अमरावती : कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील संस्थात्मक विलगीकरण व आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. त्यावेळी जिल्ह्याच्या स्थितीबाबत श्री. नवाल यांनी माहिती सादर केली. या कॉन्फरन्सनंतर जिल्हा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह महापालिका, आरोग्य यंत्रणा, जि. प. यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, गृह विलगीकरणातील व्यक्तींकडून दक्षतेचे नियम पाळले न जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे गृह विलगीकरणाऐवजी आता संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात यावा. त्यासाठी आवश्यकतेनुसार सेंटर्स सुरू करण्यात येतील. व्हीएमव्ही महाविद्यालय येथील क्वारंटाईन सेंटर तत्काळ सुरू करण्यात यावे. त्याचप्रमाणे, वलगाव व नजिकच्या ठिकाणी कार्यरत आरोग्य कर्मचा-यांसाठी नवसारी येथे निवासव्यवस्था करावी.
चाचण्या वाढवा
ज्या क्षेत्रात रूग्णांचे आधिक्य आढळून येते, तिथे चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. मात्र, ॲन्टिजेन चाचण्यांऐवजी आरटीपीसीआर चाचणीलाच प्राधान्य द्यावे. खासगी लॅबमधून ज्या ॲन्टिजेन टेस्ट होत आहेत, त्या बंद कराव्यात. अमरावती शहर व अचलपूर शहरात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने येथे कडक नियम पाळले जावेत यासाठी यंत्रणांनी कार्यवाही करावी. महापालिका, नगरपालिका यांनी लग्नसमारंभात गर्दी आढळल्यास हॉलचालकावर कठोर कारवाई करावी. बँक्वेट हॉलमध्ये मास्कचे पालनही होत नसेल तर हॉलचालकावर कारवाई करावी. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही नागरिकांकडूनही बेपर्वाई होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सगळीकडे कारवायांचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. अनेकदा डॉक्टरच रुग्णांना ‘साधा सर्दी खोकला आहे, टेस्टची गरज नाही’ असा सल्ला देतात. हे अत्यंत चुकीचे आहे. ते रोखले पाहिजे. कुठलीही लक्षणे असलेल्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी होणे आवश्यक आहे. अनेकदा रुग्णांचा सीटी स्कॅन केला जातो. त्यामुळे कोविडची लक्षणे आढळताच तत्काळ आरोग्य विभागाला कळविण्याची सूचना सीटी स्कॅन सेंटर्सलाही द्यावी. हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये गर्दी होऊ नये व सोशल डिस्टन्स, तसेच स्वच्छतेचे नियम पाळले जावेत म्हणून रेस्टॉरंटचालकांना स्वतंत्रपणे सूचना देण्यात याव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.
Related Stories
October 14, 2024