ईडीच्या कारवाईवर संजय राऊत आक्रमक

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस पाठवल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत ईडी तसेच भाजपावर गंभीर आरोप केल्यानंतर संजय राऊत यांनी ईडीसमोर हजर होण्यासाठी ५ जानेवारीपयर्ंत वेळ मागितला असल्याची माहिती दिली आहे. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे.
ईडीने नोटीस पाठवल्यानंतर संजय राऊत यांनी कोणामध्ये किती जोर आहे. पाहुया अशा आशयाचे ट्विट केले होते. त्यानंतर आता त्यांनी अजून एक शायरी ट्विट केली आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्याचा तुम्ही प्रयत्न झाला, तेव्हा मी उभारी घेतली आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी सोमवारी धमकावलेही जात असून मी कुणालाही घाबरत नाही. मी या सगळ्यांचा बाप आहे असे म्हटले होते. यासंबंध बोलताना ते म्हणाले की, मला धमकी देणारा अद्याप जन्माला आलेला नाही. सरकार पाडण्यासाठी काही करू असे सांगितले होते, त्याला मी धमकी मानतो. जो मला धमकी देईल तो राहणार नाही. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. जी गोष्ट आम्हाला लोकांसमोर ठेवायची होती ती पत्रकार परिषदेत सांगितली आहे. अजून काही गोष्टी आहे त्यादेखील सांगेन. आम्ही जे सांगितले आहे ते ईडी आणि देशासाठी मार्गदर्शक असेल, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. मी अद्याप नोटीस पाहिलेली नाही. नोटीस माझ्या नावावर नाही. मला नोटीस पाहण्याची गरज नाही. हे सगळं राजकारण कसं चालतं मला माहिती आहे. त्यामुळे हे सुरू राहू दे आम्ही उत्तर देऊ, असेही त्यांनी सांगितले. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. कागदपत्रांमध्ये ही माहिती उघड आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!