• Sat. Jun 3rd, 2023

मा. विभागीय आयुक्त यांची कायदा व सुव्यवस्था याबाबत आढावा बैठक

ByBlog

Nov 27, 2020

मतदान व मतमोजणी केंद्रावर कायदा व सुव्यवस्था काटेकोर ठेवा– निवडणूक निर्णय अधिकारी पियूष सिंह यांचे निर्देश


अमरावती, दि. 27 : शिक्षक मतदारसंघाची निवडणूक निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान व मतमोजणी केंद्रावर काटेकोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी आज दिले.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (महसूल) गजेंद्र बावणे, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार, उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर, पोलीस निरीक्षक निलीमा आरज यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. सिंह म्हणाले की, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. विलासनगर येथील शासकीय धान्य गोदाम येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. मतमोजणीच्या परिसरात कुठलीही अनुचित घटना घडणार यासाठी सर्व यंत्रणांनी सुसज्ज रहावे. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.
मतमोजणीच्या केंद्रावर अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकारी जवानांसाठी भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी सुविधा उपलब्ध ठेवावी. मतमोजणी केंद्रावर आरोग्य तपासणीसाठी आरोग्य पथक तैनात ठेवावे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाचा पास दिला जातो. तसेच त्यांना मतमोजणीच्या ठिकाणी माध्यम कक्ष उभारला जातो. माध्यम प्रतिनिधींना माध्यम कक्षातच मोबाईल वापरण्‍याची मुभा असते. मात्र, मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यावर सर्वांना बंदी राहील.
कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने मतमोजणी केंद्र तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्राँगरुम व संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा आदी सुविधा चोख ठेवावी. तसेच वीजपुरवठा अखंडित राहावा यासाठी अगोदरच जनरेटरची सुविधा व नियोजन करुन ठेवावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
मतमोजणीच्या ठिकाणी व परिसर चोख बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस बलची एक प्लॉटून तसेच जिल्हा पोलीस विभागाचे सुमारे शंभर अधिकारी कर्मचारी तैनात राहणार आहे. बॅरीकेटस, प्रवेश गेट व संपूर्ण परीसरात व भोवताल पोलीसांचा चोख बंदोबस्त नियोजित करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलीमा आरज यांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी हे येत्या 30 नोव्हेंबर रोजी मतमोजणी केंद्र येथे सर्व शासकीय यंत्रणांसोबत पाहणी करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *