सामाजिक वेदना अन गरिबीच्या झळा सोसत उत्तरोत्तर प्रगती साधणार्या नवनाथ रणखांबे यांचा *जीवन संघर्ष* हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. जे भोगले, सोसले, अनुभवले, दृष्टीस पडले, परिस्थितीशी दोन हात केले तेच कवी नवनाथ रणखांबे यांनी अगदी बिनधास्तपणे आणि तितक्याच ताकदीने/तळमळतेने काव्य स्वरूपात व्यक्त केले. मानवी/समाज जीवनाच्या विविध अंगाचे/घटनांचे पैलू त्यांनी अत्यंत खुबीने अन तितक्याच उत्स्फूर्तपणे जीवन संघर्षात रेखाटले आहे. जीवनाच्या विविध घटनाचे निरीक्षणे अतिशय सूत्रबद्ध पणे गुंफले आहे. सामान्य माणसाची जीवन व्यवस्था आणि संघर्षमय जीवनाचा वेध घेणारा “जीवन संघर्ष” काव्यसंग्रह हा एक प्रकारे सामाजिक वेदनेचा हुंकार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जीवन संघर्षात एकूण ४६ काव्यरचना आहे. प्रतिष्ठित ‘शारदा प्रकाशन’ ठाणे द्वारे हा काव्यसंग्रह प्रकाशित केलेला असून सतीश खोत यांनी काव्यसंग्रहाला समर्पक असे मुखपृष्ठ रेखाटले. यातील प्रत्येक काव्यरचना ही सामाजिक वेदनेचा ठाव घेते अन आपलसं करून घेते. म्हणूनच हा काव्यसंग्रह अवलोकन करताना जणू काही त्यात आपलाच संघर्ष व्यक्त केला असल्याची आपसुकच जाणीव होते. आपल्या जीवन प्रवासात आलेले अनुभव नवनाथ रणखांबे यांनी अत्यंत खुबीने रेखाटले. म्हणूनच हा काव्यसंग्रह मनाला भावते.कवी रणखांबे यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, प्रेम, विरह यासह विविध विषयाला आपल्या लेखणीतून स्पर्श तर केलाच शिवाय समाजातील शोषित, पीडित, वंचित बहुजन समाजाच्या वेदनाही तितक्याच ताकदीने मांडल्या आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व आणि विचारावर प्रचंड विश्वास असलेल्या कवी नवनाथानी गरिबी आणि सामजिक विषमतेचे चटके सहन करित प्राप्त केलेले यश इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
कवी नवनाथ रणखांबे यांचा व्यक्तिगत जीवन प्रवासच अत्यंत खडतर आणि संघर्षाने माखलेला आहे. सामाजिक विषमतेचे चटके आणि संघर्षाची धग त्यांच्या लेखणीत प्रकर्षाने जाणवते. अत्यंत बिकट परिस्थितीतून सुरू झालेल्या जीवन संघर्षाच्या प्रवासात त्यांच्या आईवडिलांनी पोटाला चिमटा बांधून उपसलेले कष्ट कवी विसरलेला नाही. हलाखीच्या परिस्थितीतही कुटुंब सांभाळतानाच मुलाच्या उंच भरारीसाठी आईने केलेल्या संघर्षाची धग त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेली आहे. आईचे महत्व आणि महानता अनोख्या शैलीत काव्यात शब्दबद्ध केली. कवी नवनाथ रणखांबे “माय” या कवितेत आई बद्दल लिहितात–
- तुझ्या पिलांच्या स्वप्नासाठी
- तुझी काया मोलमजुरीने
- दररोज झिजत होती
- गरिबीची श्रीमंत स्वप्ने—–कष्टातून फुलली होती.
