- सभ्यतेचा गौरव:हिफजूर रहमान -अंतर्बाह्य माणुसकिचे विद्यापीठ
डॉ.अक्रम पठाण यांनी लिहलेला “सभ्यतेचा गौरव: हिफजूर रहमान” हा ग्रंथ नुकताच वाचण्यात आला.अत्यंत मूलगामी क्रांतिविचाराचा सत्यनिष्ठा आविष्कार प्रस्तुत केला आहे.संविधाननिष्ठ माणसाच्या कार्यकर्तृत्वाचा मूल्यजागर रेखांखित केला आहे.यासाठी डॉ.अक्रम पठाण याचे मन:पूर्वक अभिनंदन..!
हिफजूर रहमान हे महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परिक्षेत पास होणारे पहिले मुस्लिम व्यक्ती होते.त्यांनी मुख्याध्यापक,शिक्षणाधिकारी,शिक्षण उपसंचालक, शिक्षण सचिव या पदावर काम केले होते.शिक्षण क्षेत्रात काम करतांना त्यांना अनेक संघर्ष करावा लागला पण त्यांनी हार मानली नाही तर भारतीय संविधानाने दिलेलल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी त्यावर मात केली . म्हणून ते लोकशाहीचे सच्चे उपासक आहेत.शिक्षणासारख्या पवित्र कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले.विद्यार्थी आणि अध्यापक यांच्या समस्या जातीने सोडविल्या .माझा धर्म कोणताही असेल पण मी माझे भारतीय सोडणार नाही . म्हणून प्राध्यापक भावे यांनी रूम दिली नाही तरी त्यांनी वाईट मानले नाही.दोन दिवसानंतर प्राध्यापक भावे मध्ये मतपरिवर्तन झाले व त्यांनी घर भाड्याने दिले .त्याचे संबंध मानवीय पातळीवर आजही शाबूत आहेत.
जग आज भ्रष्टाचारावर चालत असतांना त्यांनी इस्लामाच्या तत्वज्ञाने व संविधानवादी विचारांने काम केले .हा आत्मविश्वास त्यांनी आपल्या बांधवाना दिला.प्रशासनात काम करतांना धर्म व जात यांना थारा न देता मानवीय हिताचे काम केले.प्रत्यक्ष कृतीतून स्वतःचे जीवन फूलवले.आपल्या सत्यनिष्ठा वागणूकिने माणुसकिचा जिंवत झरा सदोदीत प्रवाहित केला.
- सभ्यतेचा गौरव
:
हिफजूर रहमान या ग्रंथात एकूण १४ प्रकरणे असून यातून हिफजूर रहमान यांच्या कार्याचा गौरव केला आहे.त्यांचे राष्ट्रीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक कार्याची अप्रतिम नोंद लेखकाने घेतली आहे.”हिफजूर रहमान यांची कार्यपध्दती , नैतिकता आणि जबाबदारी या सर्व गोष्टींची गुफंण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकांने या ग्रंथात केला आहे.”मानवी धाग्याची अप्रतिम विण रोवण्याची कसब लेखकांने लिलिया पेलली आहे.आई वडिलाचे योग्य संस्कार लाभल्यामुळे आलेल्या आव्हानाला हिफजूर रहमानने मात केली.
या ग्रंथाची प्रस्तावना डॉ.प्रकाश राठोड यांनी लिहली असून अतिशय वास्तवादी जीवनाचे तर्कसंगत बाबी अधोरेखित केल्या आहेत .ते प्रस्तावनेत म्हणतात ,”हिफजूर रहमान यांचे व्यक्तिमत्व हे एक सांस्कृतिक मूल्यार्थ आहे.त्यांनी आपल्या प्रशासकिय सेवेत विविध प्रसंगांना सामोरे जाऊन प्रामाणिकपणाची मशाल कशी कायम ठेवता येते हे सिध्द केले आहे.भ्रष्ट्रचाराने आपला कणा वाकू द्यायचा नाही हे त्यांनी सिध्द केले आहे.”हा अभिप्राय योग्य आहे.तर डॉ.यशवंत मनोहर आपल्या प्रतिक्रीयेेत म्हणतात की,”शिक्षणाधिकारी,प्रशासक,
रंजगांजल्याचा निःस्पृह आधारवड आणि विज्ञानशीलता या त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या फांद्या पूर्णता सुशीलच आहेत . त्यांनी आपला व परका या संकल्पनाच्या व्याख्याच बदलवून टाकल्या . सर्वच जिंवत मैफिल झालेला एक सुसभ्य भारतीय माणूस असेच त्यांचे सुंदर वर्णन करायला हवे .”यावरून हिफजूर रहमान यांच्या व्यक्तीरेखांचे कंगोरे समजून येतात.
