मूर्तिजापूर : तालुक्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शेलू वेताळ या गावासह ग्रामीण भागात वीजपुरवठा नेहमी खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. या समस्येकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.!
ग्रामीण भागात विजेच्या लपंडावामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून रात्रंदिवस उशीरापर्यंत बहुतांश भागात वीज नसल्याने लोकांनी संताप व्यक्त करीत आहेत.
गेल्या एक महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. कोरोना महामारीमुळे नागरिक आधीच हैराण झाले असून त्यातच विज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामवासीयांना अजून एक समस्येला सामोरे जावे लागत आहे.
एकीकडे कोरोना महामारीने थैमान घातले असून शहरासह ग्रामीण भागात पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. यात सर्व सामान्य नागरिकांना न पेलावणारा हॉस्पिटलचा खर्च पाहता अनेक जण घरीच क्वारंटाईन आहेत त्यातच विजेचा लपंडाव सुरू असुन ग्रामवासीयांना अजून एका समस्येस सामोरे जावे लागत आहे. सर्वत्र लॉकडाऊन लागु करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले असतांनाच विजेचा दिवसरात्र लपंडाव सुरू असल्याने ग्रामवासीय संतप्त झाले आहेत. गेल्या महिनाभरापुर्वी विज वितरण कंपनीने आपले मार्च एडींगचे लक्ष साधण्यासाठी गोरं – गरीब, हातमजुर यांचेकडुन विज कनेक्शन कट करण्याच्या धमक्या देवून विज बिल भरुन घेतले. अनेकांकडे विज बिल भरण्याचे पैसे नसल्यामुळे उसनवारीने, तर काहींनी व्याजाने पैसे घेऊन विज बिल भरली. मात्र मार्च एडींगचे टार्गेट पुर्ण होताच विज वितरण कंपनीने आपले काम दाखविण्यास सुरुवात केली असुन त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ग्रामीण भागात दिवसभर विजेचा लपंडाव सुरु असुन काही वेळ लाईट आली गेली ह्या लपंडावामुळे उकाडा सहन करावा लागत आहे. किमान लाॅकडाऊन, मे महिन्यातील कडाक्याचे उन्हात तरी विज पुरवठा सुरळीत करावा अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.