गुलाबी बोंड अळीसाठी पोषक काळ; उपाययोजना कराव्यात

बुलडाणा : गुलाबी बोंड अळी किंड वाढण्यासाठी दिवसाचे तापमान 29 अंश ते 32 अंश सें रात्रीचे तापमान 11 अंश ते 14 अंश से असायला पाहिजे. दिवसाची आर्द्रता 71 ते 80 टक्के तर रात्रीची आर्द्रता 26 ते 35 टक्के असणे हे किडीसाठी अत्यंत पोषक असते. सद्यास्थितीत असे वातावरण आहे आणि नेहमी प्रमाणे या काळात पोषक वातावरण राहते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

तसेच कपाशीचे 15 ते 20 दिवसांचे बोंड हे अळीचे आवडते खाद्य आहे. या सर्व कारणांमुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमाण शक्यता नाकारता येत नाही. गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावसाठी कपाशी पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन खालील उपायोजना कराव्यात.

फेरोमोन सापळ्याचा वापर करावा. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग आढल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय करावे. फुलावस्थेत दर आठवडयाने पिकांमध्ये मजुरांच्या सहाय्याने डोमकळ्या (गुलाबी बोंडअळीग्रस्त फुले) शोधुन नष्ट कराव्या. तसेच 5 टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझॉडीरेक्टीन 0.03 (300 पिपिएम) 50 मिली किंवा 0.15 टक्के (1500 पिपिएम) 25 मिली प्रती 10 लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रत्येक आठवडयाला एकरी शेतीचे प्रतिनिधीत्व करतील, अशी 20 झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे पक्व झालेले बाहेरुन किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंडे तोडून ते भुईमुंगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचून त्यामधील किडके बोंड व अळ्यांची संख्या मोजुन ती दोन किडके बोंड किंवा दोन पांढुरक्या, गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळ्या आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी ( 5 ते 10 टक्के) समजुन खालील सांगीतल्याप्रमाणे रासायनिक किटनाशकाची फवारणी

करावी. थोयोडीकार्ब 15.8 टक्के डब्लुपी 25 ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 25 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के 30 मिली किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के 10 मिली किंवा डेंल्टामेंथीन 2.8 टक्के 10 मिली यापैकी कोणतेही एक किटनाशक प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

जेथे प्रादुर्भाव 10 टक्क्यांच्यावर आहे, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून खालील पैकी

कोणत्याही एका मिश्र किटनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस 35 टक्के अधिक डेल्टामेथीन 1 टक्के 17 मिली किंवा क्लोरेंट्रानिलिप्रोल 9.3 टक्के अधिक लँब्डासायहॅलोथीन 4.6 टक्के 5 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के अधिक सायपरमेथ्रिन 5 टक्के 20 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के अधिक ॲसीटामोप्रिड 7.7 टक्के 10 मिली या प्रमाणे फवारणी करुन कपाशी पिकाचे संरक्षण करावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.