औरंगाबाद : सापडलेली रक्कम स्वत:ला ठेवली तरी ती कधी ना कधी संपणारच असते, असा विचार करून भोईवाड्यातील मराठा विद्यार्थी वसतिगृहातील १९ वर्षीय विद्यार्थ्याने कचर्यात सापडलेले ९८ हजार ५00 रुपये तत्काळ वॉर्डनकडे जमा केले. आळंदी येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्याने परक्याचे धन मृत्तिकेसमान हा तुकोबांचा अभंग नुसता पाठ केला नाही तर तो हा अभंग जगत आहे, हेच त्याच्या इमानदारीने दाखवून दिले.
ज्ञानेश्वर हरिदास टाले (१९, रा. चांदणी, ता. पातूर, जि. अकोला) असे त्या प्रामाणिक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो एक वर्षापासून भोईवाड्यातील मराठा विद्यार्थी वसतिगृहात राहतो. विवेकानंद कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्रात द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तसेच, स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे. ज्ञानेश्वर यास अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असतानाही ज्ञानेश्वर हा नैतिकता आणि प्रामाणिकपणा जोपासतो. या हॉस्टेलचे विद्यार्थी दर रविवारी शहरातील एका चौकात साफसफाई करतात.त्यांनी वसतिगृहाचा परिसर स्वच्छ करण्याचे ठरविले. वॉर्डन विंग कमांडर टी. आर. जाधव यांनी ज्ञानेश्वरला स्वच्छता करण्यास सांगितल्यानंतर साफसफाई करताना कचराकुंडीजवळ पांढर्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत त्याला पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल असल्याचे दिसले. त्याने ती पिशवी उचलून पाहिली. त्यात मातीने मळलेल्या नोटांचे बंडल असल्याची खात्री पटली. काही नोटा फाटलेल्या होत्या. पाचशेच्या नोटांचे बंडल ही कोणत्याही विद्यार्थ्यासाठी फार मोठी रक्कम असते. तरीही इतर कुठलाही विचार न करता त्याने ही पिशवी जशीच्या तशी जाधव यांच्याकडे जमा केली.
पैशांचा शोध घेत कोणी तरी येईल, विचारणा होईल तेव्हा खात्री पटवून त्यांना ही रक्कम देता येईल, असा विचार करून जाधव यांनी ही रक्कम जमा करून घेतली. परंतु, चार दिवस उलटले तरी कोणीही न आल्याने अखेर ही रक्कम क्रांती चौक पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. तपासिक अंमलदार सहायक फौजदार संजय बनकर यांनी बेवारस मालमत्ता म्हणून ती जमा करून घेतली. त्यानंतर ज्ञानेश्वरच्या प्रामाणिकपणाचे कौतुक म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, पोलिस निरीक्षक अमोल देवकर, उपनिरीक्षक महादेव गायकवाड, सहायक फौजदार संजय बनकर यांनी त्याचा सत्कार केला. ज्ञानेश्वरने आळंदीला वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतले आहे. तो आठव्या वर्गात असताना वडिलांसोबत बसने आळंदीला जात होता. तेव्हा त्यांना बसमध्ये ५0 हजार रुपये सापडले होते. ही रक्कम बसमधीलच एका प्रवाशाची होती. प्रवाशाला पैसे हरवल्याचे लक्षात येताच त्याने शोधाशोध सुरू केली. ज्ञानेश्वरच्या वडिलांनी तत्काळ ही रक्कम त्यांना परत केली होती. वडिलांचे हेच संस्कार आज मला कामी आले. मी रक्कम तत्काळ वॉर्डन विंग कमांडर टी. आर. जाधव यांच्याकडे जमा केली, असे ज्ञानेश्वरने सांगितले.
Related Stories
December 2, 2023