होय मी शाळाच बोलतेय
पंचवीस मार्च दोन हजार विसचा
तो दिवस आठवतोय मला
तो दिवस म्हणजे
माझ्या जीवनातील
अगदी काळा दिवस
अगदीच अंधार युग
म्हटलं तरी चालेल
इतकं माझं वय झालंय
पण….
असा काळ निदान
माझ्या जीवनात तरी
मी अनुभवलेला नाही
या अशुभ दिवसापासून
दिवसभर गजबजणारं
माझं अंगण
सुनसान झालंय
अगदीच पोरकं झालंय
एका आईच्या
वेड्या मायेप्रमाणे
तिची हिरावलेली पिल्लं
तिला लवकरच येवून बिलगतील
आणि ओक्साबोक्शी हंबरडा फोडून
पारख्या झालेल्या पिल्लांना
कडकडून कवटाळावं
तसं झालंय मला आज
कधी माझी चिल्लीपिल्ली येतात
आणि कधी मी त्यांना
हृदयाशी घेऊन
घट्ट मिठी मारतेय
असं झालंय मला
दररोज न चुकता
अगदी वेळेवर
ठराविक वेळीच
मोठ्याने आवाज करणारी घंटा
तिचा आवाज कानावर
पडत नाही म्हणून
कान अगदी बधिर
झाल्यासारखे वाटतात मला
तो आवाज
कर्णकर्कश का असेना
पण …..
खूप आतुर झालेय
मी तो ऐकायला
राग आल्यासारखी
रुसून फुगून
बंद दाराआड,
न राहवून
स्वताला कोंडून घेतलेली
ती बाकं
त्यावरील भाबड्या भावंडांच्या
त्या थापा
त्यांच्या आदळण्या आपटण्याचा
आवाज अस्वस्थ करून
सोडतोय मला
तो भिंतीवरचं
काळंकुट्ट असलेलं
माझं लेकरु बघा
रंगाचं काय घेऊन बसलात
आईला लेकरं
काळे काय नि गोरे काय
सगळे सारखेच
तो बिचारा
उदास होऊन बसलाय
ना कोणी बोलायला
ना कोणी चालायला
ना कोणी रेघोट्या ओढायला
त्याला कुठे माहिती होतं
असला दिवस उजाडेल
असा हा एकांतवास
माझ्या नशिबी येईल म्हणून
स्वप्नातही कल्पना केली नसेल त्याने
तो खडू बघा
डब्ब्याच्या आत
जीव गुदमरतोय त्याचा
पण बोलायची सोय नाही
त्यालाही वाटत असेल
कधी मी
गुरुजींच्या हाती जातोय
आणि कधी मला
चेतना मिळतेय म्हणून
वेगवेगळ्या रंगांच्या माध्यमातून
सप्तरंगी इंद्रधनुष्याचे रंग
फळ्यावर कोरण्यात
किती दंग असायचा तो
पण बघा
कसा बेरंग झालाय
जसं सारं जीवनच
रंगविहिन झाल्यासारखं
वाटतय त्याला
अहो बघाना
त्या हजेऱ्यातील पानं बघा
कशी एकमेकांना बिलगून बसलीत
जशी कडक थंडीनं
गारठून गेलीत बिचारी
दररोज गुरुजींच्या मायेचा
हात फिरायचा
त्यांच्या सर्वांगावरुन
पण …..
त्यालाही पारखी झालीत बिचारी
महिन्यातील
एखादा दिवस उजाडतो
ज्या दिवशी गुरुजींच्या
मऊगार स्पर्शाने
त्या नको तेवढ्या
सुखावून जातात
गुरुजींच्या रुपात
वावरणारी माझी लेकरं
कधी न अनुभवलेला
जीवघेणा अज्ञातवास
सतावतोय त्यांना
अगदी नकोसा झालाय
बरं का!
कधी माझी
चिल्लीपिल्ली भावंड येतात
आणि कधी माझ्या
अंगाखांद्यावर खेळतात
असं झालंय त्यांना
धावत धावत येऊन
वर्गात बसून
त्यांच्या सोबत
गुजगोष्टी करायला
तडफडताहेत ती
त्यांचीही आतुरता
आता शिगेला पोहोचलीय
बरं का!
