- (प्रासंगीक)
- शिवाजी महाराज की जय
दि. एकोणवीस. शिवाजी महाराजांची जयंती. ज्या राज्यामध्ये निजामशाही आणि आदिवशहाचा वचक होता. ज्या राज्यामध्ये देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार आपापसात भांडत होते. तसेच ज्या राज्यामध्ये मराठ्यांची अस्मिताच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून जात होता. त्या राज्याला आदिलशाही आणि निजामशाही मुक्त करणारा माणूस जर कोणी असेल, तर त्यात शिवाजी महाराजांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागतं. अगदी बालपणापासूनच शिवरायांचा स्वभाव हा दांडगा असल्यामुळं शिवरायाच्या वाटेला कोणी जात नसत.शिवरायांबाबत सांगायचं झाल्यास शिवरायांना त्यांची आई जीजाबाईनं घडवलं. ज्यावेळी शिवरायांचा जन्म झाला, त्यावेळी त्यांचे वडील शहाजीराजे हे लढाईत गुंतले होते. त्यातच शहाजीराजांनी शिवरायांचा जन्म चांगल्या परिस्थीतीत व्हावा म्हणून लढाईवर जाण्याआधी जीजामातेला शिवनेरी किल्ल्यावर अगदी सुरक्षीत ठेवलं. तिथंच पुढं शिवरायांचा जन्म झाला. ती तारीख म्हणजे १९ फेब्रुवारी १६३०. या तारखेबाबतही लोकांमध्ये संभ्रम आहे. कोणी तीन मार्च तर कोणी एक मे ही शिवरायांची जन्मदिनांक सांगतात.
लहान असतांना शिवराय हे आईच्या सानिध्यात होते. शिवनेरीवर असलेल्या शिवाई देवीच्या नावावरुन शिवाजीचं शिवाजी नाव ठेवल्यानंतर त्याचं खरं शिक्षण हे आईनं केलं एवढंच नाही तर त्या शिवरायाचा पाहिजे त्या प्रमाणात लाड न करता त्याला स्वराज्यासाठी वाहून टाकलं. त्या शिवरायांना लहानपणापासूनच राम, क्रिष्ण व अभिमन्यूच्या कथा सांगून शुरवीर कसे असतात ते अगदी शिवरायांच्या रोमारोमात भरलं. त्यातच त्यांना आध्यात्मीक धडे सुद्धा दिले. संत ज्ञानेश्वरापासून तर संत तुकारामापर्यंतच्या गोष्टी त्यांना शिकवल्या. एवढंच नाही तर शिवरायांना युद्धनीती आणि राजनीती शिकविण्यासाठी वेगवेगळ्या शिक्षकांची शिवनेरीवर नियुक्ती केली. त्यातच ते राज्यकारभार करणे, घोडा भरधाव फेकणे, चोरवाटा शोधणे, तलवार चालवणे, भाला फेकणे इत्यादी गोष्टी शिवराय शिकले.अगदी लहानग्या वयात शिवराय मातीचे किल्ले बनवणे, हत्ती बनवणे हे खेळ खेळायचे. त्यातच लहान वयात त्यांनी त्या सह्याद्रीच्या द-याखो-यातील लहान लहान आदिवासी मुलांना आपले मित्र बनवले. ज्या मित्रांनी पुढे जावून शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहूती दिली. पण शिवरायांवर थोडीशी आचही येवू दिली नाही. या मावळ्यांच्या मुलांसोबत शिवराय काय करायचे? तर चोरवाटा शोधायचे, त्या मुलांना तलवारबाजी शिकवली, एवढंच नाही तर याच शिवरायांनी रानावनात जावून मावळ्यांच्या मुलासोबत वावरतांना आपलं जेवन त्यांना दिलं व त्यांची कांदाभाकर त्यांनी खाल्ली. त्यामुळं साहजिकच शिवरायांबाबत आत्मीयता मावळ्यांच्या मुलांमध्ये निर्माण झाल ी. ही आत्मीयता निर्माण करण्यासाठी शिवराय त्या मावळ्यांच्या मुलांच्या घरी जात. त्यांच्या आईवडीलांशी संवाद साधत. एवढंच नाही तर त्यांच्या मायबापाशी संवाद करीत. याच संवादातून पुढे स्वराज्याचं महत्व त्या मावळ्यांच्या मायबापांनी आपल्या मुलांनाही समजावून दिलं होतं. हेच स्वराज्याचं महत्व शिवराय स्वतःही मावळ्याच्या मुलांना समजावून देत.
