अमरावती : कोविडबाधितांची संख्या कमी झाल्याने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत लागू संचारबंदीत शिथीलता आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. जनजीवन पूर्वपदावर येऊन उद्योग, व्यवसायांना चालना मिळावी यासाठी शासन सकारात्मक आहे. त्यानुसार उपाहारगृहे, हॉटेल, बार, खानावळी आदी व्यवसायांनाही आठवड्याचे सातही दिवस रात्री 10 वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.
कोविडबाधितांची संख्या घटल्याच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत काही शिथीलता आणून दुकाने, आस्थापना सोमवार ते शुक्रवार रात्री 8 पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, हॉटेल, उपाहारगृहे, खानावळींना सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत एकूण 50 टक्के आसन क्षमतेसह व दुपारी 4 ते रात्री 8 पर्यंत घरपोच सेवा पुरविण्याचे संचारबंदी आदेशात नमूद आहे. तथापि, मर्यादित वेळेमुळे हॉटेल, बार, उपाहारगृहाच्या व्यवसायांवर मोठा परिणाम होत आहे. गत दीड वर्षांपासून सातत्याने अडथळे आहेत. या पार्श्वभूमीवर, तसेच रुग्णसंख्या कमी झालेली असल्याने हॉटेल, बार, उपाहारगृहांनाही रात्री खुले ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी माहिती व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. त्याची दखल घेऊन या व्यवसायांनाही रात्रीपर्यंत खुले ठेवण्यास परवानगीबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना दिले. त्यानुसार जिल्हाधिका-यांकडून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.