अमरावती प्रतिनिधी :’स्तनपान सप्ताह’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर १९९२ पासून साजरा करण्याचे कारण याविषयी स्त्रियांमध्ये असलेले गैरसमज दूर करुन जागृतता निर्माण व्हावी हा आहे. करणे स्तनपान बाळाचा अधिकार आहेच आणि तो त्याला द्यायलाच पाहिजे तरच मातृत्वाची जवाबदारी योग्यरीत्या पार पाडली जाईल. स्तनपान बाळासाठी नैसर्गिक व संपूर्ण पोषक घटकयुक्त असणारे अन्न आहे. यामुळे बालकाचा शारिरिक, माणसिक, बौध्दिक व भावनिक विकास योग्य गतिने व दिशेने होत असल्याचे प्रतिपादन डॉ. अंजली पांडे यांनी केले.
श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टव्दारा संचालीत तक्षशिला महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्र विभागाव्दारे स्तनपान सप्ताहानिमीत्त आयोजित आभासी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आजच्या किशोरी भविष्यातील उत्तम माता बनविण्याच्या दृष्टीने तसेच देशासाठी सुदृध व निरोगी नागरीक घडविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संगिता मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. सनोबर कहेकशा, स्नेहा वासनिक व शालीनी मांडवधरे यांच्यासह विद्यार्थीनींची उपस्थिती होती.