अगदी अल्प वयातच मावळ्यांना घेवून शिवरायांनी मावळ्याच्या मुलांसमोर रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यातच ज्या वयात मुलांचं खेळण्याबागडण्याचं वय असतं. त्या अगदी अल्प वयात म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. त्यातच जे काम आपण आपल्या उभ्या हयातीत करु शकत नाही. त्याच अल्प वयात त्यांनी सर्व गोष्टीचा विचार करुन तोरणा किल्ल्याची डागडुजी केली. त्याला नवं नाव दिलं प्रचंडगड. त्यातच या तोरण्याचं बांधकाम करतांना ज्या चार सोन्याच्या घागरी शिवरायांना सापडल्या, त्या सोन्याचा वापर शिवरायांनी पुढे दुसरे किल्ले बांधण्यासाठी केला. पुढे एक एक करीत करीत शिवरायांनी जे किल्ले जिंकण्याचा सपाटा लावला. त्याला थांबवणं कठीण होतं.
आदिलशहानं शहाजीराजांना समजावून पाहिलं. परंतू काहीच उपयोग झाला नाही. हे पाहून की काय, आदिलशहा चिडला. त्यांनी त्यावर उपाय काढण्यासाठी विजापुरात बैठक बोलावली. बडी साहेबा. आदिलशाही महाराणी ही अध्यक्षस्थानी. पैजेच तबकात विडा. त्यांनी उचलावा. जो शिवाजीचा अंत करेल. मग घोषणा झाली. घोषणेनुसार विजापूर दरबारातील बडा तुफान ताकदीचा व धिप्पाड देहाचा सरदार अफदलखान उभा झाला. त्यानं तबकातील विडा उचलला व आश्चर्य करीत म्हटलं.
“कोण शिवाजी? कुठला शिवाजी? मी आत्ताच त्याला जीवंत वा मारलेला पकडून आणतो.” अफजलखान तुफान ताकदीचा व धिप्पाड देहाचा होता. त्याला आपल्या ताकदीवर गर्व होता. त्याला वाटत होतं की आपण शिवरायांचा बिमोड करु शकतो. तसं पाहता त्याला शिवरायांच्या बाबतीत कोणतीच माहिती नव्हती. विडा उतलताच तो प्रतापगड पायथ्याशी आला. शिवाजी युद्धासाठी सज्ज व्हावा वा शरण यावा. म्हणून त्यानं आजूबाजूच्या गावांना व विशेषतः देवळांना त्रास देवू लागला. जबरदस्तीनं तो या तमाम महाराष्ट्रातील स्रीयांच्या इज्जती लुटू लागला. एवढेच नाही तर पशूधनांनाही ठेच पोहोचवू लागला. त्याच्या अशा प्रकारच्या उपद्रव्यानं शिवरायांना वाईट वाटत होतं. शेवटी त्यांनी विचार केला की आपण अफजलखानाला ठार करायचे.अफजलखानाला समोरासमोर मारता येत नाही. म्हणून शिवरायांनी त्याच्याशी युक्तीनं लढा देण्याचा विचार केला. त्यांनी खान बेसावध राहावा म्हणून आपण त्यांना फारच घाबरतो अशीही सुचना पाठवली. त्यातच खान बेसावध तर झालाच. शिवाय तो निर्भीडही झाला. शेवटी तो शिवरायांच्या म्हणण्यानुसार वागायला तयार झाला.
शिवरायांनी खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला बोलावले. भेट ठरली.शिवरायांनी जय्यत तयारी केली. कारण त्यांना खानाचा डाव माहित होता. भेटीदरम्यान शिवरायांनी खानाच्या म्हणण्यानुसार आलिंगण दिलं. त्यातच शिवराय सावधच होते. शेवटी खानानं कपटी डाव साधला. शिवरायांवर कट्यारीचा वार केला. त्यातच शिवरायांनी तो वार पुरता हुकवला व अस्तनीतून बिचवा काढून खानावर वार करुन वाघनख्यांनी खानाचं पोट फाडून टाकलं. झालं, क्षणातच धिप्पाड देहाचा खान मरण पावला. खान मरण पावताच शिवरायांचा दरारा आजूबाजूला फारच वाढला. एकेक क्लुप्त्या करीत शिवराय आदिलशाहाला पराभूत करीत होते. निजामशाही तर पावलंच बाहेर काढत नव्हती. शिवरायांसमोर शेवटी या आदिलशाहानं शरणागती पत्करली. त्यानंतर शिवरायांनी आपला मोर्चा मोगलांकडे वळवला. त्यावेळी मोगल सम्राट औरंगजेब ह्यानेही डाव साधला. त्यानं शिवरायांच्या पराक्रमी चर्चा ऐकल्या होत्या. त्यानं शिवरायांना भेटीला आग्र्याला बोलावले. ज्यावेळी शिवराय आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले. तेव्हा शिवराय महाराष्ट्राचे राजे असूनही त्यांचा आग्र्याला अपमान केला गेला. त्यांना दुस-या क्रमांकाच्या रांगेत उभे केले. शिवाय त्यांना नजरकैदेतही टाकले. नजरकैदेत पडल्यानंतर शिवरायांनी आजारपणाचं सोंग केलं. त्यातच एक दिवस ते व त्यांचा मुलगा संभाजी मिठाईच्या पेटा-यात बसून ते प्रसारही झाले. शिवरायांनी आपल्या जीवनात खुप सा-या गोष्टी केल्या. मुसलमान झालेल्या नेतोजी पालकरांना हिंदू धर्मात आणले. तानाजीच्या मृत्यूनंतर त्याच्या उमरठे गावी जावून रायबाचं थाटामाटात विवाह केला. त्यांनी शायीस्तेखानाची बोटं तोडली. एवढंच नाही तर पुरंदरच्या लढाईत मुरारबाजी मेल्ल्यानंतर होत असलेला स्वकीय माणसाचा संहार पाहून पुरंदरचा तह केला. त्यातच तेवीस किल्ले आणि चार लक्ष होनाचा मुलूख मोगलांना दिला. पुढे राज्याची गरज लक्षात घेता कोंढाण्यासारखा बळकट किल्ला हातात घेतला. त्यामध्ये तानाजीसारखा बालपणीचा मित्र गमवावा लागला.
