेगळ्या अवस्थेमध्ये डॉ. पंजाबरावाना या शहराने बघितले.
वर्हाड प्रांतामध्ये ब्राह्मण विरुद्ध ब्रह्मणेत्तर अशा दोन गटात राजकीय समीकरण विभागल्या गेले असल्यामुळे डॉ. पंजाबरावासारख्या जाती निरपेक्ष माणसाची मोठी अडचण निर्माण झाली. पर्यायाने त्यांना स्वत: तीसरी शक्ती उभी करावी लागली. शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘शेतकरी संघा’ची स्थापना केली. यासोबतच येथल्या ज्वलंत प्रश्नांना तोंड फोडणारे ‘महाराष्ट्र केसरी’ हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले. नंतर नागपूर मधूनच अमरावतीच्या राजकारणाकडे लक्ष पुरविले. जिल्हा कौंसिलच्या निवडणुकीमध्ये स्वत: उभे राहिले. बर्याच मोठ्या प्रमाणात विरोध असतांनाही केवळ सर्वसामान्य जनतेच्या भरोवस्यावर त्यांनी विजय संपादन केला. त्या पदावर विराजमान झाल्यानंतर एका लोकयुद्धाला सुरूवात झाली. ‘तुम्ही मला जास्त कर द्या मी तुम्हाला शिक्षण देईन’ भाऊसाहेबांना तळागाळातून विरोध झाला. इंग्रज सरकारनेही मध्यस्थी केली, विरोधकांना तर संधीच चालून आली. भाऊसाहेब जुमानले नाही ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. परिणामी जिल्ह्यामध्ये सर्वत्र प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हायला लागली, लोकांना भाऊसाहेबांचा दृष्टिकोन कळायला लागला. सक्तीचे प्राथमिक शिक्षण त्यांनी सुरू केले. संपूर्ण भारतात शिक्षणाच्या क्षेत्रात जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आला. याच दरम्यान त्यांनी अंबादेवी मंदिरात अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाचा यशस्वी सत्याग्रह पार पाडला, नंतर ते नागपूर प्रांतामध्ये मंत्री झाले. देवस्थानाची संपत्ती मुलांच्या शिक्षणासाठी वापरायची असा भाऊसाहेबांचा आग्रह होता, पण कर्मठ लोकांसमोर भाऊसाहेबांना हार पत्करावी लागली. नंतर ‘कुसुमावंती देशपांडे’ या महिला असल्यामुळे प्रोफेसर म्हणून रुजू करून घेता येणार नाही, ही गोष्ट भाऊसाहेबांना खटकली व त्यांनी कुसुमावती बाईचा पक्ष उचलून धरला व त्यांना न्याय मिळवून दिला. बदल्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागला. नंतर सावकरांच्या घशातून सामान्य शेतकर्यांची जमीन सोडविण्याच्या उद्देशाने दंड थोपटले व ‘कर्ज लवाद कायदा’ मंजूर झाला. जमीनदार, वतनदार, सावकार वर्ग भाऊसाहेबांच्या विरोधात गेला शेवटी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. आणि परत अमरावतीला आले येथे आल्यानंतर त्यांनी सहकारी बँका आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. शेतकर्यांच्या विकासाच्या दृष्टिने त्यात शुद्धता निर्माण करण्यामध्ये ते यशस्वीही झाले. “भाऊसाहेबांच्या संपूर्ण कार्य कर्तृत्त्वाची बैठक म्हणजे त्यांचे तर्कशुद्ध विचार ! त्यांनी आयुष्यभर जोपासलेली मानवी मूल्ये त्यांच्या वैचारिक अध्ययनातून उपजली होती.’’3 मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्या कार्यामध्ये सामावला होता.