लेकाच्या यशासाठी “माय” ने केलेले अहोरात्र कष्ट आणि दिलेले बळ व्यक्त करतानाच बापाची तळमळ ही तितक्याच प्रभावीपणे रणखांबे यांनी मांडली आहे. अठराविश्व दारिद्र्यतही पोराच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट तर उपसतातच पुढील भविष्यासाठी/ शिक्षणासाठी बाप कसा मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतो यांची अप्रतिम मांडणी कवी नवनाथ यांनी केली आहे. “बान शिकवलं” या रचनेत कवी म्हणतात
- कधी हिंमत हरू नको
- पुस्तक वाचणे सोडू नको
- पुस्तक माझे सर्वस्व आहे
- कधी एकटा समजू नको
बा ने शिक्षणाच महत्त्व जाणलं होतं. गावकुसाबाहेरील वस्तीमध्ये शिक्षणाचा गंध नसतानाही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिका ! संघटित व्हा !! आणि संघर्ष करा !!! हा संदेश बापाच्या नसानसात भिनलेला दिसतंय. म्हणूनच बा ने गरिबी भोगली, उपासमारी सहन केली पण मुलांना शिकविण्याचा ध्यास सोडला नाही. याचा उत्तम दाखला देताना कवी रणखांबे “बा ने शिकवलं” या कवितेत व्यक्त होतात की,
- बा माझा ओरडला
- लेका आजपासून तुझी
- शिक्षण हीच आई
- करियर हाच बा
शिक्षणाच महत्व आणि भविष्याचा वेध घेतांना बापाच्या तळमळतेचा संदेश इतरांसाठी आशादायी अन प्रेरणादायी नक्कीच आहे. माय तुला मी पाहिलं, बान शिकवलं, यशाच्या दर्दीत मी, भटकंती पोटाची अधोगती देशाची, जीवन संघर्ष या काव्य रचना काव्यसंग्रहाच्या शिर्षकासाठी समर्पक आणि जीवन संघर्ष प्रतिबिंबित करणाऱ्या आहेत.
आपल्या कृषिप्रधान देशात कृषी उत्पादन बऱ्याच प्रमाणात पावसावर अवलंबून आहे.पावसाची अनियमितता सर्वांनाच विशेषतः बळीराजाना अधिक प्रभावित करणारी आहे. वेळी-अवेळी च्या पावसाने दुष्काळ, विध्वंस, हानी नासधूसतेच्या झळा सर्वांनाच भोगाव्या लागतात. सोसाव्या लागतात. किंबहुना सहन केल्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून कवी छळणाऱ्या माजोऱ्या पावसाला आव्हान करून साहित्याच्या कोर्टात खेचण्याची भीती दाखवितो. “माजोऱ्या पाऊस” या काव्यरचनेत कवी विषद करतात की,
- जिथे गरज,तिथे नाहीस
- जिथे नको,तिथे आहेस
- तुझी हानी सहन होत नाय
- आता सोसल्याशिवाय पर्याय नाही
बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. त्यांना मानसिक व आर्थिक पाठबळ देण्यास कुणाचीही हरकत नाही. मात्र बळीराजाच्या नावावर शासकीय योजना/ कर्ज लाटणाऱ्या बोगस शेतकऱ्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदविला आहे. बोगस ऋणदाते कृषी कर्जाचा कसा गैरफायदा घेतात, उधळपट्टी करतात अन अखेर कर्जत फसतात ! अन शासनाच्या कर्जमाफीचे हक्कदार ठरतात हे कवीनी अतिशय समर्पक पणे “उधळण” मध्ये दाखवून दिले. तसेच शासनाच्या कृषी संबंधी योजनेचा आणि कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळतो. मात्र शेतात राब राब राबणाऱ्या अर्थात शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादन वाढीसाठी कष्ट उपसणाऱ्या शेतमजुराचा मात्र कोणीही वाली नाही याबाबतचे वास्तव चित्रण कवी रणखांबे यांनी “प्रश्न अन उत्तरी” या कवितेत समर्पकपणे रेखाटले. कवी म्हणतात
- पोशिंद्याच कर्जमाफ
- पृथ्वी चालक भूमिहीन शेतमजुराच काय ?
कवी नवनाथ रणखांबे स्वतः कामगार चळवळीशी निगडित आहे. ग्रामीण शेतमजूराच्या व्यथा त्यांनी जवळून पाहिल्यात. अनुभवल्यात त्याच वेदना त्यांनी काव्यात मांडल्यात. माजोऱ्या पाऊस, गावात आता कसं जगायचं, उधळण, पाऊस पेरणी, उपाशी पोट या रचनेतून शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांच्या वाट्याला येणाऱ्या वेदनेला अतिशय चपखलपणे वाट मोकळी करून दिली.
कवी नवनाथ रणखांबेची प्रत्येक काव्य रचना सामाजिक जाणिवानी ओतप्रोत भरलेली आहे. सामाजिक समतेच्या लढाईत त्यांच्यातील बंडखोर वृत्ती संघर्षांची जाणीव करून देते. समाज प्रगत झाला, पण जाती-धर्माच्या भिंती अद्यापही तितक्याच ताकतीने कायम असल्याची खंत ते काव्यातून व्यक्त करतात. फुले, शाहू, आंबेडकरांनी हा भेद मिटवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. लढे उभारलेत. समतेचा संदेश दिला. पण त्यांच्याच राज्यात दिवसेंदिवस वाढता अमानवी छळ समाजमन सुन्न करणारे आहे. मानवतेला काळीमा फासणारी प्रसंग कवी नवनाथाच्या शोधक दृष्टीतून सुटले नाही. दाहकता, मानवतेला डाग, जातीचे ग्रहण, शोध स्वतःचा, माणूसपण विसरला, इतिहास पुरुष या काव्य रचनेतून नवनाथांनी अमानवी वृत्तीचा समाचार घेतला. यातून रणखांबे यांची शोधक वृत्ती, समाजाप्रति असलेली तळमळ आणि बंडखोर वृत्ती उजागर होते. कवी मानवतेला डाग या काव्यात उल्लेख करतात की,
- अन्यायी घटना—–
- मानवतेवर डाग आहे
- अन्यायी मानवांनी
- मानवतेला जाळले आहे
भारतीय समाजरचना ही विषमतावादी समाजरचना आहे. पिढ्यानपिढ्या घट्ट पकड असलेल्या या विषमतावादी समाजरचनेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रखर संघर्ष करून छेद दिला. गावकुसाबाहेरील शोषित, पीडित, वंचित बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणले. माणसाला माणुसकीचे हक्क मिळवून दिले. सर्वांगीण प्रगतीच्या वाटा खुल्या केल्यात. सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग मोकळा केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीच बुद्धाचे तत्वज्ञान, पंचशील, प्रज्ञा, शील, करुणा अत्त दीप भव शिकवलं. बहिष्कृत समाजाची प्रगती ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीने साधली. या वंचित समाजावरच नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजावर डॉ बाबासाहेब आंबेडकराचे कधीही न फिटणारे ऋण आहेत. याची जाणीव कवी नवनाथ रणखांबे करून देतात. भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, यांच्या कर्तुत्वाचा आणि विचारांचा प्रचंड प्रभाव त्यांच्या लेखनात आहे. हाच ध्यास आणि आंबेडकरी चळवळीचा वसा कवींनी ‘मोडेल कणा’ या कवितेतून अखेरच्या श्वासापर्यंत मी चळवळीचा वसा सोडणार नाही असे सांगायला विसरत नाही. कविवर्य, डॉ.आंबेडकर या कवितेत म्हणतात की,
- बाबा या दुनियेचा स्वाभिमान
- जागृत केलात——
- पिढ्यानपिढ्याच शापित जिणं
- लाथाडलत———–
- शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा!!
- सन्मार्ग दिलात———
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश आणि बुद्धाच्या सन्मार्गाने बहुजन समाज विशेषतः आंबेडकरी समाजाने यशाची उत्तुंग शिखरे गाठलीत. अभूतपूर्व अशी प्रगती साधली. न भूतो न भविष्यती अशी क्रांती घडवून आणली. त्यातून आंबेडकरी समाज उदयास आला. डॉ.आंबेडकराच्या प्रेरणेतून संपूर्ण समाज एकवटला. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी हाच आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला उतरत राहणार ! परंतु कालांतराने चळवळीचे समान विचार आणि समान ध्येय असताना सुद्धा आंबेडकरी समाजाला फुटीरतेचे ग्रहण लागले. समाजातील संधीसाधू सोयीनुसार डॉ.आंबेडकराच्या नावाचे आणि दलित शब्दाचे भांडवल करू लागलेत. याचे शल्य कवी नवनाथ शब्दबद्ध करून थांबले नाही तर बहुजनाच्या उद्धारासाठी/स्वप्नपूर्तीसाठी कवी रणखांबे यांनी दलित शब्दाला जाळा या कवितेत दलित शब्दाची चीड आणि एकतेची हाक दिली आहे.
- काळा इतिहास
- पुन्हा होऊ
- द्यायचा नाही!
- एकतेची जूट
- आपली तुट
- होऊ द्यायची नाही!
