• Wed. Sep 27th, 2023

कापूस खरेदीच्या अनुषंगाने पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांची पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा

ByBlog

Dec 26, 2020

अमरावती : गेल्या दहा वर्षांतील विक्रमी कापूस खरेदी गत हंगामात शासनाकडून करण्यात आली. यंदाही मोठी कापूसखरेदी होण्यासाठी पूर्वतयारी व नियोजनासाठी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली व परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश दिले. आमदार बळवंतराव वानखडे, पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर सुरवातीपासून प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबवत असताना शेतकरी हिताचे निर्णय व योजनांची अंमलबजावणीही भरीवपणे व्हावी यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्या तत्काळ दूर करण्यात आल्या. पूर्वीची 18 जीनची संख्या आता 25 वर नेण्यात आली. त्यासाठी 10 कृषी पर्यवेक्षक उपलब्ध करुन देण्यात आले. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. विशेष पाठपुरावा करुन सीसीआयमार्फत केंद्र सुरू करण्यात आले त्यामुळे कापूस खरेदीला वेग येऊन मोठी कापूस खरेदी झाली. शासन स्तरावरही या अडचणीसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केल्याने शासनाकडून या अडचणी तत्काळ सोडविण्यात आल्या व राज्यात गत दशकातील सर्वात मोठी कापूस खरेदी झाली.
यंदाही अधिकाधिक कापूस खरेदी संदर्भात परिपूर्ण नियोजन होणे आवश्यक आहे. गोदामांची उपलब्धता, ग्रेडरची संख्या, साठवणूक व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक तयारी असावी. पणन महासंघाच्या सबंध कापूस खरेदीच्या दृष्टिने ज्या अडचणी असतील, त्यांचा शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!