• Tue. Jun 6th, 2023

….. तर चळवळीसाठी कुणाला तरी पायाचे दगड बनावेच लागेल… !

ByBlog

Nov 12, 2020

सध्या बौद्ध समाजाची चळवळ तुकड्या तुकड्यांनी अगदी जिवावर आल्यागत प्रवास करते आहे. तरीसुद्धा नेते मंडळी आपल्या स्वार्थापोटी तिला लागलेली ‘कीड’ बरी न करता नवनवीन झूल चढवून तिला वापरत आहेत. या प्रत्येक नेत्याचा असा पाळीव लवाजमा आहे. या साऱ्यांचा (इतर गोष्टीबाबत मतभेद असतील) पण… एका गोष्टीवर ठाम विश्वास आहे आणि ती गोष्ट म्हणजे डॉ. बाबासाहेबांचे विचार फक्त भाषणात मांडायचे असतात. त्यांचा अन् व्यवहाराचा सुतराम संबंध नसतो. किंबहुना असे आहे म्हणूनच तर जी चळवळ अखिल भारतीय पातळीवर डॉ. बाबासाहेबांच्या काळात होती ती एका राज्यापुरती अन् पुढे – पुढे तर एका जातीपुरती मर्यादित होऊन राहिल्याचे चित्र पहावयां लागते आहे.

बौद्ध चळवळीची शोकांतिका अशी का झाली ? हे समजण्याकरिता चळवळ म्हणजे नेमके काय ? हे तपासले पाहिजे. चळवळीची व्याख्या करताना असे म्हणावे वाटते की, “समाजातील एखाद्या घटकाने आवश्यक असणारे सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी मुद्दाम होऊन केलेले व विचार प्रणालीवर आधारलेले वर्तन म्हणजे ‘चळवळ”

चळवळीसाठी आवश्यक असे चार घटक माझ्या माहितीप्रमाणे असे आहेत.
1) सामुदायिक कृती,
2) सामुदायिक वर्तन,
3) योग्य नेतृत्व,
4) बदलाभिमुखता.

वरील चार घटकांचे अगदी सोप्या तीन घटकात वर्गीकरण करता येईल,
1) बुद्धिमंताचा वर्ग,
2) प्रसारकांचा वर्ग,
3) जनसामान्यांचा वर्ग.

वरील तिन्ही घटक चळवळीत नुसते असून चालत नाहीत. त्यांच्यात एकवाक्यता असावी लागते ती जर नसेल तर ती चळवळ अयशस्वी होते. आज दलित चळवळ नेमक्या या स्थितीत आलेली आहे.

सध्या याच वर्गाच्या हातात दलित चळवळीचे नेतृत्व आहे परंतु यांच्या अन् बाबासाहेबांच्या अष्टपैलू नेतृत्वात जमीन-अस्मानचा फरक आहे ही सर्व परिस्थितीने बनवलेली नेते मंडळी आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर ध्येय धोरणे अन् कृती नाहीच अन् याचा फायदा विविध जातीयवादी पक्ष वेगवेगळी नावे धारण करून नेत्यांना सत्तेचे आणि दलितांना सवलतीचे गाजर दाखवून उपटीत असतात, याचे उदाहरण द्यायचे झाले तर काँग्रेस – रिपब्लिकन युतीचे देता येईल. काँग्रेसने रिपब्लिकन पक्षा करता 12 जागा सोडल्या पण त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतेही दिली नाहीत आणि प्रचारही केला नाही पण दलित जनता अन् नेते मात्र शब्दाला जागले अन् मरायला ठेपलेल्या काँग्रेसला आपल्या रक्तावर जगवून गेले तोच किस्सा राष्ट्रवादीने शिर्डीतही घडवून आणला. हे घडले ते आपल्या नेत्यांच्या अदूरदृष्टीच्या राजकारणामुळे.

बाबासाहेबांनी आपल्या राजकीय वाटचालीत इतर पक्षांशी युत्या केल्या पण त्या सन्मानित होत्या. ज्यावेळी बाबासाहेबांना असे वाटले की, आपली मते अमान्य करून आपला अपमान केला जात आहे. तेव्हा ते तडक राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडले. पण आज दलित चळवळीत स्वतंत्र असा बुद्धीमंतांचा वर्ग अत्यल्प प्रमाणात का होईना पण अस्तित्वात आहे. त्याची नोंद घेणे तसे अपरिहार्य आहे पण दलित चळवळीतील स्वार्थी आणि ढोंगी पुढाऱ्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या विचारांचा विपर्यास करून त्यांचा संसार उद्ध्वस्त केला आहे. त्यांना कालबाह्य करण्याचे षड्यंत्र रचले आहे. फिल्ड वर्क अन पेपर वर्क असे भेद पाडून पेपरवर्क वाल्यांनी वाद करण्याचा चंग बांधला आहे. या घटनेमुळे दलित चळवळीच्या पायावरच घाव बसला असून त्यामुळे ही चळवळ इतर समाजातील समतावाद्यांना दलित नेतृत्व आपल्याला जे वाटते तेच बाबासाहेबांना वाटत होते असे समजून “प्रती आंबेडकर” असल्याच्या अर्विभावात वावरत आहे. आणि इथेच दलित चळवळीचे हार्ट फेल झाले आहे.