नकळत एखाद्याने यावं
आणि गचकन गळा दाबावा
कंठातून बाहेर येणारे स्वर
आतल्या आत
दम कोंडून विरावेत
असं झालंय त्यांना
एकदाचे कधी ते येतात
कधी त्यांना
कोरोना विषाणूच्या
पराक्रमाची कथा सांगतोय
कधी प्रेमाने जवळ घेतोय
कधी त्यांना गोंजारतोय
कधी हलकीशी शिक्षा करतोय
कधी जीवनातील संघर्ष सांगतोय
आणि आडवळणाची
जीवनवाट
कशी चालावी
आणि यशस्वी कसं व्हावं
हे सांगण्यासाठी
नको तेवढं
आतुरलय त्यांचं मन
विद्यार्थी शिक्षक घंटा
खडू फळा फर्निचर
आणि अभ्यासासाठी असणारी
वेगवेगळी दालनं
ही सारी सारी माझी लेकरं
कशी निराधार झालीत बघा
किती किती काळजी घेतात माझी
जीव ओवाळून टाकतात
माझ्यावर
माझ्या थोरल्याला तर
थोडीशीही
उसंत मिळत नाही
कधीही बघा
तो त्याच्याच कामात व्यस्त असतो
पण ….तो
थोरल्याचं थोरपण
अगदी प्रामाणिकपणे निभावतोय
आस्थेने साऱ्या भावंडांची
चौकशी करतो
आणि काळजीही तेवढीच
घेतोय बरं का!
माझ्या संपूर्ण घराची स्वच्छता
ठेवण्याची जबाबदारी
घेतलीय माझ्या सानुल्यांनी
माझं घर अंगण
आणि सारा परिसर
असं स्वच्छ
आणि टापटीप ठेवतात ते
मला घराकडे लक्ष देण्याची
गरजही वाटत नाही
माझ्या घरावरचं
मानाचं बिरुद म्हणजे ध्वज
तो दिमाखात फडकत असतो
किती संकटं आली गेली
किती वेदना झाल्या
पण …..
तिरंग्याचा मान सन्मान
तसूभरही
कमी होवू दिला नाही
माझ्या लेकरांनी
कारण…..
तोच तर
आमच्या अस्मितेचा प्रतिक आहे
स्वातंत्र्याचा वृक्ष लावलेल्या
आमच्या पूर्वजांची आठवण
ज्याची मधूर फळं
आम्ही आजतागायत
खात आहोत
त्याचं स्मरण
बिनदिक्कत
करुन देतो तो आम्हाला
पण …..
का कोण जाणे
आज मला
कसं तरीच वाटतय
या साऱ्या भावंडांनी
एकत्र येऊन
खेळावं बागडावं
छान छान गोष्टी कराव्या
एकमेकांची खबरबात विचारावी
विजनवासात घालवलेल्या
दिवसांची
आस्थेने आपुलकीने
विचारपूस करावी
आणि परत एकदा
माझ्या या एकत्रित कुटुंबाचे
सौख्याचे आनंदाचे
ते दिवस
लवकर परत यावेत
असं मला झालंय
म्हणून ……
मी आज अतिशय
आतूर झालेय
माझ्या लेकरांना बिलगण्यासाठी
कडकडून मिठी मारण्यासाठी
कधी तो दिवस उजाडतोय
कधी तो
पूर्वीचा आवाज
माझ्या कानी घुमतोय
यासाठी
जीवाचे कान करून
माझे डोळे
त्या दिशेला
लागलेले आहेत
हो ..
त्याच दिशेला
लागले आहेत
आणि मी
माझ्या
विजयी होऊन येणाऱ्या
लेकरांच्या स्वागतासाठी
हाती निरांजन घेऊन
उभी आहे दारात
वाट पाहत
वाट पाहत
वाट पाहत
– पी के पवार
सोनाळा बुलढाणा
९४२१४९०७३१