‘जाणता राजा’ म्हणजे मनाला मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम…………
या कार्यक्रमाची भव्यता त्या जाणत्या राजाला साजेशी आहे. राज्याभिषेकाची ती आनंद पर्वणी सुरू झाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची गगनभेदी ललकारी अंगावर रोमांच उभे राहिले. डोळे आनंदाने आणि अभिमानाने पाणावले. मती कुंठीत झाली. त्या आनंद घोषाच्या ललकाऱ्यांनी कान तृप्त झाले आणि मन मयूर स्वप्नवत होऊन पिसारा फुलवून नाचू लागला.
‘शिवराय पुन्हा अवतरले तर!….. आणि कल्पनाविश्वात रमण्यापूर्वीच कानात “हर हर महादेव” चा महामंत्र घुमू लागला. शिवरायांचे शौर्य तळपत्या तलवारीप्रमाणे डोळ्यांपुढे दिसू लागले. शिवरायांचा मार्गच शौर्याचा, शस्त्रांचा, गनिमीकाव्याचा आणि हिंदवी स्वराज्य घडविण्याचा. त्यांची तळमळ होती जनतेच्या हिताची, सुखाची आणि त्यागाची. त्यांची त्रिसुत्री देवी भवानी मातेच्या आराधनेची, देशाच्या कल्याणाची आणि धर्माच्या उत्थानाची!
असे हे रणधूरंदर शिवराय पुन्हा अवतरले तर पुन्हा एकदा सह्यागिरीचा कणखर कातळ थरारून उठेल, अधर्म भेदुनी धर्मरक्षणाची प्रतिज्ञा मनांमनात आत्मभाव जागा करील, शिवरायांच्या घोड्यांच्या टापा साऱ्या मावळ मुलखाच्या मातीत उमटतील, त्यांची भवानी तलवार गनिमाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी लखलखून सज्ज होईल. गरिबांचा वाली म्हणून त्यांची कीर्ती वाढेल. गरीब मावळ्यांना आश्रयाचे छत्र मिळेल. त्यांचा अन्नदाता त्यांना सुखी ठेवेल. कडेकपारीतून सुखसमृद्धी आणि संपन्नतेची लेणी खोदली जातील.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अनेक शाहीर त्या प्रजाहितदक्ष राजाला भारतवर्षाचे बदललेले स्वरूप दाखवतील. आपल्या राजाच्या शौर्याचे पोवाडे गाण्यासाठी शाहीर आपले डफ हातात घेतील. विज्ञानाची आणि उद्योग व्यवसायांची प्रगती पाहून महाराजही खूश होतील. विकसित भारतातील वैज्ञानिक युगातील जनता महाराजांना भ्रमणध्वनीद्वारे स्वागताचे संदेश पाठवतील. महाराज तळहातावर शिर घेऊन लढणाऱ्या तसेच देशाच्या सीमा सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या भारतीय शूर आणि धैर्यवान जवानांना भेटतील. त्यांना देशाचे अखंडत्व अबाधित राखण्यास स्फूर्ती देतील. तानाजी, सूर्याजी, बाजीराव यांच्याप्रमाणे देशाच्या सुरक्षेसाठी प्राणार्पण करणार्यांना मानाचा मुजरा देतील. इथल्या मातीमध्ये इमानी वीरांच्या शौर्यगाथा घडल्या त्यांचे स्मरण करून देतील.
या कलियुगात स्त्रियांवर होणारा अत्याचार, अन्याय पाहून त्यांचे हृदय ही रागाने कंप पावले. कारण त्यांच्या राज्यात एका पाटलाला स्त्रीवरील अत्याचारासाठी हात तोडण्याची शिक्षा ठोठावली होती. अशा स्वैराचारी, मोकाट गुन्हेगारांना ते नक्कीच फाशी देतील.
आपल्या सैन्यातील लोक शेतकऱ्यांना लुटत तेव्हा देखील त्यांनी कडक शब्दांत समज दिली होती.हल्ली चाललेला भ्रष्टाचार, लाचलुचपत पाहून त्यांचा नक्कीच कोप होईल. तिरंगी ध्वजातील अशोकचक्र शिवरायांचे लक्ष खिळवून ठेवील. शूर वीरांना इथल्या गीतेचा ते अर्थ सांगतील. स्वातंत्र्याचे आणि वैभवाचे प्रतिक म्हणजे आमचा ध्वज! त्याला पाहून शिवरायांच्या मनात चैतन्य, आदम्य उत्साह निर्माण होईल. राजे साऱ्या महाराष्ट्रात घोडदौड करतील. लोकांची दयनीय स्थिती पाहून ,विषमतेचे दर्शन घेऊन राजांचे काळीज फाटून जाईल. कदाचित शिवराय रायरेश्वराकडे धाव घेतील आणि पुन्हा प्रतिज्ञा घेतील. रायरेश्वराला स्वराज्यरक्षणासाठी साकडे घालतील. त्यांची प्रतिज्ञा लोकांना अज्ञान, दारिद्र्य आणि अन्यायापासून मुक्त करण्यासाठी असेल. लोक खऱ्या अर्थाने सुजाण बनावेत यासाठी त्यांचा निर्मळ प्रयत्न असेल, गनिमांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. पण आपल्याच लोकांनी चुका केल्या तर ते कदापिही सहन करत नसत. वेळच्या वेळी ते त्यांना शिक्षा देत. त्यांचा करारी बाणा आणि स्वराज्याबद्दलची निष्ठा त्यातून प्रतित होते. पण आज पैशासाठी अतिरेक्यांना सहाय्य करणारे देशवासी, तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यात अडकवणारे व्यापारी पाहिले तर शिवराय खिन्न होतील.
तरुण पिढीची होणारी धुळधाण आपल्या डोळ्यांनी पाहणे त्यांना असह्य होईल. सत्याचा मार्ग सोडून चंगळवादाकडे वळलेला समाज पाहून शिवरायांची गात्रेही थरथरतील. आपण स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची वाताहत “याची देहा याची डोळा” पाहण्याऐवजी ते भवानीमातेला विनंती करतील की मनुष्य जन्म आता नको.या हिंदभूमीचे पुन्हा नंदनवन करण्याची रायरेश्वराकडे शक्ती मागतील. अशावेळी आई भवानी ‘तथास्तु’ म्हणून आशीर्वाद देईल आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ओजस्वी वाणीतून शिवरायांचे तेजस्वी रूप साकारत गेले.
- शिवरायाचे आठवावे रूप | शिवरायांचा आठवावा प्रताप|
- शिवरायांचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
आणि प्रेक्षागारातून एकच गर्जना दुमदुमली, “जय शिवाजी| जय भवानी|”
- सौ.भारती सावंत
- मुंबई
- 9653445835