- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायक यांच्या कार्याचे संस्मरण व आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’अंतर्गत 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झंडा’ हा उपक्रम ध्वजसंहितेचे पालन करुन राबविण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.
उपक्रमात जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात प्रत्येक घरावर, कार्यालयावर, दुकानावर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज लावण्यासाठी जनजागृती मोहिम प्रभावीपणे राबविण्यात यावी व नागरिकांना प्रोत्साहित करावे. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडित यंत्रणांचा वापर करून कार्यक्रम यशस्वी करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी तालुका प्रशासनाला दिले आहेत.
उपक्रमाबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे शासन परिपत्रक जारी करण्यात आले असून, ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे, रूग्णालये, रास्त भाव धान्य दुकाने, शाळा व महाविद्यालये, पोलीस, परिवहन सुविधा, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. उपक्रमाची विविध माध्यमांतून भरीव प्रसिद्धी करून सर्वांचा सहभाग मिळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.