देशाला विकृतीपासून वाचवा….

आजचे तरुण युवक…जे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत…ते जातीभेद,धर्मभेद,प्रांतभेद आणि वर्णभेदात एवढे गुरफटलेले आहेत की,त्यांना देशाशी काही देणेघेणेच नाही. हा आमचा धर्म,तो तुमचा धर्म करता करता ते धर्माच्या एवढ्या अधीन गेले आहेत की,त्यांना यापेक्षा जास्त महत्वाचे काही वाटतच नाही. थोर महापुरुषांना सुद्धा त्यांनी विशिष्ट धर्म,जात,प्रांत नावाच्या बेड्यात अडकवून ठेवलेले आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर…, ज्यांनी संपूर्ण विश्वात भारत देशाची गौरवगाथा पेरली आणि संपूर्ण देशव्यापी संविधान बनवून ज्यांनी भारतीय व्यक्तिंना जीवन जगण्याचा अधिकार बहाल केला अशा ह्या महान विभूतीला सुद्धा काही धर्मवेड्यांनी त्यांना विशिष्ट जातीपुरता राखीव ठेवले.तेच हाल क्रांतिकारी सेवालाल महाराज,गाडगे महाराज,संत तुकाराम,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,डॉ. अब्दुल कलाम व इतर महान विभूतींचे सुद्धा झाले.त्यांच्या विचारांना सार्वजनिक करून धर्मवेड्यांनी जगापर्यंत पोहोचू दिले नाही.एवढेच नव्हे तर ह्या थोर पुरुषांची जयंती साजरी करताना सुद्धा जात,धर्म पाळल्या जातात.बाबासाहेबांची जयंती असेल तर फक्त बौद्ध लोकं जयंती साजरी करतील ते इतरांना त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ देणार नाही.क्रांतिकारी सेवालाल महाराजांची जयंती असल्यास फक्त बंजारा समाज जयंती साजरी करतील इतर धर्मीय व्यक्ती यात हस्तक्षेप करणार नाही(कुठे कुठे परिस्थिती बदलली आहे पण सर्व ठिकाणी नाही).जयंती साजरी करताना युवापिढी डी.जे लावून ,मद्य प्राशन करून धिंगाणा घालतात आपली ही सभ्यता जगाला दाखवतात…
शिवाजीराजे असो वा डॉ.बाबासाहेब आंबेडकर…महाराणी ताराबाई असो वा सावित्रीबाई फुले…प्रत्येकांनी आपले कार्य फक्त विशिष्ट धर्मापुरता राखीव ठेवले नाही. त्यांनी कार्य केले संपूर्ण जनतेच्या कल्याणासाठी… भारतीय जवान देशासाठी लढले आणि देशसेवा करता करता शहीदही झाले,आणि आपण काय करतो….त्यांची जयंती आली म्हणजे एका दिवसासाठी त्यांना स्मरण करून पुष्पमाला वगैरे अर्पण करतो आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना विसरूनही जातो… मग त्यांची आठवण होते एका वर्षानंतरच,जेंव्हा त्यांची पुन्हा जयंती येते.
