अंत:करणातील देऊळ कधी उघडणार..?

गेल्या मार्च २०२० पासून लॉक डाउन मध्ये गेलेली सर्व मंदिरे काल भाविकांसाठी खुली झाली. ह्या कोविडने सर्वांवर बंदी घातली व आपण सर्वानी आपल्या भावनांवर, इच्छांवर आवर घालावा लागला.
प्रत्येकाची मनोकामना असते की, त्याला त्याच्या जीवनात एकदा तरी देव भेटावा. त्यामुळे देवाची अतोनात भक्ती, सेवा व प्रार्थना करतांना आपण बरेचजण बघत असतो. ह्यात काही देवाला मागायचे म्हणू स्वार्थीपणानी विनवणी घालतात तर काही मनोभावे निस्वार्थी पणे सुद्धा प्रार्थना करतांना दिसतात. असो ज्याचा त्यांचा तो श्रद्धेचा विषय आहे.
या ठिकाणी मला एक देवाची गोष्ट आठवते.
” खूप वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. देवाने खूप हजारो वर्ष अध्ययन केले. मेहनत घेतली आणि ही सुंदर सृष्टी निर्माण केली. ह्या सुंदर सृष्टीत दोन सुंदर जीव निर्माण केले. एक म्हणजे प्राणी आणि दुसरा म्हणजे मानव. देवाने प्राण्याला आणि मानवाला एकत्र बोलावून सृष्टीचे काही नियम सांगितले. प्राणायला प्राण्याचे नियम, मानवाला मानवाचे नियम आणि असे सांगून देव निघून गेला.
काही दिवस, वर्षे प्राणी आणि मानव आप आपल्या जीवनात सुखाने जगू लागली. परंतु मानव शांत राहील तर तो मानव कसला. माणसांच्या असंख्य गरज असतात, इच्छा असतात, आकांक्षा असतात.
एक दिवस माणूस उठला आणि थेट टेकडीवर देवाच्या भेटीला गेला आणि म्हणाला देवा मला सुख दे, शांती दे, हे दे, ते दे. देवाने मानवाचे ऐकले आणि सांगितले. हे बघ आपले काय ठरले होते. प्राण्याला प्राण्याचे नियम आणि मानवाला मानवाचे नियम. त्यातच त्याने त्याचे जीवन जगायचे. प्राणी मला काही मागायला येतो का ? तर नाही. मग तू मानव परत परत माझ्याकडे कशासाठी येतो. मानवाने देवाने सांगितलेला उपदेश ऐकला व तो समजून गेला. काही वर्ष मानव शांत राहिला. तो पर्यंत देवाने टेकडी सोडून आपला मुक्काम हिमालयात हलविला.
काही वर्षा नंतर परत एकदा मानवाच्या इच्छा जागृत झाल्या. त्याच्या गरज वाढल्या व त्याला परत एकदा देवाची आठवण झाली. परत एकदा मानव देवाच्या भेटीला गेला. मानवाने देवाला गाठण्यासाठी चक्क हिमालयाला गवसणी घातली. देवाला विनवणी करू लागला. देवा मला सुख दे, शांती दे, मोटार दे, फ्रीझ दे, घर दे. देवाने परत एकदा मानवाला आठवण करून दिले. मानवाला मानवाचे नियम, प्राण्याला प्राण्याचे नियम. प्राणी माझ्याकडे येत नाही तू कसा नेहमी नेहमी येतो. आणि देव परत गायब झाला आणि चंद्रावर गेला. मानव काही दिवस काही वर्षे शांत झाला व आपले जीवन जगू लागला.
परत काही वर्षा नंतर मानवाच्या गरजा वाढल्या व त्याला परत देवाची आठवण झाली. तो चक्क देवाला भेटायला चंद्रावर गेला. देवा मला सुख दे, शांती दे, हे दे ते दे, मोबाइल दे, संगणक दे, लॅपटॉप दे आदी. देवाने परत आठवण करून दिली. प्राण्याला प्राण्याचे नियम, मानवाला मानवाचे नियम, प्राणी माझ्याकडे कधीच येत नाहीत..मानव परत एकदा समजला व परत पृथ्वी वर आला. देव परत गायब झाला व दूर ग्रहावर गेला.
मानव काही वर्ष शांत राहिला. परत एकदा मानवाच्या गरजा वाढल्या त्याला परत एकदा देवाची आठवण झाली. तो देवाला भेटायला दूरच्या ग्रहावर गेला आणि म्हणाला. देवा मला सुख दे, शांती दे, हे दे, ते दे. सुंदर बायको दे, चांगला नवरा दे वगैरे वगैरे.
देवाने परत एकदा मानवाला समजाविले व मानव परत एकदा समजला व पृथ्वीवर समाधानी वृत्तीने परतला. परंतु देव नाराज झाला. देव मानवाला कंटाळला आणि म्हणाला मानवाची काही तरी सोय केली पाहिजे. जो देव गायब झाला आणि त्याने मानवाच्या अंतःकरणात प्रवेश केला.
तेव्हा पासून मानव देवाच्या प्रत्यक्ष भेटण्यासाठी वन वन हिंडतो आहे पण तो दिसत, भेटत नाही.
तो कधी मानव रुपी कोणाला मदत करतांना दिसतो, सामाजिक कार्य, दान निस्वार्थी पणाने करतांना दिसतो. डॉक्टरच्या रूपात दिसतो. कधी भेकेलेल्याना जेवण देतांना दिसतो. कधी रुग्णांची सेवा करतांना दिसतो.
देवा मानवाला म्हणतो मानव मी तुला जे दिलेना ते मी कोणालाही दिले नाही. मी तुझ्यावर फार प्रेम करतो. मी तुला अनमोल भेट दिली ती म्हणजे बुद्धी. ह्या बुद्धीच्या भरवशावर तू टेकडीवर आला. तू हिमालयावर आला, चंद्रावर आला, ग्रहावर आला. ह्याच बुद्धीच्या भरवशावर तू सायकल पासून मोटार,रेल्वे, बस, विमान, जहाज व औषधींचा शोध लावून असाध्य रोगांवर मत केली असून तुला अजून काय पाहिजे.
तू ह्या बुद्धीचा चांगला उपयोग करून नंदनवन खुलवू शकतो. शांती व प्रेमाचा संदेश पोहचू शकतो.
आणि जेव्हा तू अडचणीत असतो तेव्हा तू अंतर मनाचं ऐकतोस ना ?
आता तरी अंतःकरणातील देऊळ उघड आणि मानवजातीचे मंगल कर. सर्वांचे मंगल होवो..!
– अरविंद सं. मोरे, नवीन पनवेल पूर्व मो.क्र.९४२३१२५२५१.