मुंबई : ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे भारत सासणे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. त्यांचे नाव सुरूवातीपासून चर्चेत आघाडीवर होते त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चितच मानली जात होती. लातुरच्या उदगीर येथे आगामी साहित्य संमेलन पार पडणार आहे.
यापुढच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘चालता- बोलता’ हवा, अशी अपेक्षा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकच्या संमेलनात व्यक्त केली होती. ती अपेक्षा लगेच उदगीरच्या संमेलनात पूर्ण झाली आहे. संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी रविवार (२ जानेवारी) उदगीर येथे महामंडळाची बैठक होती. या बैठकीत प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी एकमताने शिक्कामोर्तब झाला आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूर या महामंडळाच्या तीन घटक संस्थांनी अध्यक्षपदासाठी जी नावे सुचवली आहेत त्यात सासणे यांचे नाव एक सारखे होते. याशिवाय महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या ‘मनातील नाव’ही सासणे हेच असल्याने तेच अध्यक्षपदी निवडले जातील, अशी साहित्य वतरुळातही चर्चा होती. सासणे यांच्यासोबतच अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे चर्चेत होती. मुंबईच्या संस्थेने भारत सासणे व प्रवीण दवणे यांची नावे सुचविल्याची माहिती समोर आली होती. तर, छत्तीसगडच्या संस्थेने अनिल अवचट यांचे नाव पुढे केले आहे तर पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून जी तीन नावे महामंडळाला पाठवण्यात आली आहेत त्यात सासणे यांच्यासोबतच अनिल अवचट, अच्युत गोडबोले, डॉ. रामचंद्र देखणे यांचीही नावे होती. याआधीचे लागोपाठ तीन संमेलनाध्यक्ष निवडताना महाराष्ट्र साहित्य परिषदेने जे नाव सुचवले तेच अंतिम झाले होते. यावेळीही पुण्याच्या यादीत सासणे यांचे नाव होतेच. त्यामुळे सासणे यांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट होते.