• Mon. May 29th, 2023

आऊट ऑफ कव्हरेज एरिया..!

ByBlog

Nov 12, 2020

सध्याचे युग हे मोबाईलचे युग आहे. आता प्रत्येकजण मोबाईल आहे म्हणजेच तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भ्रमण करतो आहे. अगोदर मानवाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खूप कष्ट पडायचे. म्हणून त्याने वाहनांचा शोध लावला. एवढेच काय तर नंतर मोबाईल व्हॅन, मोबाईल दवाखाना व मोबाईल बँक ही संकल्पना उदयास आली.
हल्ली लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. मोबाईल ही आता काळाची गरज निर्माण होऊन माणसाच्या अधिकतम गरज पूर्ण करण्यासाठी मदतगार होत आहे व दिवसेनदिवस मोबाईलचा वापर वाढत असून त्याचा वावरसुद्धा वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकजण एकमेकांच्या संपर्कात आहे व संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहे. जर तातडीच्या वेळेस कोणी संपर्कात राहिले नाहीतर त्याला मोबाईलवर आऊट ऑफ कव्हरेज एरिया असा संदेश प्राप्त होतो व संपर्क करण्यासाठी तो अस्वस्थ होतो. जो संपर्कात नसतो त्याला ह्याची जाणीव नसते म्हणून त्याला नेमके काय घडते आहे ह्याची कल्पना सुद्धा नसते.
आऊट ऑफ कव्हरेज एरिया ही संकल्पना किंवा हा शब्द, हे वाक्य आपण जेव्हापासून मोबाईल वापरायला लागलो तेव्हा पासून ह्याशी आपण समरस झालो.
ही आऊट ऑफ कव्हरेज एरिया संकल्पना झाली मोबाईलच्या बाबतीत. पण अशा बऱ्याच बाबी आहेत की, मानव हा आऊट ऑफ कव्हरेज एरियामध्ये असतो.
जगामध्ये असे बरेच ज्ञान असते. परंतु ते ज्ञान आपल्याला अवगत नसते. ह्याला सुद्धा आपण आऊट ऑफ कव्हरेज एरिया असेच म्हणता येईल.
भारत हा देश कृषीप्रधान आहे असे म्हणतात. परंतु कृषी हा कधीच प्रधान नव्हता. तसेच भारत हा देश खेड्यांचा व दुर्गम भागात वसलेला देश आहे. ह्या देशात बरेच आदिवासी बांधव आहेत. ते शहरांपासून फार दूर आहेत. त्यांना त्यांचे अधिकार, हक्क व कर्तव्य माहित नाहीत. त्यांना काय सवलती मिळतात हे सुद्धा माहित नाही. त्यांना वैद्यकीय सुविधा, शैक्षणिक सुविधा याबाबत त्यांना गंध नाही. एका अर्थाने ते समाजापासून आऊट ऑफ कव्हरेज एरिया आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना लिहिली. सर्वांना सामान न्याय, हक्क व कर्तव्य त्यांनी मिळवून दिलेत. बऱ्याच जणांना ह्याबद्दल पुसटशी कल्पना सुद्धा नाही व ती जाणून घेण्याची व अमलात आणण्यासाठी प्रयत्न सुद्धा करीत नाही. हे सुद्धा आऊट ऑफ कव्हरेज एरिया म्हणावे लागेल.
आज विश्व व देश तंत्रज्ञानाने खूप पुढारलेला आहे परंतु ह्या बाबत बऱ्याच जणांना त्याची जाणीव नाही ह्याला सुद्धा आऊट ऑफ कव्हरेज एरियाच म्हणावे लागेल.
शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. आज बरीच मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. त्यांना त्यांच्या प्राथमिक गरजा सुद्धा पूर्ण करता येत नाहीत. ह्याला सुद्धा आऊट ऑफ कव्हरेज एरियाच म्हणजे लागेल.
आज बऱ्याचशा बँकेच्या स्वयंरोजगाराच्या योजना आहेत परंतु ह्याची चर्चा सुद्धा होत नाही व ह्याचा लाभ सुद्धा घेतल्या जात नाही. ह्याला सुद्धा आऊट ऑफ कव्हरेज एरिया म्हणता येईल.
१९ जुलै, १९६९ ला बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. बँका सरकारच्या मालकीच्या झाल्या. आता परत एकदा खासगीकरणाच्या वाटेवर आहेत. काही बँकांचे विलीनीकरण झाले. ह्यात बऱ्याच बँकांच्या शाखा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे बँकिंगच्या मूलभूत सेवेपासून सामान्य जनता ही दूर राहणार आहे म्हणजेच काय तर आऊट ऑफ कव्हरेज एरियाच.
माणसाने तंत्रज्ञाच्या मदतीने बरीच प्रगती केली. वेगवेगळ्या माध्यमाने तो एकमेकांशी संपर्क साधतो आहे. परंतु त्याला मन की बात करण्याची अजूनही गरज वाटते कारण की तो मनाने जोडल्या गेला नाही ह्याची त्याला खंत वाटते. म्हणजेच काय तर तो अजूनही मनाने आऊट ऑफ कव्हरेज एरियाच आहे…!
अरविंदसं. मोरे,
मुंबई, मो.९४२३१२५२५१.

0 thoughts on “आऊट ऑफ कव्हरेज एरिया..!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *