• Sat. Jun 3rd, 2023

अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन गरजेचे – जिल्हाधिकारी शैलेश नवाल

ByBlog

Dec 23, 2020

अमरावती : बेदरकारपणे वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींची वाहतूक करणे आदी अपघातांच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणा-या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले. रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गीत्ते, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
बहुतांशी अपघाती मृत्यूत क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींची वाहतूक, बेदरकारपणे वाहन चालविणे, सीटबेल्ट न बांधणे आदी कारणे आढळतात. त्यामुळे नियमभंग करणा-यांवर वेळोवेळी कारवाई गरजेचे आहे. जादा भार वाहनांची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहिम आखावी. रस्ता सुरक्षिततेच्या नियमांबाबत जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले.
जिल्ह्यातील 32 ब्लॅक स्पॉटपैकी 24 सार्वजनिक बांधकाम विभाग, सात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व एक राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत आहे. त्याचप्रमाणे, परिवहन आयुक्तांकडून 42 ब्लॅक स्पॉटची यादी प्राप्त आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ब्लॅक स्पॉटच्या यादीचे अवलोकन करून तिथे अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनेबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा. आवश्यक त्या ठिकाणी स्वयंचलित वाहतूक सिग्नलची व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
मोर्शी- वरूड रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी अपघातप्रवण स्थळावर सांकेतिक बोर्ड लावणे, तिथे वाहतूक शाखेच्या कर्मचा-याची नियुक्ती करणे, ओव्हर स्पीड, अंमली पदार्थ सेवन करून वाहन चालविण्यांविरुद्ध तपासणी मोहिम राबविणे आदी सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहेत. संबंधित स्थळाची संयुक्त पाहणी होऊन उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा कार्यपूर्ती अहवाल अद्याप प्राप्त नाही. तो सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *