• Fri. Jun 9th, 2023

करू साजरी दीपावली

ByBlog

Nov 15, 2020

पेटवूया दीप नक्षत्रांसम
उजळून टाकू घरआंगण
लाखो चांदण्यांनी चमके
डोईवर विशाल तारांगण
दीपावली हा संस्कृत शब्द आहे. दीपावली म्हणजे दिवाळी.दिवाळी म्हणजे दिव्यांच्या ओळी. कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा होणारा दिवाळी हा सण पणत्या आणि इलेक्ट्रीक लायटिंगच्या झगमगाटात साजरा केला जातो. ज्ञानाचा अज्ञानावर विजय म्हणून जागोजागी पणत्या आणि दीप प्रज्वलित केले जातात. दिव्यांची पूजा म्हणजे जीवनातील परिपूर्णता व संतोष होय. दिवाळी उत्सवाच्या सुरवातीलाच घर-अंगण साफसफाई करून सजविले जाते. घराची रंगरंगोटी केली जाते. घराघरात मिठाई आणि फराळाच्या विविध पदार्थांची रेलचेल असते. धन आणि ऐश्वर्याचे प्रतिक असलेल्या देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी व पारंपारिक चिन्हाने सुशोभित करून स्वागत केले जाते. संध्याकाळी तिची आपल्या घरात प्रवेशासाठी आराधना केली जाते. घरात येतानाची तिची कुंकवाच्या बोटांनी पावले उमटवली जातात. हा दिवस शुभ मानला जातो. रात्रभर दिव्यांची आरास केली जाते. या दिवशी गृहिणी सोनं, चांदी, भांडी खरेदी करतात. काही ठिकाणी पशुधनाची पूजा केली जाते. हा दिवस धन्वंतरी म्हणजे आयुर्वेदाची देवता असलेल्या देवाचा जन्म दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी मृत्यू देवता यमाचे पूजन करण्यासाठी रात्रभर दिवे पेटविले जातात.म्हणून या दिवसाला ‘यमदीपदान’ असेसुद्धा म्हटले जाते. मृत्यूचे भय दूर करण्यासाठी हे पूजन केले जाते.
दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण आहे. समाजात आनंद, प्रकाश, ज्ञान पसरवण्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. अज्ञानाचा अंधकार मिटवण्यासाठी दिव्यांच्या, पणत्यांच्या उजेडात ज्ञानोदय केला जातो. प्रत्येक घराला प्रकाशमान केले जाते.दिवाळीचा सण हेच सांगतो की मनात काही अढी, ताण असेल तर फटाक्यासारखे त्याला उडवून लावा आणि आयुष्याची परत नव्याने सुरुवात करून उत्सव साजरा करा. दिवाळीचा दुसरा दिवस नरकचतुर्दशीचा. भल्या पहाटे उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने दानवाचा वध करून सर्व कन्यांची मुक्तता केली. त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतले. वाईट प्रवृत्तींवर दिव्यतेच्या विजयाचे हे प्रतिक आहे.
अश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी लक्ष्मीपूजन प्रतिवर्षी केले जाते. त्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी स्थान शोधू लागते.घरांत लक्ष्मीची प्रतिष्ठापना करून पूजा अर्चा केली जाते.
वसतेय ज्या घरामध्ये
सुख समाधान शांती
तिथे पावले लक्ष्मीची
हासत सदासाठी जाती
जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष तसेच गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. ‘दिवाळीचा हा सण मोठा नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण उत्साहात साजरा केला जातो. दिव्यांची आणि आनंदाची उधळण करणारा हा सण महाराष्ट्रासह देश-विदेशातही साजरा केला जातो. लक्ष्मीपूजनच्या रात्री समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतिक असलेल्या लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. आपल्यावर लक्ष्मीची कृपादृष्टी रहावी यासाठी मनोकामना केली जाते. अक्षताने बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांच्यावर श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्मी या देवतांना लवंग, वेलची, साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. असे पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांची पूजा केली जाते. घरासमोर रांगोळी काढून दाराजवळ दोन्ही बाजूला स्वस्तिक काढतात. तुळशीपासून घरातील देवीपर्यंत लक्ष्मीची व गाईची पावले काढतात. लक्ष्मी पूजन करताना चौरंगावर लाल रंगाचा कपडा आणि रांगोळी घातली जाते. चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढतात. तांब्याच्या तांब्यात पाणी भरून त्यावर नारळ ठेवला जातो. सभोवती आंब्याची पानं सजवली जातात. देवीजवळ व्यापार संबंधित पुस्तक किंवा डायरी ठेवली जाते. लक्ष्मी नि गणपतीला तिलक लावून धूप, दिवा दाखवला जातो. लक्ष्मीमंत्र किंवा ॐ महालक्ष्मयै नमः जप करून षोडोपचार पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर आरती करतात. आरतीनंतर देवीला घरात आगमनाची प्रार्थना केली जाते. काही चुकलं असल्यास क्षमा याचना मागितली जाते. व्यापारी वर्गात फटाके उडवून आनंद साजरा केला जातो. सान थोर सर्वचजण नवीन कपडे घालून आप्तेष्टांना शुभेच्छा देतात. स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्‍त केले अशी आख्यायिका सांगितली जाते. लक्ष्मी ही विष्णूची पत्नी मानली गेली आहे.
दिवाळीचा चौथा दिवस प्रतिपदा म्हणजेच पाडवा असे संबोधले जाते. या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता आणि श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.या दिवशी सर्व सुवासिनी आपल्या पतिराजांना ओवाळून देवाकडे अखंड सौभाग्याचे दान मागतात.पतीकडून घसघशीत ओवाळणी लुटतात. दिवाळीचा पाचवा दिवस हा भाऊबीज. भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा दिवस. दोघातले अतूट प्रेमाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो.बहिण
आपल्या लाडक्या भावाला ओवाळून अखंड, सुखी, समाधान आणि समृद्धीचे दान परमेश्वराकडे मागतात. भाऊ आपल्या बहिणीला प्रेमाखातर सुंदर अशी भेटवस्तू देतो आणि गोडाधोडाचे जेवण करून हक्काने माहेरी येण्यास विनवितो.
दिवाळीला देवपूजेचे महत्त्व तरी आहेच. परंतु फटाक्यांच्या आतषबाजीने मिठाईच्या रेलचेलमध्ये आणि हसत-खेळत गप्पा मारत नातेवाईकांच्या भेटीगाठीमध्ये हा सण नवी कपडे, नवे दागिने खरेदी करून उल्हासाने साजरा केला जातो.मनातील मत्सर, हेवेदावे, अहंकार बाजूला ठेवून आप्तेष्ट आणि मित्र-मैत्रिणींना अभिष्टचिंतन केले जाते.
ठेवूनि दूर गर्व अहंकार करू
साजरा हा सण उल्लासात
आनंदाच्या या सोहळ्याला
करू प्रेमाची नित्य बरसात

सौ.भारती सावंत
मुंबई
9653445835

0 thoughts on “करू साजरी दीपावली”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *