भारत देशातील स्त्रियांना ब्राम्हण भट शाहीच्या मनुस्मृतीने अज्ञान, अंधश्रधेच्या जोखडामध्ये बांधून ठेवले होते त्या स्त्रियांना पूर्णपणे मुक्त करण्याचे कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी केले. ज्या समाजामध्ये स्त्रियांना शिक्षण घेणे महापाप समजल्या जात होते आणि स्त्री शिक्षण घेत असेल तर ते घर आणि तो समाज अधोगतीला जातो, तो समाज बुडतो असे म्हटल्या जात होते. त्याच समाजामध्ये, संस्कृतीमध्ये सावित्रीबाई फुलेंनी ज्ञानाची ज्योत पेटवून मनूचा आणि ब्राम्हण भट शाहीचा कावा उघडा करून दाखविला. आणि आज प्रत्येक घरची स्त्री जर शिक्षित असेल तर ती स्त्री त्या घराला, त्या समाजाला आणि देशाला किती पुढे घेवून जाऊ शकते आणि त्या घराचा, समाजाचा आणि देशाचा किती विकास घडून येऊ शकतो याची प्रचीती आजच्या घडीला आपणास दिसून येते. सावित्रीबाई फुलेंनी लढलेला लढा हा स्त्री स्वातंत्र्याचा लढा होता.
सावित्रीबाईच्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीने अनेक स्त्रिया घडविल्या. शिक्षण घेऊन त्या सामाजिक चळवळीमध्ये भाग घेऊ लागल्या आणि त्यांच्याच प्रेरणेने प्रेरित होऊन उच्च पदस्थ झाल्या आणि समाजाची आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावू लागल्या. त्यातील काही प्रातिनिधिक स्त्रियांचा आढावा या लेखामध्ये घेतलेला आहे.
- ताराबाई मोडक
ज्या काळात बालशिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा ‘वेडेपणा’ होता. त्या काळात लोकांपर्यंत जावून बालशिक्षणाला शास्त्रीय बैठक देवून बालशिक्षण एक शास्त्र म्हणून उदयाला आणले. १९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची स्थापना झाली आणि त्याच्यातर्फे ‘शिक्षणपत्रिका’ हे मासिक प्रकाशित होऊ लागले नियतकालिकाचे संपादन ताराबाईंनी केले सोबतच ताराबाईंनी शंभरच्यावर पुस्तकांचे संपादन केले, काहींचे लेखन केले, बालशिक्षणात भारतीय नृत्यप्रकार, कलाप्रकार, लोकगीते आणि अभिजात संगीत यांचाही समावेश केला. बालशिक्षण तळागाळापर्यंत जाण्यासाठी पालक आणि शासन यांच्या प्रबोधनाचे कामही केले. पुढील काळात मुंबईला इ.स. १९३६ शिशुविहार सुरू केले. ताराबाईंना इ.स. १९६२ साली ‘पद्मभूषण’ हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान बहाल केला. इ.स. १९४६- ते इ.स. १९५१ मध्ये मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते.
- इंदिरा गांधी
इंदिरा गांधी २४ जानेवारी १९६६ रोजी भारताच्या पाचव्या तसेच पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या . बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात त्या माहिती व नभोवाणी मंत्री होत्या१४ प्रमुख व्यापारी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
- आनंदीबाई जोशी
आनंदीबाईंच्या मुलाला वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आणि त्यांना डॉक्टर बनण्याची प्रेरणा मिळाली. आनंदीबाई सावित्रीबाई फुले च्या शिक्षण चळवळी मुळे त्या पुरोगामी विचारवंत झाल्या त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. १८८३ मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया’मध्ये अमेरिकेत प्रवेश मिळाला. सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंला डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले, मार्च इ.स.१८८६ मध्ये आनंदीबाईना एम.डी.ची पदवी मिळाली. एम.डी.साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले. ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्व उपस्थितांनी उभे राहून जोरदार टाळ्या वाजवून आनंदीबाईंची प्रशंसा केली.
- कल्पना चावला
कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी झाला . कल्पना एक स्त्री आहे ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे कर्नालच्या फ्लाईंग क्लबमधील अधिकाऱ्यांनी वैमानिक होण्याच्या वेडापासून दूर राहण्यास सांगितले त्यामुळे कल्पना यांचा हिरमोड झाला. परंतु सावित्रीबाई फुले यांच्या चळवळी मुळे कदचित स्त्रियांची प्रगती कल्पना यांनी पहिली असेल त्यांमुळे आपल्या निर्णयावर ठाम राहून त्यांनी पंजाब विद्यापीठातून १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. ई. स. १९८४ मध्ये अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन, त्यांनी कॉलोरॅडो विदयापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली. डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५ व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला
- प्रतिभा देवीसिंह पाटील
२५ जुलै २००७ रोजी प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून जबाबदारी स्वीकारली. प्रतिभाताईंनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली त्यांनी गरीब व निराधार महिलांसाठी महाराष्ट्रात वसतिगृहे काढली. आमदार , खासदार, मंत्री व राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या.प्रतिभाताई पाटील या जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत की ज्यांनी एकही निवडणूक हरली नाही. ७ जुलै १९६५ ला त्यांनी लग्न करून अमरावतीच्या शेखावतांच्या घरात प्रवेश केला व पहिल्यांदाच मंत्री झाल्या. त्यानंतर पुढे सतत वीस वर्षे त्या निरनिराळ्या खात्यांच्या मंत्री होत्या. आरोग्य, पर्यटन, संसदीय कामकाज, गृहनिर्माण, समाजकल्याण व सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य व समाजकल्याण, दारुबंदी व पुनर्वसन, शिक्षणमंत्री, विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड वगैरे. १९७९ ते ८० या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
- नलिनीताई लढके
पश्चिम विदर्भातील एक लढवय्या स्त्री म्हणजे नलिनीताई लढके या महात्मा फुलेंच्या तत्वप्रणाली प्रमाणे आणि डॉ. बबासाहेब आंबेडकरांच्या दलित उद्धारक चळवळीमध्ये सक्रीय कार्य केले. त्यांनी विदर्भामध्ये स्त्री चळवळ मोठ्या जोमाने चालविली. नलिनीताई लढके यांनी अन्यायाविरुद्ध प्रथम लढा नगरपालिका, अमरावती येथे दिला. त्या केवळ दलित असल्यामुळे मुख्याध्यापक पदापासून वंचित ठेवण्यात आले म्हणून त्यांनी आवाज उठविला. अमरावती येथे भरलेल्या महिला परिषदेमध्ये त्यांनी हिंदू कोड बिलाच्या समर्थनार्थ भाषण केले महिलांकरिता हे बिल किती उपयुक्त आहे हे महिलांना पटवून दिले उपस्थित महिलांनी बिलाच्या विरुद्ध मते नोंदवू नये असे आवाहन केले. बाल संगोपन, स्त्री शिक्षण याबाबत महिलांना त्या सतत मार्गदर्शन करीत असत. त्यांनी केलेल्या कार्याप्रती त्यांना५ सप्टेंबर १९७७ ला माध्यमिक स्तरावरील राष्ट्रीय स्वरूपाचा ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र शासनाने त्यांना १९८६-८७ ला ‘सावित्रीबाई फुले’ हा पुरस्कार देण्यात आला.
- मेघा पाटकर
मेघा पाटकर यांनी अनेक सामाजिक प्रश्नावर त्यांनी आंदोलने केली टाटा सामाजिक शास्त्र संस्थेतून एम.ए. पदवी मिळवून सात वर्षे मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांमधून काम केले. काही काळ टाटा सामाजिक शास्त्र संस्थेत शिक्षकाचे कामही केले. नर्मदा बचाव आंदोलन, सिंगूर नंदीग्रामच्या सेझ प्रश्नावर (नॅनो प्रकल्प) आंदोलन, राज ठाकरे यांनी पुकारलेल्या भय्याविरोधी आंदोलनाला त्यांनी विरोध नोंदववून राष्ट्रीय एकात्मकता साठी कार्य केले त्यांना मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार राइट लाइव्हलिहुड ॲवॉर्ड, स्वीडन – १९९१. पर्यायी नोबल पारितोषिक, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार, मानवी हक्क रक्षक पुरस्कार – ॲम्नेस्टी इंटरनॅशनल यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी येथील जैताई देवस्थानतर्फे जैताई मातृगौरव पुरस्कार अश्या अनेक कार्याची प्रेरणा त्यांना सावित्रीबाई यांच्या कडून मिळाली आहे.