“सामाजिक बांधिलकी जपणारा अधिकार” या प्रकरणात लेखक लिहितात की,सामाजिक बांधिलकी असलेला माणूस विषमतेच्या तुरूंगात बंदिस्त असलेल्या माणसाला आकाशात भरारी घेण्यासाठी पंख आणि आकाश उपलब्ध करण्यासाठी धडपडतो .त्याचे हे धडपणे सर्वांना आकाशात मुक्तपणे विहार करता यावे यासाठी असते.”हे मुक्त विहार हिफजूर रहमान यांनी तयार केले आहे.त्यांनी शिक्षणक्षेत्रात व परीक्षापध्दतीत मोठे बदल घडवून आणले आहेत.श्री .अग्नीहोत्री व उर्दू माध्यमच्या शिक्षणाची तक्रार हा प्रसंग मोठ्या खूबीने हाताळला.हा प्रसंग असत्याकडून सत्याकडे नेणारा असून धर्म व जातीपेक्षा देशहिताचा आहे.महात्मे व बाहेकर यांच्या निकालाचा तिढा अत्यंत मूलगामी क्रांतिविचारातून सोडवला ही मोठी गोष्ट समुपदेशनाने पार पाडली.
“भ्रष्टाचाराच्या अंधःकारात तेजाळणारी उजेडज्योती” या प्रकरणात हिफजूर रहमान यांना अनेक प्रलोभने देण्यात आले पण ते आपल्या कर्तव्यापासून हटले नाही.यवतमाळ जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी असतांना आपल्या कर्मचाऱ्याच्या पुढे कुराणाची शपथ घेऊन मी भ्रष्टाचार करणार नाही हा विश्वास दिला.माणसाने ठरवला तर तो आपल्या कृतीने व्यवस्थेला बदलू शकतो.ओबाने म्हटले आहे की,”change will not come if we wait for”हे वाक्य सरांनी सत्य करून दाखविले.
“यशस्वी पुरूषाची पूर्णांगिनी”या प्रकरणात सरांच्या जीवनातील सहचारणीचे महत्व विशद केले आहे.स्नेहभावजाणिवांचा भावबंध मोठ्या तौलनिक पध्दतीने मांडला आहे.मुस्लिम समाजात मुलींना पाहायला मोठे मंडळी जातात पण सरांनी स्वःताच मुलीची निवड केली तेही चर्चा करून ही घटनाच मुस्लिम समाजात क्रांतीकारी अशी आहे.यावरू सरांचा निरर्भिडपणा पाहायला मिळतो.स्त्री – पुरूष समानतेचा पुरस्कार स्वतःच्या घरापासून केला ही गोष्ट सर्व कर्मचाऱ्यांनी शिकावी.म्हणून पत्नी ही अर्धांगी नसून ती पूर्णांगिनी आहे हे सत्य आपण आज स्विकारले पाहिजे.
“माणूसकीचा महोत्सव साजरा करणारा अधिकारी”या प्रकरणात सरांच्या ईमानदार वर्तणुकीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे.हिंदू -मुस्लिमांमध्ये निर्भयतेचे , सुंदरतेचे आणि समृध्दतेचे नाते संबंध प्रस्थापित केले आहे.प्रशासकिय कामात कधीही हयगय केली नाही.कोणताही जातीभेद धर्म भेद मानला नाही .रमजान सणाच्या दिवसात श्रीराम धोंगडे नावाचा शिपाई यांच्या स्नेहमिलनाचे भावस्पर्शी चित्रण मनाला गदगदून सोडते.मानवीय नात्याची विण किती घट्ट असते यांचा अच्युत व आदर्श भारतीय नमुना वाचकाला अंतर्मुख करते.
धर्म जातीच्या भिंती उद्धवस्त करून माणुसकिचा महोत्सव साजरा करते.
“आदिवासी विद्यार्थांसाठी ओथंबून आलेला ढग ” आणि “राज्यस्तरीय विज्ञानप्रदर्शनाला आंतरराष्ट्रीय दर्जा देणारा संचालक” हे दोन्ही प्रकरणे शिक्षणातील नव प्रयोगाचा उत्तम प्रकल्प आहे.मागास समाजाला इतर समाजाबरोबर घेऊन येणे ही गोष्ट भारतीय संविधानाचे प्रीअँम्बल सफल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.आदिवासी समाजातील विद्यार्थांला नवे ऊर्जाबल देणारे कार्य आहे.या उपक्रमाने ज्ञानाच्या नव्या कक्षा वाढल्या हे निर्विवाद सत्य आहे.
“इस्लामाच्या महामूल्यांचा निष्ठावंत प्रचारक”भारतीय संविधानाने सर्व भारतीय लोकांना आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे अधिकार दिले आहेत.ते अधिकार कोणालाही नाकारता येणार नाही.कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्याला संविधानाची चौकट मोडण्याचा अधिकार दिला नाही.पण काही सरकारे स्वतःच्या राजकिय फायद्यासाठी धर्म जातीत विष कालवतात आज विष कालवणाऱ्या संघटनाचे मोठे पीक बहरून आले आहे.मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अत्यंत खालच्या दर्जाचा आहे.हे अत्यंत अविवेकी आहे.सामाजिक सौहार्द खराब करणारे आहे.इस्लामचा खरा अर्थ आत्मसमर्पण व आज्ञापालन असा आहे.पण कट्टरपणाच्या कपोलकल्पित न्युनगंडाने पछाडलेल्या कोणताही धर्मांध विकृत मेंदू सत्य स्विकारायला तयार नाही.सरांने या कंपूत सामील न होता संविधानात्मक संस्कृतीचे ध्येय स्विकारले म्हणून त्याचे कार्य प्रेरणादायी आहे.मुस्लिमातील कट्टरता शाहीनबाग आंदोलनाने समाप्त केली असून मुस्लिम महिलांनी जी क्रांतीकारी ऊर्जा जगाला दिली त्याचा आदर्श भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहे .हे जगाला ठणकाऊन सांगितले आहे.भारत हा आमचा देश आहे . आम्ही सारे भारतीय आहोत.संविधान हाच आमचा दिशादर्शक दस्ताएेवज आहे.हे या आंदोलनाने अधोरेखित केले आहे.धर्मनिष्ठ विषमतामय मुळांना उखळून फेकायला मुस्लिम महिला तयार झाली आहे हे भविष्यासाठी नक्कीच चांगली घटना ठरेल.
विद्यार्थांना स्पर्धा परीक्षेला तयार करणे ,विज्ञान -तंत्रज्ञानाची मशाल प्रज्वलीत करण्याचे काम सातत्याने ते करीत आहेत.अंजूमन-हामी-ए-इस्लाम या संस्थेसाठी १ रूपयावर सल्लागार म्हणून काम करणे ही अत्यंत क्रांतीदर्शी कार्य आहे.त्याच्या मनातील शिक्षक अजूनही तरूण आहे याची या त्यांच्या व्यक्तीमत्वातून दिसून येते.
सभ्यतेचा गौरव : हिफजूर रहमान
हा ग्रंथ महाऊर्जावान प्रेणादायी ग्रंथ असून , माणुसकिचा व प्रशासकिय धाग्याची उत्तम उकल करणारा सौंदर्यवादी विचारगर्भ आहे.लेखकांनी अतिशय चोखदळ शब्दांत त्याचे पैलू पाडले आहेत.मराठी साहित्याच्या प्रांतात हा ग्रंथ नव्या मूल्यमंथनाचा कोहिनुर ठरेल हा आशावाद नक्कीच हा ग्रंथ देतो.आंबेडकरवादी क्रांतीजाणिवाचा मुल्यवर्धन आविष्कार या ग्रंथात पाहायला मिळतो.या ग्रंथातून धर्म श्रेष्ठ न ठरता निखळ माणूस श्रेष्ठ ठरतो हा विश्वास बुलंद झाला आहे.”सभ्यतेचा गौरव : हिफजूर रहमान”हा ग्रंथ अंतर्बाह्य माणुसकीचे विद्यापीठ असाच आहे.या विद्यापीठातील विद्यार्थी हा स्वातंत्र्य,समता,बंधुभाव व न्याय यासाठी लढणारा क्रांतीयोध्दा ठरेल यात शंका नाही.लेेखक अक्रम पठाण यांना नव्या सृजनत्व ग्रंथाला सहृदय मंगलकामना चिंतितो.
- -संदीप गायकवाड
- ९६३७३५७४००
- प्रा. डॉ. रविकांत महिंदकर
- जिजामाता महाविद्यालय बुलढाणा