भाऊसाहेबांचा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामधील सहभाग, स्वातंत्र्याबद्दलची त्यांची तगमग लक्षात घेण्यासारखी आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी मराठ्यांमधील झुंजारवृत्ती जागविण्यासाठी ‘मराठा लीग’ स्थापन केली होती. हे मराठा तेज जागे झाले तर आपल्यालाही सैन्यांसाठी त्याचा उपयोग करून घेता येईल या उद्देशाने इंग्रजांनी या संघटनेवर कुठलीही हरकत घेतली नाही. 5 नोव्हेंबर 1939 ला मराठा लीगने नाशिक येथे मराठा परिषद घेतली. बरेच संस्थानिक आणि मराठा तरूण परिषदेच्या निमित्ताने एकत्रित जमले होते त्याच दरम्यान सह्याद्री विमा कंपनीच्या कामानिमित्ताने भाऊसाहेब नाशिकला आले होते. परिषदेला सुरूवात झाली, डॉ. पंजाबराव देशमुख आपल्या सहकार्यासह प्रेक्षकामध्ये बसले होते. नुसती व्याख्यानबाजी चालली होती. इंग्रज सरकारला दुसर्या महायुद्धामध्ये मराठा समाजाने कशी मदत करावी, याचा विचार-विमर्श त्या परिषदेमध्ये चालू होता. उपस्थित श्रोत्यांना परिषद कंटाळवाणी होत असतानांच काकासाहेब वाघ भाऊसाहेबांकडे सरकले, भाऊसाहेब नेमके याच प्रतिक्षेत होते. भाऊसाहेबांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली अत्यंत मुद्देसूद आणि जहाल भाषण त्यांनी त्यावेळी केले. मराठा समाजाला त्यांच्या अस्तित्त्वाची ओळख त्यांनी त्या भाषणातून करून दिली. व्हायच्या तोच परिणाम झाला सारे सभागृह जय भवानी-जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणा देवू लागले आणि आमचा साम्राज्यवाद्याच्या युद्धाशी काहिही संबंध नाही हा ठराव एकमताने पारीत करण्यात आला. उपस्थित संस्थानिकांमध्ये भाऊसाहेबांचा दरारा निर्माण झाला. मराठा तरूण इंग्रजाच्या दिमतीला बांधला जावू नये तर त्याने स्वत:ला देशसेवेसाठी वहावून घ्यावे असा संदेश त्यांनी मराठा तरुणाला दिला. याच प्रसंगामूळे देवास संस्थानचे राजे खासेसाहेब पवार यांनी भाऊसाहेबांना आपल्या संस्थानामध्ये बोलावले व तेथे इतर राज्याशी व प्रजेशी संबंध पाहण्याचे काम त्यांना करावे लागले. दरम्यान चले जावच्या चळवळीमध्ये भाऊसाहेबांच्या सर्व संस्थामधील कायकर्ते सहभागी झाले. त्यांचा क्षेत्र संघ, भारत सेवक दल, शेतकरी संघ, श्रद्धानंद व शिवाजी शाळा येथली तरणी पोरं यांनी त्या चळवळीत धूम मचावली. श्रद्धानंदची निम्मे पोरे पोलीसांनी डांबली, त्यांचे वार्डन फरकाडे यांना तर तीन वर्ष सक्त मजुरीवर जावे लागले. हे सर्व सुरू असतानांच भाऊसाहेब पुन्हा एका ‘मार्शल रेस कॉन्फरंस’ नावाच्या संस्थेत शिरले. इंग्रजांनी लष्करभरतीच्या उद्देशाती संस्थानाकरवी ती उभी केली होती. अहीर, जाट, गुजर, रजपूत, या अ-ज-ग-र आद्याक्षराच्या बलाढ्य जमातीची ती संघटना होती. ही संघटना चालविणारे छोटुराम चौधरी हे खासेसाहेबांचे दोस्त होते. पाटण्याला त्या संघटनेचे अधिवेशन होते खासेसाहेब परिषदेचे अधिवेशनाचे अध्यक्ष होते पण ते आजारी असल्यामुळे परिषदेचे सर्व अधिकार त्यांनी भाऊसांहेबांकडे सुपूर्द केले. भाऊसाहेब खास राजाचे प्रतिनिधी म्हणून तेथे गेले. दरबारी थाटात क्षात्रजमातीच्या प्रचंड मेळाव्यासमोर त्यांनी आपले भाषण सुरू केले अतिशय ज्वालाग्राही स्वरूपाचे त्यांचे ते भाषण होते. इंग्रज सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. अशाप्रकारे खासेसाहेबांच्या निधनानंतर त्यांनी देवास सोडले. त्यांच्या विचारांमधून अनेक चळवळींना मूर्त स्वरूप दिले. “लोकविद्यापीठ भारत कृषक समाज, ग्रामीण महाविद्यालये कस्तुरबा हेल्थ सेंटर, ग्रामीण महिला मंडळे, तरुणांकरीता ग्रामोद्योग मंडळे, व्यायामशाळा इत्यादी संस्था निर्माण करून त्यांनी स्वत:च्या जीवनात बहुआयामी झेप घेतलेली होती. त्यातच ज्ञानाच्या मक्तेदारीविरुद्ध बंड पुकारणे व मागासवर्गीय समाजाला जीवन जगण्याकरीता कृतशील मार्गदर्शन करून निरनिराळ्या संस्थाद्वारे वाटा निर्माण करणे हे खर्या अर्थाने महान कार्य होय.’’ 4 गोर-गरीब, बहुजन समाजाच्या उन्नतीचे महत्तम कार्य त्यांनी पार पाडले.
