- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ संचालित, वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेत संस्थेचे प्रधानसचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व शालेय समिती अध्यक्षा, डॉ. सौ. माधुरीताई चेंडके यांच्या मार्गदर्शनात सर्व कर्मचारी वृंद विद्यार्थ्यांकरीता विविध शैक्षणिक, सांस्कृतिक अभ्यासपूरक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करतात.त्याची पालक वर्गातूनही विशेष दखल घेतली जात आहे.
नुकतेच शाळेचे आदर्श युवा शिक्षक सुजित खोजरे यांचा त्यांचाच माजी विद्यार्थी मयंक सतीश इंगोले व त्याच्या कुटुंबीयांनी मयंक च्या वाढदिवशी शाळेत येऊन शाल श्रीफळ व रोपटे देऊन सत्कार केला.मयंकला शाळेची व अभ्यासाची आवड निर्माण करणे, त्याला अभ्यासाकरिता विशेष सहकार्य करणे, थोरामोठ्यांचा आदर करणे, नेहमी खरे बोलणे, स्वच्छता, टापटीपणा अशा अनेक चांगल्या सवयी व मूल्ये रुजविण्याचे काम त्याचे प्राथमिक शाळेचे वर्गशिक्षक सुजित खोजरे यांनी अतिशय उत्तमरीत्या पार पाडले. घरी रोजगाराच्या निमित्याने मयंकचा अभ्यास कोणी घेऊ शकत नाही तरी खोजरे यांनी अधिक मेहनत घेऊन त्याच्यात खूप चांगले बदल घडवून आणले. याकरिता मयंकच्या वाढदिवशी त्याच्या कुटुंबीयांनी शाळेत येऊन खोजरे यांचा सत्कार करून त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
या सत्कार प्रसंगी बोलताना मयंकच्या आई वैशाली यांनी संस्थेचे, शाळेचे, व सर्व कर्मचारी वृंदाचे विशेष आभार यावेळी मानले. “विद्यार्थी आहे तर आम्ही आहे, विद्यार्थी हेच आमचं खरं दैवत! त्यांना घडविणे हेच आमचे आद्य कर्तव्य आहे.” असे सत्काराला उत्तर देताना सुजित खोजरे म्हणाले. सर्वांचे आभार व्यक्त करताना “सतत समाजाला मदतीचा हात देण्यास तत्पर असणाऱ्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळासारख्या सेवाभावी संस्थेकडून व पद्मश्री वैद्य साहेबांकडून आम्हाला या सर्व कार्यांकरिता ऊर्जा मिळते, व त्यामुळेच सर्व कर्मचारी आपापली कामे अतिशय निष्ठापूर्वक व विद्यार्थ्यांप्रती आस्था ठेवून करतात.त्यामुळे शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत असून पालक आमच्यावर करीत असलेला विश्वास हीच आमच्या कार्याची खरी पोच पावती आहे,” असे मुख्याध्यापक दिलीप सदार यांनी नमूद केले. कार्यक्रमास मयंक यादव, वैशाली यादव, दिलीप सदार, मोनिका पाटील, ज्योती मडावी, सुजित खोजरे, आसावरी सोवळे, सचिन वंदे, संध्या कुऱ्हेकर, विलास देठे, अमोल पाचपोर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.