महापुरुषांना अशा पद्धतीने स्मरून आपण त्यांचा गौरव न वाढवता त्यांचा जणू अपमानच करत आहोत.काही गरज नाही शिवरायांच्या तसेच इतर महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायची…काही गरज नाही भगवे,पांढरे,हिरवे कपडे घालून आम्ही कट्टर विशिष्ट धर्माचे आणि एकाच थोरपुरुषाचे समर्थक आहोत हे वरकरणी लोकांना दाखवायची.महापुरुषांना जागा द्यायची असेल तर आपल्या हृदयात द्या.त्यांच्या मुर्तीची पूजा करायची सोडून त्यांच्या विचारांची पूजा करा.त्यांच्या पुतळ्याला बाहेर उन्हात तापवत ठेवून एका दिवसासाठी त्यांची पूजा करून काय फायदा…?हा आमचा देव,तो तुमचा देव.हा आमचा राजा,तो तुमचा राजा.बाबासाहेब आमचे,सेवालाल महाराज तुमचे असं काही करू नका.हे थोरपुरुष सर्वव्यापी आहेत आणि त्यांचे कार्य हे जनकल्याणकारी होते…लक्षात ठेवा..राष्ट्रसंत तुकडोजी महारांनी म्हटले आहे.”हर देश मे तू,हर वेष मे तू.तेरे नाम अनेक तू एक ही है ।”
आपले नाव,गाव,प्रांत,जात,धर्म,वर्ण जरी वेगळे असले तरी आपला रक्त,आपले अवयव व आपल्याला होत असणाऱ्या वेदना समान आहेत.सगळ्यांना पिण्यासाठी पाणी,खाण्यासाठी अन्न व श्वास घेण्यासाठी हवा पाहिजेच.कोणी बौद्ध असेल तर तो पाणी आणि कोणी हिंदू असेल तर तो मद्य पिणार…असे होणार का? कोणी अन्न तर कोणी दगडगोटे खाणार का? कोणी श्वास घ्यायला हवा तर कोणी दुसरा कोणता वायू घेणार का…? सगळ्यांना अन्न, हवा,पाणी हे जीवन जगण्यासाठी लागणारच आणि यांचा त्याग कोणी करू शकेल इतपत मूर्ख मी अजूनपर्यंत तरी पाहिलेला नाही. जर सगळ्यांना अन्न, हवा,पाणी ह्या गोष्टी समान पाहिजे असतील तर मग धर्म,वंश,जात ह्या वेगवेगळ्या कशाला…?कशाला आपलेच लोकं आपल्याच लोकांना मारण्यासाठी शस्त्र उचलत आहेत..?काय कारण असेल की,ज्यामुळे हिंदू,मुस्लिम,बौद्ध,बंजारा,मराठा व इतर असंख्य धर्मांचे लोकं भेदभाव सोडून मानव जातीच्या कल्याणासाठी एक होत नाहीत…?का कोणी देशसेवा करायला तत्पर दिसत नाही…?
कधी बदलेल हे चित्र आणि कधी इथला प्रत्येक माणूस प्रत्येक माणसांशी माणुसकीने वागेल व देशसेवेलाच ईश्वरसेवा मानेल…?
असे असंख्य प्रश्न डोळ्यासमोर येऊन उभे राहतात व ते प्रश्न नेहमी फक्त आणि फक्त प्रश्नच बनून राहतात.त्यांची उत्तरे सध्यातरी या भूतलावरील कोणत्याच व्यक्तींजवळ नाही असे मला वाटते.
आजची युवा पिढी ही परिस्थिती बदलु शकेल व ह्या प्रश्नांना आपल्या चांगल्या कर्माने कालांतराने का होईना पण उत्तरे मात्र देऊ शकेल.बदल हळूहळूच घडत असतो.त्यामुळे आपल्याला बदल घडवण्यासाठी थोडं परिश्रम करणे आवश्यक आहे.त्यासाठी एकीची आवश्यकता आहे.तरुण रक्तात काहीतरी करण्याची जिद्द असतेच पण त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची गरज असते.म्हणून माझी माझ्या देशबांधवांना कळकळीची विनंती आहे की,तरुण पिढीला योग्य मार्ग दाखवा.त्यांना जातीभेद,धर्मभेद,वंशभेद व प्रांतभेद यांपासून मुक्त करा तसेच त्यांना व्यसनांपासून दूर ठेवा.त्यांच्या रक्तात खरा शिवबा,बाबाहेब,संत सेवालाल जागवा. संघटीत व्हा…शिका,शिकवा आणि संघर्ष करा….आपल्या देशाला विकृतीपासून मुक्त करा.
©️®️अजय रमेश चव्हाण,तरनोळी
मो.८८०५८३६२०७

Thank you for reading this post, don't forget to subscribe!