- अरुंधती रॉय
अरुंधती रॉय या भारतीय विद्रोही साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या पहिल्या ‘ द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज’ कादंबरीला इ.स. १९९७ वर्षीचा बुकर पुरस्कार मिळाला. त्यांचे अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांनी लेखन केलेला आहे. १९९८ मध्ये रॉयने सर्वोत्कृष्ट पटकथासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांनी समकालीन राजकारण आणि संस्कृतीवर असंख्य निबंध लिहिले आहेत. सामाजिक प्रश्नावर परखड पणे लिखाण करण्याची शक्ती शिक्षणा मुळे मिळाली ते शिक्षण महिलांना सावित्रीबाई फुलेंनी दिले.
- किरण बेदी
किरण बेदी ह्या भारताच्या पहिल्या उच्चपदी महिला पोलीस अधिकारी होत्या. त्या एक सामर्थ्यशाली पोलीस ऑफिसर, एक समाजसेविका, महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून नावारूपास आल्या. त्यांनी महिलांविरुद्ध होणाऱ्या हुंडाबळी, बलात्कार,घरगुती हिंसा, शोषण, ऍसिड हल्ले, सारख्या समस्यांना आळा घालण्यासाठी खूप प्रयत्न केले. २००७ मध्ये किरण बेदींनी नवज्योती दिल्ली फौंडेशन ची स्थापना करून जवळपास २५००० जणांची नाशामुक्ती केली. महिलांच्या समान हक्कासाठी कायम आपली झुंज सुरु ठेवली. त्यांना ई.स. १९९४ साली रमण मॅगसेसे पुरस्काराने १९९४ साली देण्यात आला. तसेच नॉर्वे मधील गुड टेम्पलर्स ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेने आशिया पुरस्कार दिला. “इट्स अल्वेस पॉसिबल” “आय डेअर”, “इंडियन पोलीस”, “लीडरशिप अँड गव्हर्नन्स” हि त्यांनी लिहिलेले पुस्तके आहेत.
- रूपा बोधी कुलकर्णी
इ.स. १९८० मध्ये रूपा कुळकर्णी यांनी मोलकरणींना संघटित करून त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी लढा सुरू केला. २८ वर्षांच्या लढ्यानंतर घरकाम कामगारांसाठी २००८ मध्ये महाराष्ट्रात ‘घरेलू कामगार कायदा’ महाराष्ट्रामध्ये प्रथम लागू झाला. या माध्यमातून राज्यात १ लाख ४८ हजार घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून अडीच कोटी कामगारांना संघटित केले आहे., ४५ कोटी असंघटितांना एका छताखाली आणण्यासाठी त्यांचे कार्य सुरु आहे.. १२ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. मिलिंद आर्ट कॉलेजतर्फे “मिलिंद समता पुरस्कार” त्यांना मिळाला २०१५ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना “यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार” मिळाला.
या सारख्या असंख्य महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती करून उच्चपदस्थ झाल्या समाजाची, देशाची सेवा केली व करत आहेत सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी कार्य केलेल्या व कार्यरत असलेल्या या महिला कार्यकर्त्यांचा, परिचय आपण करून घेतला त्यांची प्रबळ इच्छाशक्ती अखंड साधना, झपाटून काम करण्याची जिद्द शिक्षणामुळे साध्य झाले. सावित्रीबाई व महात्मा फुले यांनी महिलांना प्रथमता शिक्षणाचा अधिकार पुण्याच्या भिडे वाड्या मधून दिला त्यामुळे आज महिलांना मान-सन्मान मिळाला आज देशात सर्व धर्माच्या स्त्रिया उच्च पदस्थ झालेल्या दिसतात. राजकारण, समाजकारण, उच्च प्रशासक अधिकारी, वकील , प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनीअर, अश्या सर्व क्षेत्रात आज महिला अग्रेसर आहेत. म्हणूनच महिलांनी सावित्रीबाईना आपले आदर्श मानले पाहिजे. सावित्रीबाई, महात्मा फुले, शाहूमहराज, बाबासाहेब या महापुरुषांनी आपल्यासाठी काय कार्य केले याची जाणीव ठेवली पाहिजे.
- प्रा. डॉ. रविकांत महिंदकर
- जिजामाता महाविद्यालय बुलढाणा
- ८०८७९४१०६२