अमरावती : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांत प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, इच्छूकांनी अर्ज गृहप्रमुख, गृहपालांकडे सादर करण्याचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त माया केदार यांनी केले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळून सर्व सोयी विनामूल्य पुरविण्यात येतात. 2021-22 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता आठवीपासून पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय स्तरावरील प्रवेशासाठी एक हजार मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्र. 1, 2 व 3 (निंभोरा), संत गाडगेमहाराज मुलांचे शासकीय वसतिगृह (निंभोरा), मुलींसाठी अमरावतीत कॅम्प येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जेल रस्त्यावरील गुणवंत मुलींचे शासकीय वसतिगृह, विभागीय स्तरावरील 250 मुलींचे युनिट क्र. 4 वसतिगृह, तसेच तालुका स्तरावर मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह येथील प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
इच्छूकांनी जिल्हा व तालुका स्तरावरील वसतिगृहातून प्रवेशाचा अर्ज मिळवून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्याकडे सादर करण्यात यावा, असे आवाहन श्रीमती केदार यांनी केले आहे.
—–