• Sat. Sep 23rd, 2023

ऑनलाईन शस्त्र खरेदीला प्रतिबंध पोलीस आयुक्तांकडून आदेश जारी

ByBlog

Dec 17, 2020
    ई- विक्री कंपन्यांना बजावली नोटीस
    खरेदी करणा-यांची माहिती मागवली

अमरावती : ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून शस्त्र खरेदीला करणारा आदेश पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी आज जारी केला. अमरावती शहरातील काही गंभीर गुन्ह्यात आरोपींनी वापरलेले शस्त्र ऑनलाईन खरेदी केल्याचे निदर्शनास आल्यावरून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
शहरात फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, शापक्लूज डॉट कॉम अशा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शस्त्रविक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यावरून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अन्वये हा आदेश पारित केला आहे. भारतीय हत्यार कायदा कलम चार सहकलम 25 नुसार तीक्ष्ण धार असलेले प्राणघातक शस्त्र ज्याच्या पात्याची लांबी 9 इंचापेक्षा जास्त किंवा पात्याची रूंदी दोन इंचाहून जास्त आहे, ते बाळगणे हा दखलपात्र गुन्हा आहे. या शस्त्र विक्रीवर बंदी घालण्यात आली असून, अशी विक्री करणा-या कंपन्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    शस्त्रखरेदी करणा-यांची माहिती मागवली

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून शस्त्रखरेदी करणा-या शहरातील व्यक्तीचे नाव, पत्ता, शस्त्राचा प्रकार, फोटो व इतर आवश्यक माहिती मिळवून ती सादर करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत.
शहरातील काही गंभीर गुन्ह्यातील आरोपींनी ऑनलाईन शस्त्र विकत घेतल्याचे आढळले. अशा शस्त्र विक्रीमुळे शहरात गुन्हेगारांना घरपोच शस्त्र उपलब्ध होत असून, गुन्हेगारीस पाठबळ मिळू शकते. त्यामुळे हा आदेश पोलीस आयुक्तांकडून जारी करण्यात आला.