शिवाजीला वाचविण्यासाठी ज्या मराठे सरदारांनी प्राणांची बाजी लावली. त्यात बाजीप्रभू, तानाजी, जीवा महाला, मदारी मेहतर, शिवा काशीद यांचं बलिदानही विसरता येत नाही. त्यांनी जर बलिदान दिलं नसतं, तर शिवाजी महाराजंही दिसले नसते. त्या असंख्य शिवाजींच्या मावळ्यांमुळे हे स्वराज्य उभं राहिलं. त्याला पुढं नाव दिलं हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य हे मावळ्यांच्या बलिदानातून साकार झालेलं स्वराज्य. प्रत्येक आई आपल्या मुलाला कोणतीही क्षति पोहोचू नये यासाठी प्रयत्न करते. स्वतः संकटं झेलते. खपते, मरते. पण जीजाबाईनं त्याचा विचारच केला नाही. तिला माहित होतं की तोरणा गडाच्या युद्धात शिवराय मरुही शकते. तरी प्रेरणा दिली की हे शिवा, तू हा तोरणा जिंकू शकतोस आणि काय आश्चर्य तोरणा जिंकला. पुढे अफजलखान भेटीलाही जातांना शिवराय आई जीजामातेला म्हणाले की वाचलोच तर परत येईल. नाही वाचलोच तर मासाहेब आपण संभाजीला गादीवर बसवायचं व राज्य सांभाळायचं. त्यावेळी त्याच्या जन्मदात्या आईला काय वाटलं असेल. तरीही तिनं आज्ञा दिली आणि सांगीतलं की तू जर माझा मुलगा असशील तर त्या अफजलखानाचं मुंडकंच कापून आणशील. पुढं आग्र्यालाही जातांना तेच घडलं.
शिवरायांनी राज्यभिषेक केला खरा. पण हे राज्य निर्माण करण्याचं स्वप्न जीजाबाईनं दाखवलं होतं. नव्हे तर ते राज्य तमाम मावळ्यांच्या बलिदानातून साकार झालं आहे. आज मात्र याच शिवरायांच्या नावावर केवळ राजकारण सुरु आहे. ऐरी, गैरी सारीच मंडळी निव्वळ शिवाजी महाराज की जय तर म्हणतात. पण तसे वागण्याचा प्रयत्न करतात का? निव्वळ दाढी वाढवून वा वेषभुषा करुन शिवाजी बनत नाही, तर शिवाजी बनायला ती शिवरायांची दृष्टी हवी. ती स्वप्न दाखवणारी जीजामाताही हवी आणि ते प्राणांची बाजी लावणारे मावळेही हवे. बापू बापू म्हणत अगदी तरणेताठ होईपर्यंत जोपासणारी आमची आई नको आणि महत्वाची एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती ही की जे शिवाजी शेकडो महिलांची अब्रू वाचवीत होते. आपण आपल्या वस्तीतील एका जरी महिलांची अब्रू वाचवली तरीही शिवराय बनल्याचं सार्थक होईल. तसेच ज्याप्रमाणे शिवराय राज्यातील प्रत्येकाला मदत करीत होते. आपण एका व्यक्तीला जरी मदत केली तरी आपल्यातला शिवाजी प्रकर्षानं दिसेल यात शंका नाही. शिवरायांनी तर एक आदर्श निर्माण करुन दिला आपल्यासमोर. आपणही त्याच आदर्शाचा आदर्श बाळगून केवळ युद्धानं नाही तर शांतीनं या काळातील आदिलशाही, निजामशाही व मोगलशाही वृत्तीच्या माणसाच्या मनातील वाईट विचारांचा बिमोड करावा. जेणेकरुन शिवाजीच्या आत्म्यालाही शांती वाटेल व ख-या अर्थानं हिंदवी स्वराज्य नाही तर बलाढ्य अशा स्वरुपाचं स्वराज्य आपल्याला दिसेल यात शंका नाही.
- अंकुश शिंगाडे
- नागपूर
- ९९२३७४७४९२