नवी दिल्ली : गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक निर्णयामुळे भारतातील न्यायव्यवस्था आणि लोकशाही मजबूत झाली. त्यामुळे न्यायव्यवस्थेने सत्याच्या बाजूने उभे राहण्याची शक्ती दिल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. ते गुजरात उच्च न्यायालयाच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते. गुजरात उच्च न्यायालयाच्या स्थापनेला ६0 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाग घेतला. पंतप्रधानांनी या निमित्ताने न्यायसंस्थेचे आभार मानले आणि अनेक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या काही वर्षात आपल्या विद्वत्तेने, बौद्धिकतेने आणि आपल्या निर्णयाने गुजरात उच्च न्यायालयाने देशभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सत्य आणि न्यायासाठी ज्या निष्ठेने काम केलंय, आपल्या घटनात्मक कर्तव्यांप्रती जी तत्परता दाखवली. त्यामुळे देशातील न्यायव्यवस्था आणि लोकशाही दोन्ही मजबूत झाल्याचे पहायला मिळते. तसेच संसद, प्रशासन आणि न्यायपालिकेला वेगवेगळ्या जबाबदार्या देण्यात आल्या आहेत. या जबाबदार्या म्हणजे आपल्या राज्यघटनेसाठी प्राणवायू आहेत. आपल्या न्यायपालिकेने राज्यघटनेच्या या प्राणवायूची जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडली आहे. न्यायपालिकेवर असलेल्या विश्वासामुळे सामान्य नागरिकांना एक प्रकारचे बळ मिळाले आहे. सत्याच्या बाजूने उभे राहण्याची शक्ती दिली. प्राचीन धर्मग्रंथात सांगितले आहे की न्याय हाच सुराज्याचा पाया आहे. भारतीय न्यायववस्थेच्या सद्य परिस्थितीवर बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की आतापर्यंत १८ हजारांपेक्षा जास्त न्यायालये संगणकाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालय हे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जगातील सर्वात जास्त प्रकरणावर सुनावणी करणारे न्यायालय बनले आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून भारतीय न्यायव्यवस्था ही आधुनिक बनत चालल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
Related Stories
December 2, 2023