कवी रणखांबेचा जीवनप्रवासच संघर्षाने माखलेला आहे. आपले अनुभव, व्यथा, सामाजिक व्यवस्थेबद्दल वाटणारी चीड, हरवलेली संवेदना आणि समाज घटकाचा संघर्ष काव्यसंग्रहाच्या माध्यमातून व्यक्त झालेला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सात दशकानंतरही शोषित, पीडित, वंचित समाज आणि भटक्या विमुक्त समाजाच्या पाठी आलेले दारिद्र्य आणि भटकंती त्यांच्या नजरेतून सुटली नाही. नंदीबैलवाले, डोंबाऱ्याचे जीवावर बेतणाऱ्या खेळाचा वास्तविक जीवनदर्शन काव्यसंग्रहात घडविते.
“भटकंती पोटाची अधोगती देशाची” या कवितेत कवी म्हणतो,
- अजून आहे बाजारबुणग्यांची…..
- सामाजिक भटकंती पोटाची,
- पिढ्यानपिढ्या वंचना त्यागाची…..
- पोटाच्या जीवन संघर्षाची,
पर्यावरणाचा समतोल राखणे हे संपूर्ण मानवजातीसमोर एक मोठे आव्हान आहे. संवर्धनाची चिंता आहे. कवी सुद्धा यास अपवाद नाही. आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणाच्या नावावर मोठ्याप्रमाणात वृक्षाची राजरोसपणे कत्तल केली जात आहे. पर्यावरणाची होणारी हानी मानवजातीवर दूरगामी परिणाम करणारी आहे. हे कवींनी हेरले. म्हणूनच त्यांनी संपूर्ण मानवजातीला पर्यावरणाचा समतोल राखणे, संगोपन आणि संवर्धन करण्याचा मौलिक विचार मांडला आहे. पाऊस पेरणी या कवितेत कवी रणखांबे लिहितात की,
- झाडे लावा रानोरानी
- त्याचे संगोपन घरोघरी
“ढळता तोल” या कवितेत कवी रणखांबे आपल्या भावना व्यक्त करतात की,
- ओझोन थोडा थोडा आहे मरत
- चिंता थोडी थोडी आहे वाढत
- नका लावू पर्यावरणाची वाट
- सजीवाच्या जगण्याला लागेल नाट
- पर्यावरणाचे संगोपन करा नीट !
कवी नवनाथ रणखांबे यांनी तारुण्यावस्थेतील प्रेमासारख्या जिव्हाळ्याच्या विषयालाही स्पर्श केला आहे. प्रियकर-प्रेयसीची होणारी घालमेल, जाती-धर्माच्या बंधनाने होणारी परफड तसेच सुख, दुःख, राग, लोभ, हसणं, रुसणं, रडणं, आशा-निराशा असे अनोखे भावविश्व समाजा समोर आणण्याचा प्रयत्न कवी रणखांबे यांनी जातीचे ग्रहण, प्रेमाला जातीपातीचे बंधने कशी आहेत, साद,हृदयाची राणी, तडा, काडीमोड होणारे दिल, अखेरचा श्वास, माझ्या प्रीत फुला, आयुष्याच्या पहिल्या प्रेमात, बापाचं नाव लावायचं टाळलस, मात, माझी पहाट, तू आणि मी, रात्र माझी होती या काव्य रचनेतून शब्दबद्ध केले आहे.
ग्रेटमॅन, चढ-उतार, थरकाप, प्रतिक्षेत मराठी सत्तेच्या, श्रेय, आलेला निधी, शेवट अजून बाकी आहे, जीवनाच्या लढ्यात, पाझर फुटला, मात, जीवन इत्यादी काव्यरचना समाजाचं वास्तव चित्र रेखाटणार्या आणि मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. एकंदरीत सर्वच दृष्टीने कौतुकास पात्र असलेला हा काव्यसंग्रह व्यापक दृष्टिकोन मांडणारा, जीवनाचा मार्ग सुकर करणारा, जीवन संघर्षाची जाणीव करून देणारा, अन्याय अत्याचाराविरोधात लढण्याचे बळ देणारा, शोषित, पीडित, वंचित बहुजन समाजाच्या वास्तव स्थितीचे दर्शन घडविणारा, समाजाच्या वास्तव्य स्थितीचा वेध घेणारा, परिवर्तनाची दिशा देणारा आणि नवी उमेद निर्माण करणारा हा काव्यसंग्रह वाचक, अभ्यासकांना निश्चितच आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील सकस साहित्य निर्मितीसाठी आणि साहित्यिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!!!!!!!!!!
- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
- अर्थशास्त्र विभाग प्रमुख
- श्री.संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय
- पिंपळखुटा ता.धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती
- ९९७०९९१४६४
- dr-nareshingale.blogspot.com