• Tue. Jun 6th, 2023

मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण व इतर बाबी विहित वेळेत पूर्ण करा – निवडणूक निर्णय अधिका-यांचे निर्देश

ByBlog

Nov 28, 2020

अमरावती : मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण व इतर बाबींची प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी दिले आहेत.
मतदान केंद्रे निर्जंतुकीकरण करून घ्यावीत व तसा अहवाल सादर करावा. क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्राना दिलेल्या भेटी व इतर साहित्याबाबतचा अहवाल ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २ पूर्वी सादर करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व जिल्हा निवडणूक अधिका-यांना दिले आहेत.
मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतपत्रिकेच्या स्थळप्रतीवर केलेली स्वाक्षरी मतदार नोंदणी नमुना १९ समवेत पडताळणी करणे आवश्यक असते. त्यानुसार मतदान केंद्राध्यक्षांना नमुना १९ उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने तहसीलदारांना दिले आहेत.
प्रिंट मीडियामधील जाहिरातींचे प्रमाणीकरण आवश्यक
मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तास म्हणजेच रविवारी (29 नोव्हेंबर) सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल. त्यानंतर उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना प्रचार करता येणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारेही प्रचार करता येणार नाही. मात्र, प्रिंट मीडिया त्याला अपवाद राहील. त्यानुसार मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाचा प्रचार व जाहिराती उमेदवारांनी माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
प्रचारासाठी विविध माध्यमांत करावयाच्या जाहिरातींबाबत उमेदवारांकडून ‘एमसीएमसी’कडे मजकूर सादर केला जातो व समितीकडून प्रमाणीकरण करुन दिले जात आहे. मात्र, आता राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाच्या तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित घेणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *