• Thu. Sep 21st, 2023

खाजगी कंपनीतील भरगोस पगाराची नोकरी नाकारत झाला पीएसआय

ByBlog

Dec 26, 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2018 मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल मार्च 2020 मध्ये जाहीर झाला ,या मध्ये जि. औरंगाबाद ता. गंगापूर ,रांजणगाव (शेणपुंजी) गावचे रहिवासी असलेले मयूर तेजकुमार निकम (देशमुख) यांची निवड झाली. 2017 मध्ये झालेल्या आयोगाच्या परीक्षेत मुख्य परीक्षेने हुलकावणी दिल्या नंतर मयूर यांनी जोमाने अभ्यास करत खुल्या प्रवर्गामधून उत्तीर्ण होऊन यश संपादन केले.
मयूर यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या आई जयश्री निकम यांना दिले. लहान वयातच वडिलांचे निधन झाल्या नंतर मुलांना अधिकारी बनवण्याचे स्वप्न मनाशी बाळगून असलेल्या त्यांच्या आईने खाजगी कंपनी मध्ये नौकरी करत मुलांचे शिक्षण पूर्ण केले.
लहान वयापासूनच अभ्यासात हुशार व खेळात तरबेज असलेल्या मयूर यांनी शासकीय तंत्रनिकेतन,औरंगाबाद येथून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला .
मयूर यांनी घरची हलाखीची परिस्थिती पाहता खाजगी कंपनी मध्ये नौकरी करून पैशाची जमवाजमव केली व पुढे पदवी चे शिक्षण पूर्ण केले.
नांदेडच्या श्री गुरू गोबिंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली,वेगवेगळ्या कार्यक्रमां भाग घेत त्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिला. त्यांनी कॉलेज तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या “काँस्ट्रोमॅटेक्स” या स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात प्रतिष्टेच्या मानल्या जाणाऱ्या प्रदर्शनाचे नियोजन करत आपल्या नेतृत्व गुणांची ओळख करून दिली.
कॅम्पस प्लेसमेंट मधून दिल्लीतील नामांकीत कंपनी मध्ये मिळालेली भरगोस पगाराची नौकरी नाकारत त्यांनी आईचे मुलाला अधिकारी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग निवडला व त्यासाठी पुण्याला राहून अभ्यास करायचा निर्णय घेतला.
सुरुवातीला आलेल्या अपयशानंतर खचुन न जाता त्यांनी जिद्दीने प्रयत्न चालु ठेवले. कुटुंबाकडून मिळणारा मानसिक आधार त्यांना अधिकाधिक अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करत होता हे त्यांनी यावेळी बोलून दाखवले तसेच या आनंदाच्या क्षणी वडिलांची उणीव जाणवत असल्याची खंतही व्यक्त केली. यापुढे आणखी मेहनत करुन या पेक्षाही मोठे यश संपादन करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली.
स्पर्धा परीक्षेच्या यशाची गुरुकिल्ली सांगताना त्यांनी अभ्यासातील सुसंगतपणा ,बाजारात उपलब्ध असलेल्या शेकडो पुस्तकांमुळे गोंधळूण न जाता योग्य मार्गदर्शन घेऊन केलेली पुस्तकांची निवड व बदलता परीक्षा पॅटर्न दिवसेंदिवस वाढनारी स्पर्धा या नुसार स्वतःला बदलण्याची गरज बोलून दाखवली.
आईचा आशीर्वाद ,जिद्द आणि एका जबाबदार मुलाची मेहनत अशी जोड जमवत आलेल्या या यशाचे रांजणगाव मधील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे .

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    अमरदीप दवणे
    स्थापत्य अभियंता
    नांदेड
    Mob No.7798507143