पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी असून, संजय राऊत काँग्रेसवर टिका करत आहेत. त्यामुळे काँग्रेस कधीही पाठींबा काढून घेऊ शकतो. यापूर्वीच अजित पवार हे आमच्याकडे येऊन गेले आहेत. पवार पुन्हा एकदा आमच्यासोबत येतील. त्यामुळेच फडणवीस हेही पुन्हा-पुन्हा येईन, असे म्हणत आहेत, असे मत केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
रिपब्लिन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) पश्चिम महाराष्ट्र विभागातील प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीनंतर रामदास आठवले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असले तरी त्यांना मिशन पूर्ण करण्यासाठी पुण्यात पाठवले असून, ते पूर्ण करून ते परत जातील. शेकर्यांच्या प्रश्नाची आम्हांलाही जाण आहे. परंतु कायदा रद्द करण्याच्या मागणीला आम्ही सहमत नाही. संविधानानुसार केलेला कायदा रद्द झाला तर इतर अनेक कायदे रद्द करण्याच्या मागणीला जोर येईल आणि त्यातून लोकशाही आणि संविधानाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. त्यामुळे शेतकर्यांनी चर्चेतूून या कायद्यात काही बदल असतील, तर ते सुचवावेत. कायद्यात बदल करणे शक्य आहे. मात्र, संसदेने केलेले कायदेच रद्द करा, असे म्हणणे संयुक्तिक नाही. काँग्रेस शेतकरी नेत्यांना फूस लावत आहे. शेतकरी आंदोलन राजकीय झाले आहे, असेही आठवले यांनी सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकीत रिपाइंला जागा मागणार असून, त्यासाठी लवकरच चंद्रकांत पाटील व देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. पश्चिम बंगालमध्येही चार ते पाच जागा आम्ही मागत आहोत. तिथे भाजपाची सत्ता येणार असून, २00 पेक्षा अधिक जागांवर भाजप विजयी होईल. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी आम्ही सुरुवातीपासून करत आहोत. मात्र, राज्य सरकार त्यावर गांभीर्याने विचार करत नाही. त्यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, असे आठवले म्हणाले.
एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव दंगल यांचा संबंध नाही. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत आहे. सरकारने चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई करावी. घटना घडली त्यावेळी आजच्या सरकारमधील सर्व नेते कारवाईची मागणी करत होते. आज मात्र ते सगळे चिडीचूप आहेत, अशी टीकाही आठवले यांनी राज्य सरकारवर केली.
दरम्यान, एक जानेवारीला कोणीही भीमा कोरेगावला गर्दी करू नये. कार्यकर्त्यांनी विजयस्तंभाला घरूनच अभिवादन करावे. सर्व धर्माच्या लोकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण घरीच सध्या पद्धतीने साजरे केले आहेत. आपणही तसेच शांततेत आणि समजूतदारपणे घरूनच अभिवादन करावे. चार-पाच पदाधिकार्यांसमवेत ११ वाजता मी जाऊन अभिवादन करणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
अजित पवार पुन्हा आमच्याकडे येतील : आठवले
Contents hide