तिसरा जो वर्ग आहे तो जनसामान्यांचा, की ज्यांची बाबासाहेबांच्यावर अतोनात श्रद्धा आहे. रिडल्स च्या वेळी हा वर्ग बाबासाहेबांच्या हाकेला ओ देऊन आला होता. दलित ऐक्य होण्यापूर्वी सुद्धा या वर्गाने बाबासाहेबांच्या विचारावर होणाऱ्या हल्ल्याला विविध पातळीवर विरोध केला होता. खरे प्रश्न याच वर्गाचे आहेत कारण यांचीच घरे जाळली जातात. यांना वेठबिगारी करण्यास भाग पाडले जाते. यांचेच डोळे काढले जातात. याला कारणीभूत इथल्या जातीयवादी व्यवस्थेबरोबरच दलितांची नेते मंडळीही आहेत, की ज्यांच्या भाषणामुळे दलितांना विधायक दृष्टी मिळणे दूरच राहिले, उलट त्याऐवजी दंगलीच्या भीषण आगीतच ते लोटले जातात, सध्यातरी नेतेमंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांपासून अब्जावधी मैल दूर आहेत.

त्यामुळे ही चळवळ इतर समाजातील समातावाद्यांना तर दूरच पण आपल्या पोटजातीतील समदुःखितांना सुद्धा आकर्षित करण्यास अपयशी ठरली आहे.

दुसरा जो वर्ग आहे तो ‘प्रसारकांचा’ सध्या तरी दलित चळवळीकडे कोणताच परिवर्तनाचा कार्यक्रम ते अवलंबू शकत नाहीत, कारण सध्याच्या व्यवस्थेत त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे ते स्वतंत्र नाहीत थोड्या थोड्या वैरणीवर त्यांनी बाबासाहेबांना सत्ताधारी अन् विरोधी गटाच्या दावणीला बांधले आहे, “बुरा मत काहो, बुरा मत सूनो, बुरा मत देखो, सिर्फ बुरा करो”

या नेत्यांनी आंबेडकरी विचारांचे वाटोळे केले आहे. जो विचार ‘नाही रे’ वर्गाची शक्ती बनत होता त्याला जातीयवाद्यांच्या दावणीला बांधून त्यांच्या गोट्यालाच रंग महाल समजून तिथे आराम फर्मावीत आहेत. बाबासाहेबांनी आपल्या छोट्याशा जीवनक्रमात सामाजिक, राजकीय पातळीवर लढाई लढली अन विजयी पतकाही पडकावली आता नेते नुसते लढल्यासारखे करतात अन् विजयी पतकाही फडकवतात पण मैलभर मागे जाऊन अन् विचारले असता सांगतात की सीमा रेषा म्हणून ही जागा सोडली आहे. बाबासाहेबांची जयंती व निर्वाण दिन साजरा करताना तुम्हाला आपल्यासाठी नाही तर बाबासाहेबांच्या विचारांसाठी विचार करावा लागेल, कारण तुम्ही हा विचार नाही केला तर हा विचार खंडित होण्याची शक्यता आहे.

त्याकरिता बाबासाहेबांचे विचार कोणते होते ?
त्या विचारांच्या दिशेने आपण जात आहोत का ?

जात नसु तर आपण आपली दिशा बदलली पाहिजे आणि एकदा का तुम्हाला ही दृष्टी मिळाली की मग कुणाची तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची प्राज्ञा होणार नाही. अन् प्रकाश आल्यावर घुबड जशी ढोलीत लपतात तशी आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांची फळी उभी राहिल्यावर पुनःश्च आंबेडकरी वटवृक्षाला मोहर येईल. हे सर्व सविस्तर मांडणी यामागे कोणाचाही दोष करण्याचा हेतू नाही. वस्तुस्थिती सर्वसामान्य जनतेला कळावी, कारण या जनतेच्या डोळ्यात जो खोटा आभास निर्माण केला आहे ती बहुजन वर्गाच्या कल्याणासाठी वापरली जावी, बौद्ध चळवळीचे राजकारण करण्यापूर्वी आपल्या शक्तीचा अंदाज घेतला पाहिजे, कामगार युनियन, विद्यार्थी संघटना, महिला संघटना, भूमिहीन आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांची संघटना, सांस्कृतिक संघटना, अशा सर्व आघाड्या विविध पातळीवर निर्माण केल्या पाहिजेत, पण त्या नुसत्या स्थापून उपयोग नाही; त्या योग्य अशा कार्यकर्त्यांनी कार्यरत हव्यात आणि यासाठी समाजातून तरुणांची फळी उभी राहिली पाहिजे.

हा त्याग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या तमाम त्या लोकांना करावा लागणार आहे. कारण डॉ. आंबेडकर विचारांची इमारत जर बनवायची असेल तर कोणाला तरी पायाचे दगड बनावे लागेल… !!

साहित्यिक :-
सिद्धार्थ कांबळे, मुंबई सेंट्रल.

जय भीम 🙏जय रमाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *