अमरावती : नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत. विकासकामांसाठी जिल्ह्याला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.
तिवसा नगर पंचायत अंतर्गत 1 कोटी 40 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्रांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. तिवसा नगरपंचायतचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, मुख्याधिकारी पल्लवी सोटे, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मुकुंद देशमुख, अतुल देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
तिवसा शहरातील धार्मिक स्थळे, सामाजिक, शैक्षणिक आदी कामांसाठी 1 कोटी 40 लाख रुपयांचा निधी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी उपलब्ध करून दिला. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका, संत शिरोमणी संताजी महाराज सभागृह, नवीन तहसील ते क्रीडा संकुलपर्यंत रस्ता बांधकाम, रतनगीर महाराज मंदीर परिसर सौंदर्यीकरण, महानुभाव मंदीर रस्ता बांधकाम, गजानन महाराज मंदीर, साईबाबा मंदीर सभागृहाचे सौंदर्यीकरण, गौतम मुंदे गुरुजी ते माध्यमिक विद्यालय रस्ता बांधकाम, अंकुश देशमुख ते खाकसे यांच्या घरापर्यंतचा रस्ता बांधकाम, ओपन जीम व उद्यानाचे सौंदर्यीकरण, गजानन काळे यांच्या घरासमोरील उद्यानाचे सौंदर्यीकरण, आनंदवाडी येथील बौध्दविहाराचे सौंदर्यीकरण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे बांधकाम, घनकचरा डेपोची संरक्षण भिंत व विकासकाम, आनंदवाडी येथील पुलाचे बांधकाम व इतर विकासकाम आदी विविध कामांसाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी निधी मिळवून दिला.
यापुढे इतरही विकासकामांना चालना मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू. गौण खनिज निधी 2020-21 अंतर्गत विकासकामे करण्यासाठी हा निधी मिळाला आहे. जिल्ह्याला निधीची कमतरता पडू देणार नाही. प्रशासनानेही ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
जिल्ह्याला निधीची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर
Contents hide