आझाद हिंद सेनापतीवरचा खटला चालविण्याच्या उद्देशाने त्यांनी दिल्ली गाठली. भाऊसाहेबांची झेप आता देशव्यापी झाली होती. 1946 च्या सुमारास श्री क्रिप्स यांचे मंडळ भारतात आले. त्या कमीशन समोर झुंजार जमातीची भूमिका मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भाऊसाहेबांनी केले. ‘चले जाव’ च्या तालावरच त्यांनी आपली भूमिका मांडली. दरम्यान घटना समितीचे सदस्य म्हणून त्यांना काम करावे लागले. डॉ. आंबेडकर, कामत, डॉ. राजेन्द्रप्रसाद या दिग्गज मंडळीसोबत भारतीय घटना बनविण्याच्या महत्तम कार्यामध्ये सहभागी झाले.“घटना समितीतील भाऊसाहेबांचे कार्याने त्यांच्या भावी जीवनाला वेगळेच वळण दिले, भारतीय सांसदीय मंडळाचे विदर्भातील ते अग्रगण्य नेते समजले जावू लागले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप केंद्रीय शासनावर निश्चितपणे पडली.’’5 पूढे ते देशाचे कृषीमंत्री झाले. त्यांनी स्वत:ला पूर्णत: त्या कामामध्ये झोकून घेतले. त्या काळात किसानांचे मेळावे त्यांनी भरविले. येथल्या शेतकर्याला त्यांनी सन्मान मिळवून दिला. मंत्रीमंडळात ते सतत दहा वर्षे होते. मंत्रीमंडळातून बाहेर पडल्यानंतरही त्यांचा कामाचा सपाटा सुरूच होता. अविकसित समाजाच्या विकासासाठी आरक्षणाचा पुरस्कारही त्यांनी केला. सरकारने प्रथम मागास जमातीना सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे मग आपोआपच सार्या जातीमधील लोक बलवान होतील. असा आग्रह त्यांनी धरला.
अशा पद्धतीने भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख हे अनेक चळवळींना जन्म देणारे त्यांना आकार देणारे, प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या प्रेरणेमधून व कृतीमधून अस्पृश्यता निवारण, शेतकर्यांचे प्रश्न, स्त्रीयांविषयीचे प्रश्न, शिक्षण विषयक दृष्टिकोन आणि कार्य तसेच स्वतंत्रता आंदोलनातील सहभाग, राजकीय कारकीर्द या सर्वच गोष्टींना त्यांच्या विचारामधून चळवळीचे स्वरूप प्राप्त झालेले दिसते. एकूणच उदात्त मानवी मूल्याचे धनी असणारे भाऊसाहेब उपेक्षितांच्या, शोषितांच्या गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी आयुष्यभर लढत राहिले.

    संदर्भ :
    1. प्रा. मधुकर केचे, धन्यता (मनोगत) डॉ. पंजाबराव देशमुख चरित्र व कार्य, ठोकळ प्रकाशन, लक्ष्मी रस्ता, पुणे-2 डिसेंबर 1967
    2. डॉ. वि. भि. कोलते, प्रस्तावना, डॉ. पंजाबराव देशमुख चरित्र व कार्य, लेखक मधुकर केचे,ठोकळ प्रकाशन, लक्ष्मी रस्ता, पुणे-2 डिसेंबर 1967
    3. कल्पना देशमुख, समाजसुधारक- डॉ. पंजाबराव देशमुख, लोक वाङ्मय गृह, मुंबई, डिसेंबर 1997, पृष्ठ क्र. 38
    4.डॉ. मुरलीधर देशमुख, समाज क्रांतीचा उद्गाता व प्रवक्ता, लोकमहर्षी- भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख गौरव ग्रंथ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, डिसेंबर 1999, संपादक- डॉ. सुभाष सावरकर, पृष्ठ क्र. 59
    5. प्रा. रघुनाथ कडवे, भारत कृषक भूषण- भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख, संस्कार प्रकाशन, नागपूर, प्रथमावृत्ती डिसेंबर 1986, पृष्ठ क्र. 138
    प्रा. पंकज वानखेडे
    मराठी विभागप्रमुख
    कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,
    किरण नगर, अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *