• Tue. Jun 6th, 2023

गरजूंना उपचार मिळवून देण्यासाठी ‘अमरावती आरोग्यम्’ पोर्टल- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

गरजूंना उपचार मिळवून देण्यासाठी ‘अमरावती आरोग्यम्’ पोर्टल- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती : जिल्ह्यातील गोरगरीब तसेच दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘अमरावती आरोग्यम्’ नावाचे पोर्टल विकसित करण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागातील गंभीर आजारासह इतर आजाराच्या रुग्णांची या पोर्टलद्वारे नोंद करुन त्यांना तत्काळ उपचार मिळवून देण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिली.

या कामाच्या समन्वयासाठी प्रत्येक तालुक्यात आरोग्य समन्वयक व आशा वर्कर यांची नेमणूक करण्यात येणार आहे. नागरिक, आरोग्य प्रशासन व आरोग्य संस्था यांच्यात समन्वय साधणारी एक यंत्रणा याद्वारे उभी राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व कोविड-19 आजारा संदर्भात सद्य:स्थितीचा आढावा जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक रणमले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे यांच्यासह खासगी रुग्णालयाचे पदाधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी बैठकीला उपस्थित होते.

श्री नवाल म्हणाले की, कोविड 19 आजाराचा प्रादुर्भाव तसेच इतरही गंभीर आजाराच्या रुग्णांना तत्काळवैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने जिल्हा प्रशासनाच्यावतीने अमरावती आरोग्यम् नावाचे हेल्थ पोर्टल विकसित करण्यात येत आहे. या पोर्टलवर तालुकास्तरीय वैद्यकीय समन्वयकव्दारे गंभीर आजार तसेच इतर आजाराच्या रुग्णाविषयी तसेच आजारासंदर्भात महत्वाच्या नोंदी करण्यात येणार आहेत. त्यांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालयात प्राधान्याने प्रवेश दिला जाणार आहे.सदर उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णाला त्याचे आधार कार्ड व रेशन कार्ड ही दोनच कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. या माध्यमातून उपचारार्थ दाखल होणाऱ्या गरीब रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेतून वैद्यकीय लाभ दिला जाणार असून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे.

प्रत्येक गावात या पोर्टलविषयी तसेच सुविधे संदर्भात माहिती होण्यासाठी संबंधित गावाच्या आशा वर्कर यांना सूचना देण्यात येणार असून तालुका स्तरावर आरोग्य समन्वयकाची नेमणूक करण्यात येणार आहे. अतितातडीच्या वेळेस 108, 102 रुग्णवाहिका सुध्दा उपलब्ध करुन देऊन रुग्णालयात पोहोचविली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नातून अनेक गोरगरीब रुग्णांना ज्यांना वैद्यकीय उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात संबंधित आजारासंदर्भात कोणते तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, कुठले रुग्णालयात शस्त्रक्रियेची सुविधा आहे, याविषयी संबंधित रुग्णास व डॉक्टरांना संदेशाच्या माध्यमातून माहिती जाणार आहे. त्यानुरुप रुग्णांवर उपचार करण्याची रुपरेषा ठरविली जाणार आहे.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना व सद्यस्थितीचा आढावा

कोरोनाबाधितांची प्रतिदिन आकडेवारी घटत चालली असली तरीही जोखीम कायम आहे. गत आठवड्यात तीन दिवस एकाही कोविडबाधितांचा मृत्यू झालेला नाही, ही जिल्ह्यासाठी चांगली बाब आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्णालयातील रुग्णसंख्येचा श्री नवाल यांनी आढावा घेवून ते म्हणाले की, ज्या रुग्णालयात दहापेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण आहेत, अशा रुग्णालयांनी तेथील रुग्ण सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करावे. कोविडबाधित रुग्णांवर उपचाराच्या अनुषंगाने सुमारे 12 हजार रुग्णांना शासनाकडून आरोग्य विम्याचा लाभ देण्यात आला आहे. तर उर्वरित साडे तीन हजार रुग्णांपैकी किती जणांना विम्याचा लाभ मिळाला किंवा नाही यासंदर्भात माहिती गोळा करुन जिल्हा प्रशासनाला सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

वर्धा जिल्ह्यातील सावंगी रुग्णालयाच्या धर्तीवर आपल्या जिल्ह्यात सर्व आजाराच्या रुग्णांना वैद्यकीय उपचार सुविधा मिळाली पाहिजे यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन लोककल्याणकारी काम करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी उपस्थित डॉक्टरांना केले. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी अधिक सतर्क राहून दक्षता नियमांचे पालन केले पाहिजे. दिवाळीचा कालावधी लक्षात घेऊन याबाबत सर्वांनी सजग राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *