सध्याच्या महामारीच्या काळामध्ये इथला व्यापारी, उद्योग धंदे , कारखानदार, नोकर वर्ग कमालीचा प्रभावित झाला. लॉक डाउन च्या काळात मजूर वर्ग यांचे रोजगार गेले त्यामुळे त्याला मूळगावी परतावे लागले. त्यातील काही मजूर त्यांनी कसेबसे पोटाला चिमटा देऊन शहरांत दिवस काढले. सध्या मजुरीची काही प्रमाणात कामे सुरु झाली आहेत. शहरांत नोकरीला असणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काहींचे काम अजून पर्यंत सुरु झाले नाही. तसेच बरेच जण नोकरी, छोटे व्यवसाय, उद्योग करणारे यांना दररोजचा प्रवास खर्च परवडत गावाकडे थांबणे शिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. या उच्च शिक्षित मुलांना गावाकडे रोजगार मिळणे कठीण झाले आहे त्यामुळे ते बांधकाम मजूर, शेत मजूर, हमाली काम करुन आपला उदर निर्वाह करत आहेत. यातील बरेच नोकरी करणारे यांचे पगार 18000/-च्या खाली असल्याने कंपनी द्वारे त्यांचा पीएफ भरला जात नाही त्यामुळे शासनाच्या सवलतीचा त्यांना कोणताच फायदा होताना दिसत नाही.
असंघटित कामगार, कचरा वेचणारे, कंत्राटी काम करणारे, यांचे प्रश्न भयंकर आहेत. त्यांचे मानधन थकले आहे. वेळेवर मानधन मिळत नसल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे.यात विमुक्त भटक्या समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे. याचा विचार करायला व या समाजाकडे तितकी क्षमता निर्माण झालेली नाही.
महामारीच्या काळात जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकरी राजा ही अस्मानी संकटामुळे शेतीचे नुकसान झाले असल्याने, ओला दुष्काळ पडल्याने पुरता हवाल दिल झाला आहे.
महामारीच्या दरम्यानच्या काळात लॉकडाउन निर्बंध कडक असल्याने तसेच कामे, रोजगार, उद्योग बंद असल्याने सर्वांनी काटकसर करुन दिवस काढले. या कालावधीत येणारे सण उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे केले आहेत.
लॉक डाउन काही अंशी शिथिल झाला असल्याने नोकरी, व्यवसाय, उद्योग धंदे करणारे, शेतकरी यांची दिवाळीच्या सणाच्या खरेदी ची लगबग सुरु आहे. काही माध्यमातून शहरी भागातील रस्ते यावर ट्रॅफिक झाली आहे. नाकारिकांनी किमान दिवाळी सण तरी आनंदाने साजरा करण्यासाठी उत्साह दाखवला आहे. काही नागरिकांची दिवाळी थंडगार आहे. कारण बऱ्याच लोकांचे कर्ज हप्ते थकले आहेत. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्य खर्च, घर खर्च याच्या विवंचनेत आहेत. अशी सारी वा यापेक्षा विचारा पलीकडची अवस्था का महामारीत लोकांची झाली आहे.
इथल्या स्थायिक जिवन जगणाऱ्या माणसांची ही अवस्था आहे. तर मग इथल्या पाला बिऱ्हाडावर भटकंतीचे जिवन जगणाऱ्या भिक्षेकरी भटक्या विमुक्त जमातीची काय असेल. हे भटक्या जमाती मधील बांधव अलुतेदारी व्यवस्थेचा भाग होते. त्यांची ठराविक गावे वतनदारी असायची. हक्काने आपल्या कला, खेळ, लोककला सादर करुन उदर निर्वाह करत होते. परंतु या भयंकर परिस्थिती मुळे सध्या त्यांना गावात, शहरांत भिक्षा मागायला जाता येत नाही. या अगोदर ते भिक्षा मागायला जात होते, किमान भिक्षा मागून पालावर मुलाबाळांना काही तरी गोड धोड मिळालेल्या सतरा भेसळ भिक्षेतून घालता येत होते. ते सध्या सारे बंद आहे. ते गावात, शहरांत किमान शंभर घरी भिक्षेला जातात म्हणून त्यांना दारात भिक्षेला उभे राहता येत नाही.
