स्टार प्रचारकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी

अमरावती : कोरोना साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन निवडणुकीच्या प्रचाराकरिता स्टार प्रचारकांसाठी भारत निवडणूक आयोगाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. निवडणुका निष्पक्ष, शांततापूर्ण, पारदर्शक, नैतिक आणि सुरक्षितरित्या व्हाव्या हा यामागील मुख्य उद्देश आहे. भविष्यात कोविड-19 काळात होणाऱ्या निवडणुकांत प्रचारासाठी स्टार प्रचारकांना या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावे लागेल, असे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार आता मान्यताप्राप्त राष्ट्रीय / राज्यस्तरीय राजकीय पक्षाला स्टार प्रचारकांची संख्या 40 ऐवजी तीस ठेवावी लागेल. तसेच मान्यताप्राप्त असलेल्या नोंदणीकृत राजकीय पक्षांसाठी स्टार प्रचारकांची संख्या कोविड-19 च्या काळात वीस ऐवजी 15 असेल. त्याचप्रमाणे स्टार प्रचारकांची यादी सादर करण्याचा कालावधी अधिसूचना जारी केल्यानंतर सात दिवसांऐवजी दहा दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. ज्या राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी सादर केलेली आहे, त्यांना सुधारित यादी दिलेल्या कालावधीत पुन्हा सादर करावी लागेल. स्टार प्रचारकांच्या सभेसंबंधी परवानगी घेण्यासाठी प्रचाराच्या 48 तास अगोदर जिल्हा निवडणूक प्रशासनाकडे याची माहिती द्यावी लागेल जेणेकरून सर्व सुरक्षा उपाय वेळेच्या आत करणे शक्य होईल. ही सर्व सुधारित मार्गदर्शक तत्त्वे तात्काळ प्रभावाने अमलात आली आहेत.