माणुस स्वभावातच उत्सवप्रिय प्राणी आहे. प्रत्येक महिन्यात कुठला तरी सण असतोच. बर्यााच सणात वृक्षाचे महत्त्व असते.त्यानिमित्त वृक्षाचे औषधी गुणधर्म लोकांना माहीत व्हावे, हा उद्देश असतो. सध्या आपण सण तर मोठ्या उत्साहाने साजरे करतो पण मुळ उद्देशाकडे दुर्लक्ष करून अनिष्ट गोष्टीना प्रोत्साहन दिले जात आहे, त्यामुळे पर्यावरणाच्या अनेक समस्या उद्भवल्या आहे.
तसं तर दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, पण त्याच बरोबर अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. जसे-नवे कपडे, फराळ, मिठाई, पणत्या, रांगोळी, आकाशदिवे, आणि फटाके इत्यादी .दिवाळीला तेलाच्या पणत्या लावल्या जातात उद्देश हा असतो की, अज्ञानाचा अंधार नाहिसा होऊन ज्ञानाचा प्रकाश पडावा. पण आजकाल या सणाचे पावित्र्य नष्ट होऊन त्याची जागा फटाके आणी प्रदुषणाने घेतली आहे. त्यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे.
‘ दिवाळी म्हणजेच फटाके’ असे समीकरण झाले आहे.आपली श्रीमंती दाखविण्यासाठी हजारो रूपयांचे फटाके फोडले जातात. पण फारच थोड्या लोकांना फटाक्यांचे दुष्परिणाम माहित आहे, फटाक्यातील घातक रसायने आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात.
आरोग्यावरिल दुष्परिणाम ———-फटाक्यातून निघणारे विषारी वायू सर्वच सजीवासाठी घातक असतात. फटाक्यातील क्लोरेटस श्वसनामार्गे शरिरात गेल्यास रक्तातील लाल पेशी नष्ट होतात. त्याच्या प्रत्यक्ष संपर्काने मुत्रसंस्थेचे कार्य बंद पडू शकते. बोरियम या क्षारामुळे ऊलट्या ,पोटात दुखणे, धाप लागणे, फिट येणे, कोमात जाणे, तसेच ह्रदय बंद पडून मृत्यू संभवतो.
श्वसनावाटे नायट्रेट संयुगाचा शरीराशी संपर्क आला तर त्वचा झिजते,फुफ्फुसाच्या कार्यात अडथळा येऊ शकतो, सल्फर संयुगे शरीराच्या संपर्कात आल्यास डोळे ,छाती,पचनसंस्थेत जळ जळ होते.
फटाक्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होते. दिवाळीच्या दोन दिवसात फटाक्यामुळे दोन डिग्री सेल्सियस इतकी तापमानात वाढ होते. फटाक्याच्या धुरामुळे झाडांच्या पानावर सल्फरचा जाड थर बसतो. पानातून होणारी वायूची देवघेव थांबते.
फटाक्यांचे आवाज 145 ते 160 डेसिबल इतकी पातळी गाठतात. हा आवाज लहान बंदूक, रायफलच्या आवाजाइतका असतो. हा जोराचा आवाज कानासाठी घातक असतो. त्यामुळे बहिरेपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार ,झोप न येणे. असे परिणाम माणसांमध्ये दिसून येतात.
1.फटाक्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात
2.फटाक्यामुळे जीवघेणे अपघात सुध्दा होऊ शकतात.आगी लागण्याची सुध्दा शक्यता असते.
3.फटाक्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होते, त्याच त्रास लहान मुले, वृध्द, गरोदर स्त्रिया तसेच आजारी व्यक्तींना होतो.
4.फटाके बणविन्यासाठी कागदाचा वापर होतो, व कागद निर्मितीसाठी वृक्षतोड होते व पर्यावरणाची हानी होते.
5.फटाके हे बालकामगार तयार करतात तामिळनाडू तील शिवकाशी यासाठी कुप्रसिद्ध आहे. म्हणजेच फटाक्यामुळे बालमजुरीला प्रोत्साहन मिळते
या सर्व दुष्परिणामाचा विचार करता ,फटाके फोडणे आपणास योग्य वाटते का? फटाके फोडणे म्हणजेच पैसे जाळणे होय. त्याऐवजी पुस्तके, भेटवस्तू, मिठाई, कपडे यावर पैसा खर्च करा.
चला तर येत्या दिवाळीला फटाके हद्दपार करण्याचा आपण संकल्प करु या. आपण फटाकेच विकत घेतले नाही तर,… त्याची मागणी आपोआप कमी होईल, परिणामी फटाक्याचे उत्पादन कमी कमी होत जाउन एक दिवस त्यावर बंदी येण्यास मदत होईल.
– प्रा. रमेश वरघट
चला ! फटाके करू हद्दपार
Contents hide