दिवाळी सणाला आजवर या पालवरील भटक्या समाजाने गांव, शहर येथील स्थायिक लोकांच्या घरा समोर उज्वल दीप दिवे प्रज्वलित होताना बघितले, सगळीकडे रोषणाई, आतिषबाजी, फटाके हे फक्त बघतच आले आहेत. दिवाळी ला भटक्या विमुक्त जमातीच्या अंधारात असणाऱ्या पालावर कुठे दीप, पणती पेटलेली बघीतली आहे का. पालावरील या वंचित भटक्या जमातीच्या पालांवर दीपावलीचा कधी दीप उजळेल की नाही. का पिढ्यांपिढ्या पासून आलेले अंधकारमय जिवन त्यांचेच वाट्याला कुठवर येणार आहे. त्यांनी दिवाळीचा ताजा फ़राळ कधी तयार केला आहे का. त्यांचे जे काय आहे ते स्थिर समाजाच्या दया याचनेवर अवलंबून आहे.दिवाळीला यांना उटणे, अभ्यंग स्थान हे त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचे असते. जरी अंघोळ केली असली तरी ही त्यांच्या फाटक्या पालात त्यांना दिवाळी फ़राळ नसतो. त्यांना गावात भिक्षेला गेल्या शिवाय फ़राळ पालावर मिळत नाही. पालवरील लहान मुले,जेष्ठ,माणसे यांना त्यांचे पालक भिक्षा मागून संध्याकाळी येईपर्यंत वाट बघत बसावे लागते. स्थिर समाजाच्या दारात भिक्षेसाठी उभे राहिल्यावर तुम्ही दिलेली एक दोन करंजी, चिवडा त्यांच्या पालावर मुलां बाळांमध्ये दिवाळीचा मोठा आनंद निर्माण करतो. अशी त्यांची दिवाळी साजरी होते. त्यांचेमध्ये परिवर्तन कधी होणार हा प्रश्न सतत विचार करण्यास भाग पाडतो आहे.
सध्या या भटक्या जमातीच्या पालावर काही हातांच्या बोटावर मोजण्या इतपत मुलं शिक्षण घेऊ लागली आहेत त्यामुळे एक दिवस त्यांच्याही पालांवर ज्ञानाचा लागल्या शिवाय राहणार नाही. हाच ज्ञानाचा दिवा येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रकाशमय करत राहील. मी ही पाला बिऱ्हाडावर राहून PhD पदवी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत पूर्ण केली आहे. इतके शिक्षण घेऊनही प्राध्यापक पदाची जाहिरात नाही त्यामुळे माझा भटकंतीचा प्रवास अजून संपलेला नाही. फक्त गरज आहे ती समाजातील दानशूर, विचारवंत, माणुसकी जपणारे मदतीचे हात जे त्यांना त्यांचे भविष्य घडवण्यासाठी मदत करतील. सर्व समाज प्रतिनिधी त्यांना माणूस म्हणून खऱ्या जीवनाचा आनंदाचा क्षण त्यांच्या पाला बिऱ्हाडावर नक्कीच आणतील. सर्व समाजातील भाऊ, बहिणीच्या मदतीतून व सहकार्यातून, मार्गदर्शन करणारा, येणारा भविष्यकाळ त्यांच्या जीवनाला नवी दिशा देणारा असेल.
‘आमच्या ही पालांवर दीपावलीचा दीप प्रज्वलित होवो ‘
“आता एकच ध्यास भिक्षेकरी समाजाचा विकास ”
डॉ. कालिदास शिंदे
पाल निवासी
Mob.NO. 9823985351
विमुक्त भटक्या जमातीच्या पालावर दीप उजळेल का..?
Contents hide