• Tue. Jun 6th, 2023

केजरीवालांकडून आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना मोफत वाय-फाय सेवा

ByBlog

Dec 31, 2020

नवी दिल्ली : गेल्या महिन्याभरापासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांसाठी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाने शेतकर्‍यांसाठी मोफत वाय-फाय सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल सरकार शेतकर्‍यांसाठी सिंघू सीमेवर फ्री वाय-फाय हॉट स्पॉट्स लावणार आहे. आम आदमी पक्षाचे नेता राघव चड्ढा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
खराब नेटवर्कमुळे आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना इंटरनेट वापरण्यामध्ये आणि कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलिंग करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांची समस्या सोडवण्यासाठी फ्री वाय-फाय हॉट स्पॉट्स लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतल्याची माहिती राघव चड्ढा यांनी दिली.
चड्ढा म्हणाले, फ्री वाय-फाय सेवा आंदोनकर्त्या शेतकर्‍यांना केवळ कुटुंबासोबत व्हिडिओ कॉलिंगच नव्हे तर भाजपाच्या खोट्या प्रचाराला देण्यासाठीही फायदेशीर ठरेल. आंदोलनकर्त्यांकडून ज्या ज्या ठिकाणी वाय-फायची मागणी होईल तिथे हॉट स्पॉट लावले जातील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान ५ डिसेंबरला झालेल्या बैठकीच्या पलीकडे जाऊन केंद्राने एक पाऊल पुढे टाकले तरी तोडगा निघेल, अन्यथा शेतकरी संघटनांना दीर्घकाळ संघर्ष करावा लागेल, असे मत स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, शेतकर्‍यांचा बुधवारचा ट्रॅक्टर मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे. शेतकरी आंदोलनाचा मंगळवारी ३४ वा दिवस होता. दिल्लीच्या वेशींवरील आंदोलकांचे साखळी उपोषणही कायम आहे. केंद्र सरकार व शेतकर्‍यांमध्ये होणार्‍या चर्चेत तोडगा निघणार का? हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज होणार्‍या बैठकीनंतर मिळणार आहेत, त्यामुळे सगळ्यांचे लक्ष बैठकीकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *