• Mon. Jun 5th, 2023

निवडणूक प्रक्रियेसाठी विविध नोडल अधिकारी नियुक्त – जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर विविध अधिका-यांना नोडल अधिकारी किंवा समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला. कोरोना साथ लक्षात घेता मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा ठेवाव्यात, असे निर्देशही जिल्हाधिका-यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांना सभा, मिरवणुका व इतर विविध परवानग्यांसाठी एक खिडकी कक्षाची जबाबदारी अधिक्षक तथा तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांच्याकडे सोपविण्यात आली असून, त्यांना अमोल दांडगे व अभिजित पुराणिक हे सहकारी देण्यात आले आहेत. मतदान कर्मचारी प्रशिक्षण व्यवस्था व मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाची जबाबदारी खरेदी अधिकारी उमेश खोडके यांच्याकडे, मतदान प्रशिक्षणाची जबाबदारी उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्याकडे, वाहन अधिग्रहण व वाहन व्यवस्थापनाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्याकडे देण्यात आली आहे.

निवडणूक निरीक्षक यांचे कामकाज व इतर व्यवस्था जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे व जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी राजेश कावळे यांच्याकडे, तर मीडिया कक्षाची जबाबदारी जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मतदारांना मतदार केंद्रावर आवश्यक सुविधा पुरविणे व मतदान केंद्र सुस्थितीत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांची असेल.

मतमोजणी केंद्रावरील व्यवस्था व सुरक्षेसंबंधित, तसेच जंबो बॅलेट बॉक्स आदी जबाबदारी उपजिल्हाधिकारी मनोज लोणारकर यांच्याकडे आहे. मतदार मदत कक्षाद्वारे मतदारांना सर्वतोपरी सहकार्य करणे व तक्रार निवारण कक्ष स्थापण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची असेल.

कोरोना प्रतिबंधासाठी दक्षतेच्या अनुषंगाने कम्युनिकेशन प्लॅन करा

कोविड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेता कम्युनिकेशन प्लॅन तयार करून सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. या अनुषंगाने नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोविड केअर सेंटर, कोविड आरोग्य केंद्र, कोविड रूग्णालये, रूग्णवाहिका, प्रत्येक मतदान केंद्रावर नेमावयाच्या आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांचे भ्रमणध्वनी क्रमांकासह तपशील प्लॅनमध्ये असावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रत्येक मतदान केंद्र सॅनिटाईज करावे. मास्क, फेस शिल्ड, थर्मल गन, उपलब्ध करून द्यावे. मतदान केंद्रावर सॅनिटायझर, सोडियम हायड्रोक्लोराईड आदी उपलब्ध करून द्यावे. मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचा-यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण द्यावे. मतदान पथकाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. रूग्णवाहिका व आवश्यक औषधे ठेवावीत, आदी निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या कोणाही अधिकारी-कर्मचा-याला जिल्हा शल्यचिकित्सकांच्या प्रमाणपत्राशिवाय वैद्यकीय रजा मंजूर करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *